चंद्रपूर, दि.02 सप्टेंबर- चंद्रपूर जिल्हयात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे (बीआरटीसी) ‘बांबू गणपती बाप्पा’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम करण्यात आला. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा बांबू पासून गणपती बनविणारा उपक्रम सुरु करणारी ही पहिलीच संस्था आहे. बांबू पासून गणपती या उपक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याहस्ते तर अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकूल त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
बांबू प्रशिक्षण केंद्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादपर्व अंतर्गत मुल रोडवरील बांबू संशोधन केंद्रामध्ये गणेशउत्सवा दरम्यान बांबूपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी 14 शाळांच्या शिक्षक व विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. राज्य शासन जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलवत असून यासाठी राज्यभर सुरु असलेल्या शैक्षणिक सुधारणांची माहिती त्यांनी दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुरु केलेल्या संवादपर्वाचे कौतुक केले असून सामान्य नागरिक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या संदर्भातील विविध योजनाबद्दल त्या त्या समुदायात जावून संपर्क साधण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
सदरच्या उपक्रमात 14 शाळांमधील 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 114 बांबू गणपतीच्या मुर्त्या बनविण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही विद्यार्थ्यांशी हीतगुज करुन त्यांना बांबूवर आधारीत गणपती बनविण्याकरीता शुभेच्छा दिल्या. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल वातावरणातील अपूरक बदल यास एक पर्याय म्हणून बांबूच्या गणपतीचा विचार केला जाऊ शकतो. या उपक्रमातून बांबूबद्दल प्रेम व त्याविषयीचे ज्ञान संपादन करण्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली जावी जेणेकरुन या संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या विविध नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाकडे त्यांचे लक्ष वेधले जाऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांनी बांबूपासून बनविलेल्या गणपतीचे प्रदर्शन सुध्दा या संस्थेमार्फत भरविण्यात येईल. तसेच उत्कृष्ट मुर्ती बनविणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल, अशी माहिती संचालक राहूल पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाचे नियोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील वनपाल एस.एन.हनफी यांनी केले.
बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्याकरीता तसेच शास्त्रोक्त पध्दतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रसार करण्यासाठी तसेच बांबूवर आधारीत स्वयंरोजगाराची नवीन संधी उपलब्ध करणे, स्थानिक कारागीरांना तंत्रज्ञानाचा वापर करुन मुल्यवर्धीत बांबू वस्तु तयार करणे, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 209 प्रशिक्षणार्थींना बांबूपासून विविध वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून बांबूपासून राष्ट्रध्वज, ढाल-तलवार, स्मृती चिन्ह, लाल-टेन, समई, टेबल लॅम्प, लॅम्प शेड, स्टडी टेबल, पोडीयम व इतर शोभीवंत वस्तूंची निर्मिती होत आहे. तसेच या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संलग्नतेने 2 वर्षाचा डिप्लोमा इन बांबू टेक्नोलॉजी हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये बांबूच्या विकासासाठी व बांबूवर आधारीत समुदायाच्या विकासासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबूपासून तयार होणारी आगळीवेगळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वास्तु चिचपल्ली येथे साकार होत आहे. या संस्थेची वाटचाल बांबू विकास मंडळ नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी व चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील यांचे नेतृत्वात सुरु आहे.
000
No comments:
Post a Comment