ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या
आढाव्याची 12 तासांची मॅराथॉन बैठक
चंद्रपूर, दि.18 जानेवारी : शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच आजच्या 12 तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
समृद्ध किसान कार्यक्रम हा पथदर्शी कार्यक्रम सन 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षाच्या कालावधीत दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर हे तीन तालुके. दुसऱ्या टप्प्यात नागभीड, गोंडपिंपरी,जिवती तालुक्यात सदर कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आजच्या बैठकीमध्ये आमदार नानाभाऊ शामकुळे, ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपा सभापती राहुल पावडे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, ब्रिजभुषण पाझारे, नगरसेवक राजु गोलीवार याशिवाय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सकाळी 10 ते रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रमुख योजनांचा आढावा घेण्यात आला.
समृद्ध किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करणे, उत्पन्न वाढ होण्यास मदत करून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे समूहगट निर्मिती करणे, बाजाराला जोडलेल्या प्रोडक्शन क्लॅस्टरची निर्मिती करणे, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीत यांत्रिकीकरण आणि पिकांचे मूल्य वाढविणे, उत्पादित मालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळून देणे, पूरक व्यवसायांची व्हॅल्यू चेन तयार करणे, आदी उद्देश या योजनेचे ठेवण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन, पॉली हाऊस नर्सरी, भाजीपाला लागवड, कृषी यांत्रिकीकरण, समूह सिंचन, सिंचन विहिरीची दुरुस्ती, उपसा सिंचन योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, आदी नावीन्यपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहे.
विविध विकास कामांचा आढावा
आज आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेतकरी कर्जमाफी, परिस्थितीचा आढावा पाणीटंचाई, जयपूर येथील प्रस्तावित शेतकरी वेल्फेअर ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणारी कामे, जिल्ह्यातील ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची सद्यस्थिती, विविध योजनांची माहिती, समृद्ध किसान योजना, लोहारा येथील गोरक्षण जागा बाबतची चर्चा, जिल्ह्यातील जिल्हा सैनिक शाळा, बाबूपेठ, राजूरा येथील उड्डाणपूल, मूल, पोंभूर्णा, बल्लारशहा या ठिकाणची क्रीडा संकुल, वन अकादमी इमारतीचे बांधकाम, पोलीस प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व महानगरपालिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.
या शिवाय महाकाली मंदिर परिसराचा विकास, महानगरपालिका मार्फत तयार होत असलेल्या बाबुराव शेडमाके स्टेडियम व ज्युबली हायस्कूलसाठी देण्यात आलेल्या विशेष निधीचा आढावा देखील घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री आवास योजना, जिल्ह्यातील वैद्यकीय विभागातील रिक्त असणार्या पदांचा आढावा व विविध योजनांचा आढावा, जिल्ह्यातील सर्व नव्याने तयार होत असलेला बसस्थानकांचा आढावा, इको टुरीझम अंतर्गत उभारलेले बॉटनिकल गार्डन, राजुरा विमानतळ, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळ, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, जिल्ह्यातील पाणीपुरवठा, जिल्हा नियोजन समिती मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाचा समावेश होता. या सर्व योजनांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. कोणत्या तारखेला कोणते काम पूर्ण होईल याबाबत निश्चित आराखडा यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.
0000
No comments:
Post a Comment