चंद्रपूर, दि.30 ऑगस्ट- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत संवादपर्वातून चंद्रपूर जिल्हयामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे सुरु आहे. तालुक्यातील विचोडा या गावी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवर चर्चा करण्यात आली.
संवादपर्व 2017 अंतर्गत चंद्रपूर महानगरातील विविध गणेश उत्सवामध्ये शासनाच्या अनेक योजनांबाबत माहिती देणे सुरु असून जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘हॅलो चांदा’ या चित्रफितीला दाखविण्यात येत आहे. तसेच आपले चंद्रपूर या लघुपटालाही दाखविण्यात येत आहे. मंगळवारी तालुक्यातील विचोडा या गावी संवादपर्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तसेच हॅलो चांदा या संदर्भात उपस्थित गावक-यांना माहिती देण्यात आली.
जिल्हा निबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक संजय बोधे, सुप्रसिध्द कवी किशोम मुगल, सामाजिक कार्यकर्ते अनिल डोंगरे, सरपंच किरण डोंगरे आदींच्या उपस्थितीत या योजनेवर चर्चा झाली. शेतकरी, शेतीची मशागत, शेतीच्या समस्या, शेतीवर आधारीत पंरपरा, सण, उत्सव या संदर्भातील प्रबोधनात्मक मांडणी कवी किशोर मुगल यांनी यावेळी आपल्या रचनेतून केली. गंभीर गेय कवीता व सोबतीला हास्यव्यंगाची फोडणी देत त्यांनी शेतक-यांच्या समस्यांची मांडणी कवीतेतून केली. शेतक-यांवर आलेल्या आर्थिक संकट आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी आपल्या निवेदनात दिली. शासकीय यंत्रणा हीच तळागाळापर्यंत लाभ पोहचविणारी यंत्रणा असून संवादपर्वाच्या मार्फत विविध विभागाचे अधिकारी शेतक-यांच्या भेटीला येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सहायक निबंधक संजय बोधे यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी शेतकरी व अधिकारी यांच्यामध्ये विविध विषयावर चर्चा झाली. या गावातील शासकीय कर्मचा-यांच्या मार्फत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बोधे यांनी केले. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्ज भरणा-या मात्र योजनेस पात्र असणा-या शेतक-यांनी देखील ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन निशुल्क अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून शेतक-यांनी यासाठी गावातील सुशिक्षीत तरुणांची व सरकारी कर्मचा-यांची मदत घ्यावी असे आवाहन केले. शेतक-यांसोबत कर्ज माफी, ऑनलाईन प्रक्रिया, तीची आवश्यकता, योजनेबद्दल शंका याबाबत प्रश्नोउत्तराचा तास चांगलाचा रंगला. यावेळी अनेक शेतक-यांनी संवादपर्वामुळे या योजनेबाबतची नेमकी माहिती समजल्याचे सांगितले. याशिवाय सद्या जिल्हयात गाजत असलेल्या हॅलो चांदा या हेल्प लाईनचा उपयोग करण्याबाबतही चर्चा झाली. काही तरुणांनी या हेल्प लाईनचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. या हेल्प लाईनवरुन जिल्हाधिकारी स्वत:च अनेक प्रकरणात नागरिकांशी संपर्क साधत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डोंगरे यांनी तर संचालन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. यावेळी शेतक-यांना लोकराज्य, आपला जिल्हा चंद्रपूर आणि महाकर्ज माफीवरील मी मुख्यमंत्री बोलतोय आदी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
000
No comments:
Post a Comment