Search This Blog

Wednesday, 13 September 2017

सामान्य रूग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी दिशाभूल करणारी सामान्य रुग्णालयात उत्तम आरोग्य व्यवस्था


चंद्रपूर, दि.11 सप्टेंबर – चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दर महिन्याला एक हजाराच्या जवळपास प्रसूती होते. या प्रसुतीमध्ये नवजात शिशुमधील प्रसुतीपूर्वीचे काही जटील आजार त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात. त्यामुळे केवळ सुविधा व डॉक्टर अभावी रुग्णालयात नवजात शिशुंचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे म्हणणे जनतेमध्ये भिती पसरवणारे असल्याचा खुलासा जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ.एम.जे.खान यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमामध्ये या संदर्भातील लोकांमध्ये सभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी असून बालमृत्यूच्या संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील संख्या वैद्यकीय दृष्टया घाबरुन जाण्यासारखी नाही. या ठिकाणी मोठया संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने आकडेवारी अधिक वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य ठिकाणावरुनही प्रसूतीसाठी महिन्याला किमान एक हजार रुग्ण दाखल होतात. यापैकी 125 ते 150 शिशुमध्ये गर्भातील काही गंभीर आजार असतात. यामध्ये बाळ कमी दिवसाचे असणे, कमी वजनाचे असणे, आईच्या गर्भामध्ये जन्मापूर्वीच बाळाकडून विष्ठा सोडली जाणे, ऑक्सीजनचा कमी पुरवठा असणे, हृदय किंवा अन्य अवयवांची पुरेसी वाढ नसणे आदींचा समावेश असतो. प्रसूतीमध्ये हजार बालकांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर आजाराची 10 ते 15 टक्के शक्यता कायम असते. त्यामुळे या रुग्णालयातील एक हजार रुग्णामागे होणा-या या अघटीत घटना आहेत.
प्रसूती विभागामध्ये नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) पूर्णक्षमतेने कार्यरत असून चंद्रपूर मधील कोणत्याही खाजगी रुग्णालयापेक्षा या ठिकाणी इतक्यामोठया संख्येतील रुग्णांसाठी सर्व सुविधा पूर्ण आहेत. अतिदक्षता विभागात सहा डॉक्टर कायम तैनात असून प्रसूती विभागात अन्य सहा डॉक्टर कार्यरत आहेत. या रुग्णालयामध्ये येणा-या रुग्णांची संख्या त्यातही दवाखान्याशिवाय घरामध्ये किंवा अन्यत्र होणा-या प्रसूतीनंतर दाखल होणा-या बालकांची संख्या 125 ते 150 दर महिन्याला असते. या बालकांना दवाखान्यात पोहचण्यापर्यंत अनेक वेळा गंभीर आजारांची लागण होते. जवळपास एक हजारामध्ये 250 ते 300 बालकांना अतिदक्षता विभागात ठेवावेच लागते. त्यामुळे हजार बालकांच्या मागे किमान 250 ते 300 नवजात शिशूंना प्रसुतीपूर्वी व प्रसुतीनंतर धोका असतो. आधुनिक वैद्यकीय सुविधांच्या मार्फत ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  सामान्य रुग्णालयात गरीबातील गरीबांसाठी उत्तम सेवा असून त्याचा उपयोग नागरिकांनी घ्यावा. चुकीच्या माहितीवरुन गैरसमज करुन घेवू नये, असा खुलासा डॉ.खान यांनी केला आहे.  
यावेळी त्यांनी गेल्या तीन वर्षातील नवजात शिशुंच्या मृत्यूचा दर संदर्भ म्हणून दिला असून (एक हजार नवजात बालकामागे) त्यांच्यानुसार सन 2015 ला 10.6 टक्के, 2016 ला 11.9 टक्के तर 2017 या कालावधीत आतापर्यंत 11.3 टक्के मृत्यूदर आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रापेक्षा भारताने यामध्ये प्रचंड कपात गेल्या काही वर्षात घडवून आणली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील ही टक्केवारी अन्य जिल्हयाच्या तुलनेत कमी असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. सोबतच या ठिकाणच्या वैद्यकीय सेवा व सुविधा वाढविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नावाडे आदी वरिष्ठ अधिकारी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.
000

No comments:

Post a Comment