Search This Blog

Friday 29 September 2017

बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र म्हणजे स्वप्नपूर्तीचा आनंद --- ना.मुनगंटीवार





राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचे उद्घाटन
बांबूच्या सायकलीवर पालकमंत्र्यांनी मारला फेरफटका

चंद्रपूर, दि.29 सप्टेंबर – चंद्रपुरातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून (बीआरटीसी) तयार होणा-या वस्तू देश-विदेशातील बाजारात देशासोबतच चंद्रपूरचे नाव उज्वल करेल. या ठिकाणी फक्त प्रशिक्षणार्थीच घडणार नाही, तर कुशल उद्योजक या केंद्रातून उभे राहतील. चंद्रपूर व परिसरातील आर्थिक विकासाला चालना देणारे केंद्र म्हणून ‘बीआरटीसी’ ची ओळख होईल, हे केंद्र स्वप्नपूर्तीचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
राज्यातील पहिल्या बांबू पदविका अभ्यासक्रमाचा शानदार शुभारंभ सोहळा चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे सभागृहातील समईपासून व्यासपिठावरील खुर्च्या, पोडीयम, मेज, भेट वस्तू, स्मृतीचिन्ह, रोपटयांची कुंडी, तिरंगा झेंडा, बांबूपासून तयार केलेली सायकल सर्वच काही बांबूपासून तयार करण्यात आले होते. याशिवाय प्रियदर्शिनी सभागृहाच्या दर्शनी भागामध्ये बांबूपासून बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. सभागृहामध्ये बांबू प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी उत्सुक असणा-या महिला बचत गटांच्या शेकडो भगीनी उपस्थित होत्या. सभागृहात प्रवेश करतांनाच पालकमंत्र्यांनी बांबूच्या सायकलवर फेरफटका मारुन या केंद्राच्या कर्मचा-यांच्या कौशल्यला व कल्पकतेला दाद दिली.
व्यासपीठावर आमदार नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.एस.यादव, वन अकादमीचे संचालक अशोक खडसे, मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.गुप्ता, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे पाटील, आयआयटी मुंबईचे सहप्राध्यापक संदेश आर.एम., बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील आदींची उपस्थिती होती.
सत्तेत नसतांना बांबू या वनस्पतीबद्दल कल्पवृक्षाच्या कल्पानांना कायदेशिर आयाम कसा देता येईल, याबाबत आपण नेहमी विचार करत होतो, असे पालकमंत्री म्हणाले. चिचपल्ली व परिसरात मोठया प्रमाणात बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार आहेत. त्यांना यातून व्यवसाय मिळावा यासाठी आमदार म्हणून मोठया प्रमाणात पत्र व्यवहार केला होता. मात्र 2014 मध्ये जेव्हा कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा दुस-याच बैठकीत बांबू प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लगेच बांबूवरील वाहतूक कर रद्द केला. बांबू प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनला देशातील जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्राचारण करण्यात आले. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्हयातील बांबू कारागिराच्या कौशल्याला बघून रतन टाटा देखील भारावून गेले. चिचपल्ली येथे 1 लाख फुटामध्ये जी इमारत बनणार आहे. तशी इमारत भारतात कुठेही नसून या ठिकाणच्या वास्तूसाठी रतन टाटांनी वास्तूविशारदांचे शुल्क ट्रस्टतर्फे दिले आहे. भारतातील सर्वांत सुंदर आणि संपूर्ण बांबूपासून तयार झालेली  वास्तू चिचपल्ली येथे उभी राहणार आहे.
या ठिकाणी दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी प्रातिनिधीक सत्कार केला. ते म्हणाले, केवळ हाच अभ्यासक्रम नव्हे तर येणा-या काळामध्ये अनेक कमी कालावधीचे अभ्यासक्रम या ठिकाणी सुरु केले जातील. या ठिकाणच्या प्रशिक्षणातून तयार होणा-या विद्यार्थ्यामध्ये आम्ही उद्याचे उद्योजक बघतो आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई सोबत आज आपण करार केला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी तयार होणा-या वस्तूंचे उत्तम मार्केटींग करण्याचे प्रशिक्षणही या ठिकाणी दिले जाणार आहे. जागतिक दर्जाच्या फर्निचर कंपनीसोबत आम्ही विक्रीचा करार करणार असून ॲमेझान कंपनी सारख्या वितरण व्यवस्थेलाही सोबत घेणार आहे. त्यांनी यावेळी सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबूपासून तयार होणा-या वस्तू वापरण्याबाबतचे निर्देश जिल्हयातील वरिष्ठ अधिका-यांना दिले. यासोबतच त्यांनी अगरबत्ती, टूथपीक व अन्य वस्तू यापुढे चीन, जापान, तैवान आदी ठिकाणावरुन आयात करावे लागणार नाही. चीन सारखी अर्थव्यवस्था बांबूमुळे सुदृढ होवू शकते तर हा प्रयोग चंद्रपूर व आसपासच्या परिसरात का होवू शकत नाही. असा प्रश्‍न करुन पोंभूर्णांमध्ये अगरबत्ती क्लस्टरची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जिल्हयामध्ये बांबूपासून वस्तू निर्मिती करणा-यांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देता येईल का याची तपासणी करण्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे विभागाने देखील बांबूच्या वस्तू वापरण्याबाबत सहमती दर्शविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व आमदार नाना शामकुळे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक मुख्य संरक्षक विजय शेळके यांनी केले. वनविभागाचे उपसचिव आर.एस.यादव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, नगरसेवक रामपालसिंग, राजू गोलीवार, महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते. यावेळी बी.आर.टी.सी. आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामजंस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. महिला बचत गटांच्या भगीनींना बांबूपासून विविध वस्तू तयार करणा-या साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बिआरटीसीच्या संख्येत स्थळाचे उदघाटन व विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
000      

Thursday 28 September 2017

“ फोटो कॅप्शन ”


चांदा ते बांदा योजनेचा आढावा घेण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु.वायाळ आदी उपस्थित होते.

नाल्यांचे खोलीकरण करण्याची जिल्हयात धडक मोहीम राबविण्यात यावी : ना.हंसराज अहीर


चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – चंद्रपूर जिल्हयामध्ये जिवती, कोरपना व अन्य तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात बारमाही नाल्यांची मोठी संख्या आहे. वर्षभरातून किमान काही महिने वाहना-या नाल्यांच्या पाण्यांची साठवणूक करण्यासाठी खर्चिक बंधारे बांधण्याऐवजी या नाल्यांचे खोलीकरण करण्याची धडक मोहीम आखण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केली.
जिल्हयातील जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हयातील 2015 पासूनच्या जलयुक्त शिवारमधील कामांचा आढावा घेतला. जिल्हयामध्ये सिंचन क्षमता वाढवायची असेल, तर जलसाठे वाढविणे गरजेचे आहे. कोल्हापूर बंधा-यामध्ये दरवाज्यांचे नियंत्रण, त्याची सुरक्षितता व पावसाळयातील देखभाल याबाबत अनिश्चितता असते. तसेच अशा पध्दतीचे बंधारे बांधणे जिल्हयासाठी खर्चिक ठरते. त्यातून पाणीसाठा होत नाही. मात्र नाल्यांचे खोलीकरण सलगरित्या केल्यास त्यातून सिंचनाची अधिक उपलब्धता होवू शकते. त्यामुळे जिल्हयात असणा-या पूर्वापार बंधा-यांना जीवंत करण्यासाठी त्यामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी नाल्या खोलीकरण मोहीमेवर अधिक भर देण्यात यावा, अशी सूचना अहीर यांनी यावेळी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंचन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करत असतांना जिल्हयाच्या जलयुक्त शिवार योजनेतून पाणीसाठा वाढवणे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य असून उपलब्ध वाहत्या नाल्यांना जलयुक्त बनविण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या नेतृत्वात खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी, सिंचन, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते
000

मुद्रा योजनेतून अर्ज देणा-या योग्य उमेदवाराला कर्ज उपलब्ध झालेच पाहिजे : ना.हंसराज अहीर


जिल्हयातील बँकाच्या प्रतिनिधींसोबत घेतला आढावा

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मुद्रा योजना हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सुशिक्षित बेरोजगारांना, होतकरु तरुणांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी देण्यात आलेला संकल्प आहे. त्यामुळे बँकेतील अधिका-यांनी अधिकाधिक सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वत: प्रयत्न करावे. आलेल्या प्रत्येक अर्जाचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज जिल्हयातील बँकांच्या अधिका-यांना दिले.
मुद्रा बँक योजनेअंतर्गत शिशू गट, किशोर गट, तरुण गट अशा योजनेमध्ये दहा हजारापासून दहा लाखापर्यंत विविध योजनांमधून सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्याची योजना आखण्यात आली आहे. तथापि जिल्हयामधील अनेक बँकानी या योजनेमध्ये अपेक्षित लक्ष पूर्ण केले नसल्याबद्दल अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या सुशिक्षित युवकांना कर्ज मिळाले आहे. त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित स्वरुपात बँकेत भरुन आपली पत सांभाळावी व कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुद्रा बँक योजना सर्व देशभर राबविली जात असून चंद्रपूर जिल्हा सुध्दा योजनेमध्ये मागे पडता कामा नये, असे त्यांनी बजावले. गेल्या वर्षी 20 हजार लोकांना कर्ज मिळावे असे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 85 टक्के लोकांना कर्ज वाटप करण्यात आले. तथापि, कर्ज परत येत नाही असे कारण दाखवून बँकांनी नव्या उद्योजकांना कर्ज देणे बंद करणे संयुक्तीक नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रत्येक बँकेने त्यांच्याकडे अर्ज घेऊन येणा-या उमेदवारांची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केली. देशाच्या पंतप्रधानांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून बँकेमध्ये कर्मचारी नाहीत. बँकेला अन्य महत्वाचे प्रकल्प राबवायचे आहेत किंवा वारंवार उमेदवारांना परत पाठवण्याचे काम करु नये, असेही त्यांनी यावेळी उपस्थित बँक अधिका-यांना स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील नवतरुणांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्यासह जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, महाराष्ट्र बँक, बडोधा बँक, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, ओरींटल बँक, युको बँक, युनीयन बँक आदींचे प्रतिनिधी हजर होते. यावेळी जिवती व कोरपना परिसरातील बँकींग व्यवहार सुरु करण्यात यावे. या ठिकाणी विविध बँकेच्या शाखा उघडण्यात याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
            0000

पाऊस व संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन रब्बीचे नियोजन करण्यात यावे- ना.हंसराज अहीर


फवारणी करणा-या शेतक-यांनी काळजी घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर- महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर व लगतच्या भागात या वर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका पोहचला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागानी समन्वयाने रब्बी हंगामाचे नियोजन करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज येथे केली.
कृषी, सिंचन, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यासाठी आज विश्रामगृहावर त्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.दिपक चव्हाण, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावर्षी झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. जिल्हयामध्ये भाताच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सोयाबिनचा पेरा कमी झाला असून कपासीचा पेरा वाढला आहे. तथापि, जिल्हयातील अनेक प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अत्यल्प असल्यामुळे रब्बीचे नियोजन करतांना प्रकल्पनिहाय नियोजन कृषी विभागाने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले. जिल्हयातील आसोलामेंढा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असून गरज पडल्यास गोसेखूर्द प्रकल्पातून पाणी मिळवता येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने आसोलामेंढा प्रकल्पाशेजारी 16 हजार हेक्टर जमिनीसाठी वेगळे नियोजन करावे. या ठिकाणी गहू आणि चना या रब्बी पिकाची लागवड करण्यासाठी कृषी व संबंधित विभागाने शेतक-यांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बंदी घातलेल्या बियांन्यांची लागवड, कृषी मित्र, उन्नत शेती, बियान्याची उपलब्धता, युरीयाची उपलब्धता या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औषधी विक्री दुकानांमधून औषध विक्री करतांना शेतक-यांना आवश्यक सल्ला आणि सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. तसेच आत्मा व पशुसंवर्धन विभागामार्फत विविध प्रशिक्षण देतांना दोन्ही विभागांच्या समन्वयाची आवश्यकता असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व विभागामार्फत शेतक-यांसाठी सुरु असणा-या योजनांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.
बैठकीला विविध विभागांच्या अधिका-यांसह  नरेंद्र जिवतोडे, शेखर चौधरी, चंद्रकांत गुप्ते, विजय वानखेडे, डॉ.भगवान गायकवाड आदींची उपस्थिती होती.


शेतक-यांनो फवारणी करतांना काळजी घ्या

नव्या पध्दतीच्या बियान्यांमुळे कपासी व अन्य पिकांची उंची वाढली आहे. त्यामुळे फवारणी करतांना शेतक-यांनी सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा. चेहरा व  शरीरावर विषारी किटकनाशकांचा प्रभाव होणार नाही,  याची काळजी घ्यावी. विषारी औषध अंगावर सांडणे म्हणजे त्याची विषबाधा होण्याची शक्यता असतेच तसेच फवारणी यंत्र वापरतांना शरीरापासून दूर राहील याची काळजी घ्यावी. तसेच वा-याचा प्रवाह बघून फवारणी करण्याची दिशा शेतक-यांनी निश्चित केली पाहिजे. हल्ली किटकांची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे मानवी शरीरांवर परिणाम होईल, अशा प्रकारच्या औषधांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फवारणी ही जीवावर बेतू शकते. त्यासाठी आवश्यक उपाय योजना व औषधी कंपनी, कृषी विभाग, औषध दुकानदार यांनी दिलेला सल्ला मानावा तसेच कोणताही संकोच न बाळगता डोळे, चेहरा व शरीराच्या अन्य भागाचे संरक्षण करणारे चष्मा व अन्य संरक्षण साहित्य वापरावे.

    

दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी 1,98,15,300 रू. निधीला मंजुरी

वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्‍मचक्र अनुप्रवर्तन महोत्‍सवात दिलेला शब्‍द केला पूर्ण

चंद्रपूर, दि.28- राज्‍याचे वित्‍त आणि नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी एक कोटी अठ्ठयाण्‍णव लाख पंधरा हजार तीनशे इतक्‍या रकमेच्‍या प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 27 सप्‍टेंबर 2017 रोजी निर्गमीत केला आहे. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे 16 ऑक्‍टोंबर 2016 रोजी नागरिकांना दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे.
  चंद्रपूर येथे 16 ऑक्‍टोंबर 2016, 1956 ला भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन लाखांपेक्षा जास्‍त लोकांना बौध्‍द धर्माची दीक्षा दिली. या दिवसाची साक्ष म्‍हणुन प्रत्‍येक वर्षी दीक्षाभूमी, चंद्रपूर येथे 15 व 16 ऑक्‍टोंबरला धम्‍मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा केला जातो. दि. 16 ऑक्‍टोंबर 2016 रोजी दीक्षाभूमी चंद्रपूर येथे धम्‍मचक्र अनुप्रवर्तन समारंभात बौध्‍दधर्मीय नागरिकांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरण यासाठी निधी मंजुर करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. त्‍यानुसार यासाठी दोन कोटी रू.च्‍या मर्यादेत तत्‍वतः मान्‍यता दि. 24 मार्च 2017 च्‍या शासन निर्णयान्‍वये देण्‍यात आली आहे. आयुक्‍त समाज कल्‍याण पुणे यांचे मार्फत दीक्षाभूमीच्‍या विकासासाठी अध्‍यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम व परिसराचे सुशोभीकरणाच्‍या सादर केलेल्‍या 1 कोटी 98 लाख 15 हजार 300 इतक्‍या रकमेच्‍या प्रस्‍तावाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. यासंदर्भात सन 2017-18 च्‍या अर्थसंकल्‍पात सुध्‍दा वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी उपलबध करण्‍याची घोषण केली होती.
वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना यासंदर्भात दिलेला शब्‍द प्राधान्‍याने पुर्ण केला आहे. ऐतिहासिक दीक्षाभूमीवर भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व परिसर सुशोभीकरणाच्‍या माध्‍यमातुन या महामानवाला मोठी आदरांजली ठरणार आहे.
000

Sunday 24 September 2017

सुसज्ज अभ्यासिका बॅरिस्टर खोब्रागडे यांना खरी आदरांजली : मुनगंटीवार



बाबूपेठ परिसरात विद्यार्थांना अभ्यासाठी मिळाली हक्काची जागा

चंद्रपूर दि २४ सप्टेंबर : विद्यादानाचे व विद्या आत्मसात करण्याचे महत्त्व आयुष्यभर आपल्या वाणीतून व कृतीतून दर्शवणारे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सच्चे अनुयायी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना खरी आदरांजली या वास्तुतील ही अभ्यासिका आहे. चंद्रपुरातील गरजू, हुशार, चिकित्सक व अभ्यासू मुलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम आपण करू शकलो याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
        बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची उद्या २५ सप्टेंबरला जयंती आहे. त्यांना मान्यवरांनी आजअभिवादन केले. १४ जुलै रोजी बाबूपेठमधील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले होते. यावेळी त्यांनी या सभागृहाच्या बेसमेंटमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्याचे लोकार्पण झाले. या विक्रमी वेळेतील कामाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्र्यांनी महानगर पालिकेला धन्यवाद दिलेत.
      या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, सभापती अनुराधा हजारे,  सभागृह नेता वसंत देशमुख उपस्थित होते. तसेच खोब्रागडे कुटुंबातील मृणालीनीताई गिरीष खोब्रागडे, गौतमी डोंगरे, देशक खोब्रागडे,  सत्यजित खोब्रागडे,  प्रवीण खोब्रागडे, या स्मारकासाठी जागा देणारे स्नेहल देवानंद रामटेके, प्रतीक डोरलीकर  आदि उपस्थित होते .
      यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर शहरात शामाप्रसाद मुखर्जी व बाबा आमटे अभ्यासिके नंतर बाबूपेठ परिसरात बॅरिस्टर खोब्रागडे सभागृहात आणखी एक अभ्यासिका उभी राहत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील भावी पिढीसाठी अभ्यासिका महत्त्वपूर्ण कार्य आहे. मूल येथे उभारण्यात आलेल्या शामा प्रसाद मुखर्जी अभ्यासिकेतील मुलांना अभ्यासाची ओढ लागल्याचे सांगीतले.  चंद्रपूर जिल्हयातील मुले जेव्हा या अभ्यासिकेतून अभ्यास करून केंद्र, राज्य व शासनाच्या विविध सेवा परीक्षेतून विविध पदावर नियुक्ती होतील ती खरी बॅरिस्टर साहेबांना श्रद्धांजली ठरेल.  आपल्यालाही समाधान मिळेल,  असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या घरात अभ्यासाठी जागा नाही, वातावरण नाही, शांतता नाही, मात्र शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची जिद्द आहे. अशा जिद्दी, गुणवान व गरजू विद्यार्थ्यांसाठी  ही जागा उपयोगी पडणार आहे, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
       ही अभ्यासिका निर्माण करण्याच्या घोषणेनंतर १६९६ तासात महानगरपालिकेने लोकार्पित केल्याबद्दल त्यांनी महापौर घोटेकर, आयुक्त संजय काकडे व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. सभागृह निर्मिती, अभ्यासिकेचे लोकार्पण, साहित्य निर्मिती याबाबतचे दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुभेच्छापर संबोधन केले. रस्ते, विकास, पायाभूत सुविधांचे निर्माण यासोबतच गुणवान, अभ्यासू विद्यार्थांसाठी अभ्यासिका निर्मितीचे प्रेरणादायी काम जिल्हयात सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ही अभ्यासिका परिसरातील सर्व स्तरातील जनतेच्या ज्ञानार्जनासाठी कामी येईल असे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी विक्रमी वेळेत पालकमंत्री महोदयांच्या आश्वासनाची पूर्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. महापौर अंजली घोटेकर यांनी पालकमंत्री यांनी दिलेल्या अभिवचनाला वेळेत पूर्ण करू शकलो याचे समाधान व्यक्त केले. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करणारे आयुक्त काकडे, उपायुक्त विजय देवळीकर, अभियंता विजय बोरीकर, अभियंता महेश बारई या टीमचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त संजय काकडे यांनी तर संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. यावेळी नगरसेविका वंदना तिखे, शीतल गुरुनुले, पुष्पा उराडे, माया उईके, वंदना जांभुळकर, निलीमा अखेवार, ज्योती गेडाम, आशा आबुजवार, कल्पना बबुलवार, पुष्पा मून, अश्वीनी खोब्रागडे आदीसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
000000

बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या व्याक्तिच्या कुटूंबाला आर्थिक मदत

चंद्रपूर,23 सप्टेंबर-  सिनाळा येथील प्रितम वसंत सहारे हे दिनांक 8 सप्टेंबर 2017 रोजी बिबट्याच्या हल्यात मृत्यूमुखी पडले होते .राज्य शासनातर्फे आज सहारे कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. मृतकाची आई वनमाला सहारे यांना 7 लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली .
वनजीवांच्या हल्ल्यात अघटीत घडल्यास तातडीने वाढीव मदत निधीसह कुटुंबाला मदत करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रितम सहारे यांच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्यात आली आहे. विभागीय वन अधिकारी सोनकुसरे, तहसिलदार संतोष खांडरे, वन विभागाच्या श्रीमती जगताप यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी सहारे कुटुंबाला तातडीने मदत मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रसिंग बैस यांच्यासह सरपंच गिता वैद्य, उपसरपंच बंडु रायपुरे, जि.प. सदस्या रोशनी खान, हनुमान काकडे, देवानंद थोरात, फारुक शेख, किशोर मांडवकर, जिवनकला मांडवकर, गावचे पोलिस पाटील तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मृतकाच्या कुटूंबातील सदस्यांची सात्वंना करण्यात आली.

000

गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये वर्धा जिल्हयाचा कायापालट करणारा संकल्प से सिद्धी महामेळावा


  • एकाच दिवशी 5 हजार 74 कोटीच्या कामांचे भूमीपूजन
  • सेवाग्राम आश्रमाच्या 266 कोटीच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ
  • मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, पालकमंत्री मुनगंटीवार यांची उपस्थिती

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :  रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्हयाचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम वर्धा येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, वित्त, नियोजन व वने तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एकाच दिवशी 5 हजार 74 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
         सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाचा 266.53 कोटीच्या विकास आराखडयातील कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ व वर्धा जिल्हयाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याचा संकल्प या कार्यक्रमात केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्प से सिद्धी उपक्रमाप्रमाणे सर्वकष विकासाची रूपरेषा कार्यक्रमातून ठरणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक यांना आमंत्रित करण्यात येणार असून शहर व ग्रामविकासाचा गाडा चालविणारे सर्व कर्मचारी देखील आमंत्रित केले जाणार आहेत. याच वेळी वर्धा जिल्हयासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या ड्राय पोर्ट, राष्ट्रीय महामार्ग, केंद्रीय मार्ग निधी याच्या कोट्यवधीच्या कामाचे भूमीपूजन होणार आहे. सोबतच संपूर्ण देशाला स्वराज्याचे स्वप्न जेथून पडले होते. त्या महात्मा गांधी यांच्या सहवासाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाच्या कामाचाही शुभारंभ यावेळी होणार आहे.
     आज चंद्रपूर येथे वनविभागाच्या विश्रामगृहावर या कार्यक्रमाच्या  योजनाची बैठक झाली. हा कार्यक्रम केवळ भूमीपूजन सोहळा नसून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या संकल्प से सिद्धी उपक्रमातील एक आदर्श आयोजन असेल. या ठिकाणावरून आगामी काळात वर्धा जिल्हयाच्या संपूर्ण कायापालटचा संदेश सर्वाना जाईल, अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
        यावेळी या कार्यक्रमाच्या अभिनव नियोजनाबद्दल त्यांनी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुनावार, जिल्हाधिकारी शैलेष नवल, नगराध्यक्ष अतुल तराळे, संगीता शेंडे, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेम्भूर्णे, सुनील गफाट, भुपेंद्र शहाणे आदींची चर्चा केली.
सेवाग्राम आश्रमासाठी
266.53 कोटीचा आराखडा
जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 ऑक्‍टोंबर 2016 रोजी 266.53 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यताही  दिली होती. आता या आराखडयातील कामांचे भूमीपूजन होणार आहे.
   या विकास आराखड्यात सेवाग्राम, वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, पवनार येथील दिल्ली गेट आणि परिसराचे वारसा संवर्धन, धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरण, नदीच्या दोन्ही बाजूस, पवनार आश्रम ते विनोबा भावे यांच्या समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्त्याची निर्मिती, नदी काठाची स्वच्छता व नूतनीकरण तसेच पर्यटकांसाठी सुविधा,  सेवाग्राम परिसरामध्ये अंगुरी बागेजवळ 1000 व्यक्तींसाठी सभागृह, यात्री निवासाच्या परिसरातील प्रदर्शन हॉलची दुरुस्ती, गांधी चित्र प्रदर्शनी येथील दुरुस्ती व नूतनीकरण,  हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा करण्यात येणारआहेत. 
     गांधी फॉर टूमारो - महात्मा गांधी प्रशिक्षण व संसाधन केंद्र हे विकास आराखड्यातील  सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र  ठरणार आहे. 
महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान, त्यांचे साधे राहणीमान, स्वच्छतेचा आग्रह, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान,  निसर्गोपचार, कला, संस्कृती याची माहिती पुढील पिढीला अध्ययनाकरिता उपलब्ध करून देण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात येणार आहे.  

000

चंद्रपूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे पालकमंत्री मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर दि 23 सप्टेंबर :- दीर्घ कालावधीत पाऊस न आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. या वर्षात केवळ 42 टक्के पाऊस झाल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यासाठी तातडीने पीक परीस्थितीचे  पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले.
               चंद्रपूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने, धानाचे, कापसाचे, सोयाबीन व अन्य सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अन्यत्र पाऊस होत असतांना जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना आवश्यक आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने सर्व नुकसानाची पाहणी  करण्यासाठी यंत्रणा कामी लावावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
               आज दुपारी या संदर्भातील पत्र पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले आहेत.
000

Monday 18 September 2017

कर्जमाफीकरीता पात्र शेतक-यांनी 22 सप्टेंबर पर्यंत सेवा सहकारी संस्थेत कागदपत्रेही जमा करणे बंधनकारक

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- महाकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणे पात्र शेतक-याला आवश्यक असून सोबतच सेवा सहकारी संस्थेत कागदपत्रे जमा करणेही बंधनकारक आहे.त्यामुळे ऑनलाईन अर्ज करणा-या शेतक-यांनी सेवा सहकारी संस्थेतही आपले कागदपत्रे जमा करावी व 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ही योजना शासनाने सुरु केलेली असून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांसाठी ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिनांक 22 सप्टेंबर 2017 पर्यंत आहे. शेतक-यांनी ऑनलाईन केंद्रावर जाऊन ( http://CSMSSY.in या संकेतस्थळावर) आपला अर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणा केल्यानंतर संबंधित शेतक-यांने त्यांचे आधार कार्ड, असल्यास पॅनकार्ड, 7/12 चा उतारा, बँक बचत खाते क्रमांक इत्यादी कागदपत्राची झेरॉक्स प्रत (मूळ प्रत देऊ नये) ही संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या सचिवास देणे बंधनकारक आहे. जर अशी कागदपत्रे सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाकडे जमा केली नाहीतर ते शेतकरी सदर कर्जमाफीच्या निकषानुसार पात्र ठरत असतील,  तरीही  ते या लाभापासून वंचित राहू शकतात. पात्र शेतक-यांनी  या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आपली वैयक्तीक माहिती कागदपत्रासह संस्थेच्या सचिवास तात्काळ सादर करावी. आतापर्यंत ज्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्या सर्वांसाठी ही बाब बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी केले आहे.
000

मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवांबाबत पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय समिती गठीत

चंद्रपूर, दि.18 सप्टेंबर- चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय चौकशी समितीचे गठन केले आहे. ही समिती बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती आणि सुधारणांबाबतचा अहवाल लवकरचसादर करणार आहे.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा ही राज्यातील प्रगत रुग्ण सेवा झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी. या ठिकाणचा मृत्यूदर शून्य आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी, तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा. यासाठी सद्यास्थितीत सूचवायच्या उपाय योजनांसाठी ही पाच सदस्यीय समिती काम करणार आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व जेष्ठांचे अतिदक्षता विभागाची स्थिती. या ठिकाणी रात्री व दिवसा  काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणा-या सोयी सुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणा-या सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती. या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम व आदी विषयावर ही समिती आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.
पालकमंत्र्यांनी नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयाच्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात दोन बैठकी गेल्या आठवडयात घेतल्या होत्या. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. शनिवारी व रविवारी त्यांनी चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली. जिल्हयातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटी करणासाठी पालकमंत्री प्रयत्नशिल आहेत. ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, असे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिले आहेत. सर्व वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी या पाच सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे.   
0000  

Saturday 16 September 2017

युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन- सुनंदा बजाज




चंद्रपूर, दि.16 सप्टेंबर – शिक्षण घेत असतांना आपण फक्त पुस्तिकी ज्ञान ग्रहण करीत असतो. परंतु आपल्याला रोजगार उपलब्ध करुन घेण्यासाठी अनुभवाची आवश्यकता असते. त्यामुळे शिक्षणासह रोजगार मिळवण्यासाठी अशा रोजगार मेळाव्याचा लाभ युवक, युवतींना घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज यांनी आज जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे  कौशल्यम सभागृह चंद्रपूर येथे आयोजित रोजगार मेळाव्यात बोलतांना केले.
यावेळी मंचावर यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीटीआर विभागाचे श्री.नखाते, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  सी.बी.कोहाडे, संत रोहीदास चर्म महामंडळ व्यवस्थापक विजयालक्ष्मी भगत, इतर मागासवर्गीय महामंडळाच्या व्यवस्थापक दिपाली मांजरे, व्हीटीपीचे प्रमुख प्रवीण पोशेट्टीवार उपस्थित होते.
यावेळी श्रीमती बजाज म्हणाल्या, या ठिकाणी आलेल्या उद्योग समुहामध्ये काम करुन अनुभव घेण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली असल्याने या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. या अनुभवाचा आपल्याला कधी ना कधी  रोजगार मिळविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशस्वी गृपचे व्यवस्थापक आशिष अतकरी यांनी आमच्या कंपनीतर्फे युवकांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना सक्षम करण्यात येत असते. या तीन वर्षाच्या कामाचे मुल्यमापन केल्यानंतर त्यांना याच कंपनीत किंवा इतरही कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होते. त्यामुळे युवकांनी घरी न बसता इतर ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आपण एकाच रोजगाराच्या मागे न लागता जेथे काम मिळेल त्यापासून सुरुवात करणे योग्य असते. त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास वाढून संधी उपलब्ध होत असल्याने या संधीचे सोने करावे, असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी महामंडळाचे व्यवस्थापक कोहाडे, श्रीमती मांजरे, श्रीमती भगत यांनी आपल्या महामंडळातर्फे बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच अस्वीन पालीकर यांनी मॅक्स लाईफ इन्शुरन्समध्ये कशा संधी उपलब्ध आहेत यासंबंधीची माहिती दिती. तर श्री.नखाते यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात सिपेट व्हीटीपी चंद्रपूर, एज्युब्रिज व्हिटीपी, युवापरिवर्तन व विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.
यावेळी विविध उद्योगांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच युवक, युवतीही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन राहूल गुल्हाने यांनी तर प्रास्ताविक व आभार कनिष्ठ सेवायोजन अधिकारी  विजय गराटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय राऊत, रमेश गाऊत्रे, विजय पांढव, अशोक बुरेवार, योगेश काळे, पंकज कचरे व प्रकाश चहारे यांनी सहकार्य केले.

0000