चंद्रपूर, दि.5 जानेवारी- आयटीसी अगरबत्ती प्रकल्प, महाराष्ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्णा येथे उभारण्यात येणारे अगरबत्ती युनिट या परिसरात रोजगार निर्मीतीचे प्रशस्त दालन ठरेल व त्या माध्यमातुन परिसराच्या विकासात भर घातली जाईल अशी अपेक्षा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
दिनांक 4 जानेवारी रोजी नागपूर येथे आयटीसी अगरबत्ती प्रकल्प, महाराष्ट्र बांबु विकास मंडळ आणि बांबु संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात पोंभुर्णा येथे अगरबत्ती उत्पादन युनिट उभारण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख उमेश अग्रवाल, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर, महाराष्ट्र बांबु विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील, जैवविविधता मंडळाचे सदस्य तथा आयटीसी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी रायवरम तसेच ऑपरेशन विभागाचे प्रमुख श्री. एम. मुर्लीधर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पोंभुर्णा येथे उभारण्यात येणारे अगरबत्ती उत्पादन युनिट ची क्षमता 100 मेट्रीक टन असून चांदा ते बांदा विकास योजनेच्या माध्यमातुन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन पोंभुर्णा तालुक्यातील 200 हून अधिक आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी 4.85 कोटी रू. निधी मंजूर झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या अगरबत्ती उत्पादन युनिटसाठी सामंजस्य करार करण्यात आला. आता आयटीसी च्या मंगलदीप ब्रँन्ड ची अगरबत्ती पोंभुर्णा येथे तयार होणार आहे.
No comments:
Post a Comment