Search This Blog

Monday 31 January 2022

पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव "महसुली गाव" म्हणून घोषित

 

पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव "महसुली गाव" म्हणून घोषित

चंद्रपूर दि. 31 जानेवारी: महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा तह.चंद्रपूर या महसूल गावाचे मौजा दुर्गापूर येथील सर्वे क्रमांक 12 ते 17 व 73 व 74 चा भाग व रस्त्यामध्ये पुनर्वसन केलेल्या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी अंतिम अधिसूचना काढली आहे.

            त्याद्वारे दि. 24 जानेवारी 2022 पासून चंद्रपूर जिल्ह्याच्या, चंद्रपूर तालुक्यातील पुनर्वसित सिनाळा, मसाळा जुना, नवेगाव या गावाचे निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ,चंद्रपूर तालुक्यातील नवीन सिनाळा नावाने ओळखण्यात येणाऱ्या महसुली गावात रुपांतर करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

00000

जिल्ह्यात सोमवारी 529 कोरोनामुक्त, 58 बाधित तर 1 मृत्यु

 

जिल्ह्यात सोमवारी 529 कोरोनामुक्त, 58 बाधित तर 1 मृत्यु

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 2627

चंद्रपूर, दि. 31 जानेवारी : गत चार-पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत असून कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. 24 तासात जिल्ह्यात 529 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 58 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर सोमवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 34, चंद्रपूर 9, बल्लारपूर 2, भद्रावती 2, ब्रह्मपुरी 2, मुल 2, राजुरा 3, वरोरा 2, कोरपना येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल येथील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 469 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 93 हजार 291 झाली आहे. सध्या 2627 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 44 हजार 250 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 45 हजार 355 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1551बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

हेल्मेट न वापरणा-या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही

 

हेल्मेट न वापरणा-या शासकीय कर्मचाऱ्यांवर

होणार दंडात्मक कार्यवाही

Ø कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे.  दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे कलम 129 अन्वये सक्तीचे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सन 2021 मध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हयातील महामार्गावर तुर्तास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. शहरात तसेच महामार्गावर पोलिस अंमलदार तसेच इतर शासकीय अधिकारी,कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी, चालवितांना आढळून येत आहेत. दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याची शिस्त लागावी, याकरीता दि. 1 जानेवारी 2022 रोजी सर्वप्रथम पोलिस अंमलदार यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यात आली व त्यानंतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येणार आहे.

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस अंमलदार यांनी आपल्या कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करावे. जे कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी. दुचाकी चालवितांना सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे.

00000

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उमा नदीवर 29 कोटींचे दोन पुल प्रस्तावित

 





पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उमा नदीवर 29 कोटींचे दोन पुल प्रस्तावित

Ø सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव व वाकल येथे भुमिपूजन

चंद्रपूरदि. 31 जानेवारी : सिंदेवाही तालुक्यात उमा नदीवर पुल नसल्यामुळे नागरिकांना पलिकडच्या गावात किंवा शेतात जाण्यासाठी नदीच्या पात्रातूनच वाहतूक करावी लागते. तालुक्यातील कळमगाव, मुरमाडी, कुकडहेटी, वाकल, जामसाळा, नलेश्वर, मोहाडी, पांगडी आदी गावातील नागरिकांची ब-याच वर्षांपासून पुलाची मागणी होती. या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने 25 कोटी रुपयांचे दोन पूल उमा नदीवर बांधण्यात येणार आहे. नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते कळमगाव व वाकल येथे दोन्ही पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आले.

यावेळी सा.बा. विभाग नागभीडचे कार्यकारी अभियंता श्री. कोठारी, जि.प.सदस्य रमाकांत लोधे, वाकलचे सरपंच राहुल पंचभाई, स्वप्नील कावळे, जामसाळाचे सरपंच गुलाबराव मेंढूलकर, प्रतिष्ठित नागरिक वामनराव सावसाकडे, हरीभाऊ बाहेकर आदी उपस्थित होते.

नागरिकांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कळमगाव येथे 15 कोटी रुपये तर वाकल येथे 14 कोटी रुपये खर्च करून दोन्ही पुल बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पुलांमुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्याचे अंतर कमी होणार आहे. सद्यस्थितीत मोहाडीवासियांना सिंदेवाहीला येण्याकरीता 14 किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. पुलामुळे आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. दोन्ही पुलाचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. वाकल आमदार निधीतून महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, ग्रामीण विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह आणि दलित वस्ती विकास निधीतून बौध्द विहाराचे सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कळमगाव येथे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, गावांचा विकास करणे आपले कर्तव्य आहे. येथील पुल करण्याची तळमळ सुरवातीपासूनच होती. सुरवातीला पुलासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले होते. आता मात्र वाढीव निधी मंजूर करून 15कोटी रुपये देण्यात आले आहे. तसेच कळमगाव ते इटोली रस्त्याकरीता 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून येथे सभागृह बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 35 लक्ष रुपये उपलब्ध करून दिले जाईल. या सभागृहात गरीब लोकांना कार्यक्रम साजरे करता येतील. तसेच येथील नरेश्वर तलावाचे खोलीकरण सुध्दा करण्यात येणार आहे.

किन्ही येथे गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, ‘माणूस द्या, मज माणूस द्या’, असे राष्ट्रसंत सांगून गेले. राष्ट्रसंतांचे विचार हे माणूस घडविणारे असून त्यांनी दिलेला मानवतेचा, समतेचा संदेश या सभागृहातून गेला पाहिजे. जात, पात, धर्म, वंश यापलिकडे जाऊन गावाचे गावपण टिकले पाहिजे. या समाज मंदिराला पुढील वर्षी संरक्षण भिंत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच येथील तलावाचे कामसुध्दा केले जाईल. किन्ही, मुरमाडी येथे गोसेखुर्दचे पाणी आणून सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊ. पुढील वर्षी गोटूल बांधकामासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 कार्यक्रमाला किन्हीचे सरपंच जनार्दन गावंडे, कळमगावच्या सरपंच मालती अगडे, मुरमाडीचे सरपंच रुपाली रत्नावार, सुनील उत्तेलवार, वामन मगरे, अरुण कोलते, बाबुरावजी गेडाम, सीमा सहारे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000









Sunday 30 January 2022

मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार ‘इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण

 मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार

इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण

चंद्रपूर/नागपूरदि. 30 जानेवारी  : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर 22 मध्ये 27 हजार 490 चौ.मि. (6.79 एकर) क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी एमएडीसीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. कंपनी सेक्रेटरी विभागाकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या निविदाधारक इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. यांना हे वितरण मंजूर करण्यात आले. एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या वितरणास मंजूरी दिली आहे. याबाबचे स्वीकृती पत्रही या कंपनीला पाठविण्यात आले आहे. या भूखंडासाठी सहा हजार 325 रुपये प्रती चौ.मि. एवढी राखीव किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्रइंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. कंपनीने 7 हजार 99 रुपये प्रती चौ. मि. इतके दराने बोली लावली होती. दुसरी बोली आभा हॉस्पीटॅलीटी प्रा. लि. ने 6 हजार 335 रुपये प्रती चौ. मि. या दराने बोली लावली होती. या भूखंडासाठी जवळपास 20 कोटी रुपये मुल्य आकारणी झाली आहे.

गेल्या काही महिन्यात एमएडीसीकडून आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजिसएव्हिएशन क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशनकृषी क्षेत्रातील कॉसग्रो ॲग्रोआरोग्य क्षेत्रातील अंजली लॉजिस्टीक आणि आता  इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस या हॉटेल उद्योगातील संस्थेला भूखंड देण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यवाहीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. कोविड महामारीमुळे उद्भवलेल्या निराशाजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे आशादायी वातावरण निर्माण करुन मिहान प्रकल्पाबाबत सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे श्री. दीपक कपूर यांनी म्हटले आहे. मिहान परिसरात अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था (एम्स) 150 एकर जागेवर कार्यरत झाली आहे. तिचा फायदा विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील नागरिकांना होत आहे. या प्रकल्पात टीसीएसएचसीएलइन्फोसीसटेक महिन्द्रालुपिनडीआरएएलइंडमारटीएएसएलफर्स्ट सिटीएफएससीटीसीआयकॉनकॉरमहिन्द्रा ब्लूमडेलमोराज वॉटरफॉल आदी कंपन्या प्रामुख्याने आहेत. वर्धा रोडवर अनेक टॉऊनशीप प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या साऱ्यांमुळे परिसरात असलेली तारांकित हॉटेलची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहेअसेही श्री. कपूर यांनी म्हटले आहे.

00000

जिल्ह्यात रविवारी 469 कोरोनामुक्त तर 282 नवे बाधित

 

जिल्ह्यात रविवारी 469 कोरोनामुक्त तर 282 नवे बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 3099

चंद्रपूरदि. 30 जानेवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 469 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 282 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 87, चंद्रपूर 16, बल्लारपूर 28, भद्रावती 20, ब्रह्मपुरी 17, नागभीड 5, सिंदेवाही 6, मुल 8, सावली 9, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 10, राजुरा 3, चिमूर 18, वरोरा 41,कोरपना 10, तर जिवती येथे 3 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 411 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 92 हजार 762 झाली आहे. सध्या 3099 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लाख 44 हजार 31 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी लाख 45 हजार 61 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1550 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Saturday 29 January 2022

दिलासादायक : जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट

 


दिलासादायक : जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणारे दुप्पट

Ø शनिवारी 790 कोरोनामुक्त तर 392 नवे बाधित

चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून जिल्ह्यासाठी ही दिलसादायक बाब आहे. शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या 191 ने जास्त होती तर शनिवारी ही संख्या तब्बल दुप्पट आहे. गत 24 तासात 790 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 392 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात शनिवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 146, चंद्रपूर 43, बल्लारपूर 14, भद्रावती 22, ब्रह्मपुरी 25, नागभीड 29, सिंदेवाही 5, मुल 15, सावली 8, पोंभूर्णा 2, गोंडपिपरी 16, राजुरा 7, चिमूर 24, वरोरा 22,कोरपना 9, तर जिवती येथे 5 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 97 हजार 129 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 92 हजार 293 झाली आहे. सध्या 3286 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 42 हजार 787 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 44 हजार 165 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1550 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000


पालकमंत्र्यांनी केली निर्माणाधीन कैंसर हॉस्पिटलची पाहणी





 

पालकमंत्र्यांनी केली निर्माणाधीन कैंसर हॉस्पिटलची पाहणी

चंद्रपूर, दि. 29 जानेवारी : बल्लारपूर रोडवर निर्माणाधीन असलेल्या कैंसर हॉस्पिटलची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी नुकतीच पाहणी करून बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, बांधकाम प्रकल्प अधिकारी वैभव गजभिये, लेखाधिकारी मयूर नंदा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, टाटा ट्रस्टच्या सहाकार्याने येथील कैंसर हॉस्पिटल उभे राहत असले तरी भविष्यात वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आदी बाबतीत ते व्यवस्थित सुरू राहिले पाहिजे. आपल्या जवळच असलेल्या नागपुरात मोठमोठे कैंसर हॉस्पिटल आहेत. मात्र गरीब लोकांना तेवढा खर्च झेपवत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांचा विचार करून या हॉस्पिटलमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार होणे गरजेचे आहे. हे रुग्णालय संपूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी योग्यरीतीने चालविण्याकरीता आतापासून नियोजन करा. रुग्णालयासाठी लागणारा 40 कोटीचा प्रस्ताव त्वरीत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

चंद्रपुर येथे निर्माणाधीन असलेले कैंसर हॉस्पिटल 140 बेडेड असून 2 लक्ष 35 हजार चौरस फूटात त्याचे बांधकाम होणार आहे. रुग्णालयाची इमारत ही तळमजलासह पाच मजली राहणार आहे. खनिज विकास निधीतून आतापर्यंत 113 कोटी रुपये देण्यात आले आहे. जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले असून सिव्हिल वर्क वर 40 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वैभव गजभिये यांनी दिली.

00000

Friday 28 January 2022

शुक्रवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 191 ने जास्त

 

शुक्रवारी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 191 ने जास्त

Ø जिल्ह्यात 607 कोरोनामुक्त, 416 बाधित तर 1 मृत्यु

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : जिल्हयात गत 24 तासात 607 जणांनी कोरोनावर मात केली असून 416 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. दिलासादायक म्हणजे नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणा-यांची संख्या 191 ने जास्त आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 75, चंद्रपूर 22, बल्लारपूर 38, भद्रावती 31, ब्रह्मपुरी 54, नागभीड 39, सिंदेवाही 2, मुल 23, सावली 19, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 1,  राजुरा 13, चिमूर 25, वरोरा 43, कोरपना 17, तर जिवती येथे 6 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 96 हजार 737 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 91 हजार 503 झाली आहे. सध्या 3684 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 41 हजार 333 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 43 हजार नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1550 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

उमेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने


उमेदवारांना प्रशिक्षणातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ

 

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी: जिल्ह्यात कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत संकल्प योजनेतंर्गत ऑपरेशन अॅंड मेंटेनन्स ऑफ ऑक्सीजन प्लाँट कोर्स राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लाँट उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित पीएसए ऑक्सीजन प्लांट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना बाधित रुग्णांचे मृत्युचे प्रमाण वाढले होते. त्यासारखी परिस्थिती या तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.

ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स ऑफ पी.एस.ए ऑक्सीजन प्लाँट या कोर्सकरिता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, मेकॅनिक इत्यादी कोर्स पात्र 30 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन रोजगार व मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत तर आभार अजय चंद्रपटन यांनी मानले.

00000 

बेरोजगार युवक-युवतींना रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन

 

बेरोजगार युवक-युवतींना रोजगार नोंदणी कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अद्याप रोजगार नोंदणी कार्डची नोंदणी केली नाही किंवा अद्ययावत केले नाही, अशा उमेदवारांनी आधार कार्ड ,नावात बदल, पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता याबाबतची माहिती नमूद संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

माहिती अद्ययावत करण्यासाठी माहिती पुढीलप्रमाणे :

उमेदवारांचा जुना यूजर आयडी, रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून खाते उघडावे. आपला आधार क्रमांक व माहिती अचूक टाकल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पुन:श्च सबमिट करावे. त्यानंतर उमेदवारांनी माहिती भरून पासवर्ड तयार करावा व तो सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर युजर आयडी व पासवर्ड येईल. त्यानंतर मुख्य पानावर जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करावे. वैयक्तिक शैक्षणिक व अन्य माहिती भरून प्रिंट काढता येईल. उमेदवारांना नोंदणी करतेवेळेस काही अडचण उद्भवल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा.

00000

सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु


सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग (महानगरपालिका क्षेत्र वगळून ) सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहे. दि. 25 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये शाळा सुरू करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून तसेच दि.20 जानेवारी 2022 च्या परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनेनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा सुरू करण्यासाठी दि. 20 जानेवारी 2022 च्या परिपत्रकामधील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्य.), जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांनी सातत्याने आढावा घेऊन नमूद निकष व सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच इयत्ता 1 ली ते 8वीचे वर्ग एका आठवड्यानंतर स्थानिक परिस्थितीचा विचार करून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात म्हटले आहे.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविला संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 31 जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

00000

एक्सप्रेस फिडरमुळे सावलीवासियांना होणार नियमित पाणी पुरवठा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार





 

एक्सप्रेस फिडरमुळे सावलीवासियांना होणार नियमित पाणी पुरवठा   - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø सावली तालुक्यात 31 कोटींच्या विविध विकासकामांचे भुमिपूजन

चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : सन 2050 पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेता सावली येथे वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र सदर वाढीव योजना सद्यस्थितीत असलेल्या विद्युत कनेक्शनवर चालविल्यास वारंवार खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अखंडीत विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी आठ किलोमीटरची एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सावलीवासियांना नियमित पाणी पुरवठा होईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

सावली येथे एक्सप्रेस फिडर लाईनचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी मनिषा वाजाळे, दिनेश चिटकूनवार, प्रशांत राईंचवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थितीत सावली नगर पंचायत क्षेत्राची लोकसंख्या 10 हजार असून येथे जवळपास तीन हजार नळ कनेक्शन आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, सन 2050 पर्यंतची संभाव्य वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन कोणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, म्हणून वाढीव पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी अखंडीत विद्युत पुरवठासुध्दा आवश्यक आहे. जिल्हा खनीज विकास निधीमधून 1 कोटी 84 लक्ष रुपये खर्च करून एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्यात येणार आहे. जेणेकरून सावलीवासिंयाना नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

            तालुक्यातील बोथली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, 2 कोटी 63 लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात येणार आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेला शब्द पाळला आहे. विकासाच्या बाबतीत या परिसराला कोणतीही कमी होऊ देणार नाही. बोथली येथे सामाजिक सभागृहासाठी 30 ते 35 लक्ष उपलब्ध करून देऊ. बोथली येथे गोसेखुर्दचे पाणी आणून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी हिरापुरच्या उपसा सिंचन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

            जिबगाव येथे रस्त्याचे भुमिपूजन करतांना पालकमंत्री म्हणाले, येथील रस्त्यासाठी 24 कोटी रुपये मंजूर केले आहे. काम मजबुत आणि चांगले करण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असून गावक-यांनीसुध्दा कामावर लक्ष ठेवावे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फर्निचरसाठी 80 लक्ष, सांस्कृतिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये, शाळेच्या दोन वर्गखोल्यांसाठी 30 लक्ष रुपये तर ग्रामपंचायत भवन इमारतीसाठी 25 लक्ष मंजूर करण्यात आले आहे. सिंचन, आरोग्य, रस्ते, रोजगार हे आपल्या प्राधान्याचे विषय आहेत. परिसरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

            यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते बोथली ते घोडेवाही ते सिंडोला रस्ता (2 कोटी 63 लक्ष रुपये), जिबगाव येथे हिरापूर – बोथली – सावली – उसेगाव – जिबगाव – हरंबा – साखरी – लोंढाली – कढोली – कापसी – व्याहाड बुज रस्ता (24 कोटीआणि वाघोली (बुटी) येथे वाघोली ते सामदा (बु.) रस्त्याचे (3 कोटी 13 लक्ष रुपये) भुमिपूजन करण्यात आले.

            कार्यक्रमाला बोथलीच्या सरपंचा खलिता मराठे, उपसरपंच सविता शेंडे, जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चौधरी, उपसरपंच इंदिरा भोयर यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

00000

Thursday 27 January 2022

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन वार्षिक प्रकाशनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

 


जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन वार्षिक प्रकाशनाचे

पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

चंद्रपूर,दि. 27 जानेवारी: जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2021 या प्रकाशनाचे विमोचन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ तसेच जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.

सदर प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर प्रकाशनात 3 भाग असून त्यामध्ये 11 प्रकरणे आहे. प्रत्येक प्रकरणात जिल्ह्यातील विविध विषयांवरील विस्तृत आकडेवारी उपलब्ध आहे. जिल्हयाची भौगोलिक माहितीसह काही ठळक बाबी प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिलेल्या असून चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्राची  माहिती  दृष्टीक्षेपात देण्यात आलेली आहे.

प्रकाशनाच्या दुस-या भागात जिल्हयातील विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रांच्या स्थिती बाबतची माहिती सांख्यिकीय आकडेवारी तक्त्यांच्या स्वरूपात दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडक निर्देशक, जिल्हा उत्पन्न अंदाज, जिल्ह्यातील किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न/खर्च, बॅंक व विमा, बचतगट, कृषि विषयक आकडेवारी, पदुम, जिल्ह्यातील जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, पणन, वस्त्रोद्योग बाबत आकडेवारी, पायाभूत सुविधांमध्ये उर्जा,  प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक आकडेवारी, सामाजिक क्षेत्रे व सामूहिक सेवा अंतर्गत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, मदत व पुनर्वसन विषयीची  आकडेवारी, योजनाविषयक आकडेवारी मध्ये विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना बाबतची आकडेवारी तसेच संकीर्णमध्ये न्याय व प्रशासन, माहिती व जनसंपर्क, निवडणुकीबाबत, वित्त, पर्यटनाबाबत आकडेवारी आहे.

 तिस-या व शेवटच्या भागात जनगणना, कृषीगणना, पशुगणना व आर्थिक गणनेबाबतची  सांख्यिकीय तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्हयातील केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या योजना, जिल्हा परिषदेकडील योजना, विशेष घटक योजना, आदिवासी घटक कार्यक्रम इ. राबविण्यासाठी तसेच विविध शासकिय, निमशासकिय, खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी, नागरिक इत्यादी घटकांना हे प्रकाशन उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.

00000


10 हजार महिलांना मिळणार प्रशिक्षणातून रोजगार - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 












10 हजार महिलांना मिळणार प्रशिक्षणातून रोजगार

- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø ब्रम्हपुरी येथे कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन

Ø लोकांच्या हाताला काम देणे हेच सर्वोच्च प्राधान्य

चंद्रपूर, दि. 27 जानेवारी : "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धारी" ही म्हण कालबाह्य झाली आहे. आता "जिच्या हाती आर्थिक व्यवहार, ती कुटुंबाचा आधार" ही संकल्पना समाजात रूजविण्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहो. पुढील एक - दोन वर्षात जवळपास 10 हजार महिलांना प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करून देवून खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.

सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ व लोकर संशोधन केंद्र, मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्पेट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन करतांना ते बोलत होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महामंडळाचे विभागीय अधिकारी राजू इंगळे, सीडीसीसी बैंकेचे संचालक संदीप गड्डमवार, सावली पं.स. सभापती विजय कोरेवार, दिनेश चिटकुनवार, तहसीलदार परिक्षित पाटील, नगर पंचायत मुख्याधिकारी मनिषा वाझाड़े, माविमचे जिल्हा समन्वयक श्री. उगेमुगे आदी उपस्थित होते.

कार्पेट निर्मितीचा उद्योग महिलांच्या कुटुंबासाठी कायम सावली देणारा ठरावा, असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, मुलांच्या भविष्यासाठी आई नेहमी चिंतेत असते, मात्र तिच्याजवळ पैसा नसतो. ही चिंता आता दूर होणार असून सावली तालुक्यातील हा प्रकल्प महिलांसाठी वरदान ठरणार आहे. खनीज प्रतिष्ठान आणि माविमच्या माध्यमातून कार्पेट निर्मितीचा प्रकल्प उभा होत आहे. यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या होतील. दोन महिन्यात 80 महिलांना प्रशिक्षित करून पुढील वर्षभरात 500 महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महिला या स्वाभिमानाने जगतात. कर्ज़ासाठी आपल्या दारात कोणी आलेले त्यांना आवडत नाही, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, सध्यस्थितीत ब्रम्हपुरी येथे एक हजार महिला काम करीत आहेत. येत्या 3 वर्षात ब्रम्हपुरी क्षेत्रातील जवळपास 10 हजार महिला रोजगार सक्षम होतील. महिलांच्या उत्पादित वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले जाईल. या प्रकल्पासाठी 13 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर केले असून लगेच प्रशिक्षण आणि मार्केटिंगचे धेय्य ठेवण्यात आले आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे म्हणाल्या, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सावली येथे कार्पेट निर्मितीचा प्रकल्प उभा राहत आहे. देशात ज्याप्रमाणे कार्पेटकरिता भदोई प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे सावलीसुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हावे. एखादा उद्योग अमंलात आणतांना त्यासोबत तांत्रिक माहिती असण्यासाठी तज्ञ समिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई येथील लोकर संशोधन संघाच्या मदतीने हा प्रकल्प होत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाची उत्पादने आता ॲमेझॉनवर सुद्धा झळकत आहे. मात्र, माविमला स्वतःची बाजारपेठ असावी. चंद्रपूर जिल्ह्यात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माविमच्या माध्यमातून बांबूच्या वस्तू जिल्ह्याबाहेर गेल्या पाहिजे. तसेच माविम प्रांगण किंवा माविम महिला घर जिल्ह्यात उभारण्यासाठी 5 एकरची जागा व निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच माविमच्या प्रगतीचा आलेख सुद्धा त्यांनी विशद केला.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, महिला सक्षमीकरणाची सुरुवात खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. सुरुवातीला 800 महिलांना रोजगार देण्यात येणार असला तरी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा महिलांना फायदा होईल तसेच कुटुंबाला आधार मिळेल, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच कार्पेट युनिटचे उद्घाटन केले.मान्यवरांनी कार्पेट निर्मितीचे प्रात्यक्षिक बघून आनंद व्यक्त केला.

यावेळी संघमित्रा महिला सक्षमीकरण समिती, मातोश्री महिला सक्षमीकरण समिती, प्रज्ञा महिला सक्षमीकरण समिती, एकता महिला सक्षमीकरण समिती, प्रगती महिला सक्षमीकरण समिती आणि सखी महिला सक्षमीकरण समितीला धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक प्लास्टिक पिशव्या आणि माविमच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी नरेश उगेमुगे यांनी तर आभार नरेंद्र वनकर यांनी मानले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

00000

Wednesday 26 January 2022

जिल्ह्यात बुधवारी 619 कोरोनामुक्त तर 739 नवे बाधित

 

जिल्ह्यात बुधवारी 619 कोरोनामुक्त तर 739 नवे बाधित

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 4002

चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : जिल्ह्यात गत 24 तासात 619 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 739 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 244, चंद्रपूर 76, बल्लारपूर 61, भद्रावती 70, ब्रह्मपुरी 23, नागभीड 17, सिंदेवाही 6, मुल 35, सावली 23, पोंभूर्णा 7, गोंडपिपरी 7, राजुरा 20, चिमूर 24, वरोरा 92,कोरपना 27, तर जिवती येथे 7 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 95 हजार 883 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 90 हजार 333 झाली आहे. सध्या 4002 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 38 हजार 971 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 41 हजार 505 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1548 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

00000

इरई नदीचे सौंदर्यीकरण व जंगल सफारी उपक्रम त्वरीत पूर्ण करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

 








इरई नदीचे सौंदर्यीकरण व जंगल सफारी उपक्रम त्वरीत पूर्ण करणार

                          -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

Ø अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत इमारतींचे होणार बांधकाम

चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्ती असलेला जिल्हा आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून जिल्ह्याचा पायाभूत तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. साबरमती नदीच्या धर्तीवर इरई नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच टायगर सफारी प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. राज्याच्या निधीतून 77 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून चंद्रपूरात लवकरच टायगर सफारी सुरू होईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर,महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक आणि वनभूमी असलेला हा जिल्हा आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा विकास करण्याला आपले प्राधान्य आहे. यात इरई नदीचे सौंदर्यीकरण, व्याघ्र सफारी यासोबतच पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते, जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, अभ्यासिका, ग्रामपंचायत इमारतींचे सुसज्ज बांधकाम केले जाईल.

पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात रब्बी हंगामातील क्षेत्रात 43 हजार 440 हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. करडई पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात 2463 हेक्टर वाढ झाली आहे. जिल्ह्यात कृषी, महसूल, ग्रामविकास, शिक्षण, वन विभाग व इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून 3510 वनराई बंधारे बांधले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2020-21 या वर्षात 4442 घरकूल पूर्ण झाली आहेत. तर प्रपत्र ‘ड’ मध्ये या आर्थिक वर्षात 10377 चे उद्दिष्ट प्राप्त झाले असून मंजूरीची प्रक्रिया सुरू आहे. रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत 9286 घरे तर शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत 3654 घरकुल बांधण्यात आले.  जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2106 वीज ग्राहकांना पारंपारिक पध्दतीने तर 1433 शेतक-यांना सौर कृषी पंपाद्वारे नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

महिला व बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना घरपोच आहार पुरविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षात नवीन अंगणवाडी बांधकाम, इमारत दुरुस्ती व शौच्छालय बांधकामासाठी 8 कोटी तसेच जिल्ह्यातील 350 आदर्श / मॉडेल अंगणवाडी केंद्राकरीता 5 कोटींची तरतूद उपलब्ध केली आहे. ‘डायल-112’ प्रकल्पांतर्गत 40 महिंद्रा बोलेरो आणि 83 दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्हा खनीज प्रतिष्ठामध्ये प्राप्त निधीतून एकूण 1488 कामांसाठी 284 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.  सन 2021-22 मध्ये जिल्ह्यातील एकूण 70 धान खरेदी केंद्रावर 13 हजार 331  शेतक-यांकडून 3 लक्ष 75 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांसाठी 50 टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट स्कूलसाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी 8 कोटी व दुरुस्तीसाठी 3 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतूद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अभ्यासिका महत्वाची असून प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका उभारण्यासाठी 8 कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता प्रत्येकी 14 कोटी याप्रमाणे 28 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले येत्या तीन वर्षात यासाठी 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या 3 ते 4 प्रवेश गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या अतिक्रमण धारकांना घरकुलसाठी नागपूरच्या धर्तीवर 500 फूट जागा देण्याचे नियोजन आहे. शहरातील 13 झोपडपट्टीतील जवळपास 400 कुटुंबांना नझुलचे पट्टे देण्यात येईल. महाज्योतीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी एक हजार तर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जेईई / नीटची तयारी करणा-या 3 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. ओबीसींच्या मुलांना कमर्शियल वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत पालकमंत्री म्हणाले, शासन आणि प्रशासनाने तिस-या लाटेसंदर्भात जवळपास 25 हजार रुग्णांसाठी प्रशासनाची तयारी आहे. यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत सीसीसी, डीसीएससी, डीसीएच ची एकूण संख्या 84 आहे. तसेच 648 हायड्रोजन काँन्सेंस्ट्रेटर आणि 1705 ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध आहे. 90 मेट्रीक टन ऑक्सीजनचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिला डोज घेणा-यांची संख्या 95 टक्के तर दुसरा डोज घेणा-यांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण सुरू झाले आहे. कोरोनाच्या महामारीत सुरवातीपासून लढा देणारे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, उद्योजक आणि या लढ्यात सहभागी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रजासत्ताक दिनाप्रसंगी जिल्हा सैनिक कार्यालयाकडुन देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरनारी यांचा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये वीरनारी श्रीमती वेंक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरनारी श्रीमती अरुणा सुनील रामटेके, वीरमाता श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले व वीरपिता वसंतराव डाहुले, वीरमाता श्रीमती छाया बाळकृष्णा नवले व वीरपिता बाळकृष्ण नवले तसेच नायब सुभेदार शंकर गणपती मेगरे यांना शौर्यचक्र प्राप्त झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय,चंद्रपूर या कार्यालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2021 प्रकाशनाचे अनावरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

00000