Search This Blog

Thursday 14 September 2017

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यवस्थेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर, दि.13 सप्टेंबर – जिल्हयातील गरीबातील गरीब नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील यंत्रणा कटीबध्द असून नागरिकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची करडी नजर यंत्रणेवर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरिष्ठ अधिका-यांच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी या ठिकाणच्या प्रसूतीगृहाच्या संदर्भातील कामकाज पाहणा-या डॉक्टर व वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करुन नागरिकांनी या ठिकाणच्या सुविधाबद्दल आश्वस्त असावे, असे स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर येथील सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाचे सूत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, बालरोग तज्ञ डॉ.एम.जे.खान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर सोनारकर, डॉ.श्रीरामे, डॉ.प्रिती प्रियदर्शनी, डॉ.बेंबे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिका-यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूतीविभागातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी गेल्या पाच वर्षातील प्रसूती व नवजात मृत्यूबाबतची आकडेवारी जाणून घेतली. चंद्रपूर जिल्हयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून गडचिरोली, यवतमाळ जिल्हयातून मोठया प्रमाणात रुग्ण येत आहे. यामध्ये दवाखान्याबाहेर होणा-या प्रसूतीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्यावी, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी  आपल्यास्तरावरील यंत्रणा बळकट करण्याबाबत निर्देश दयावे, असे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अन्य वैद्यकीय व बांधकाम विषयक कामकाजाचाही आढावा घेतला. यावेळी बालरोग तज्ञ डॉ.एम.जे.खान यांनी बालमृत्यूच्या संदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील संख्या वैद्यकीय दृष्टया घाबरुन जाण्यासारखी नाही. या ठिकाणी मोठया संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने आकडेवारी अधिक वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयातील दुर्गम भागातील रुग्णांना येथे पोहचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे प्रसूती संदर्भातील रुग्णांची अधिक काळजी स्थानिक पातळीवर घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनारकर यांनी बालमृत्यूच्या कारणांची चर्चा केली, ते म्हणाले.
 प्रसूतीनंतरच्या मृत्यूमध्ये बाळ कमी दिवसाचे असणे, कमी वजनाचे असणे, आईच्या गर्भामध्ये जन्मापूर्वीच बाळाकडून विष्ठा सोडली जाणे, ऑक्सीजनचा कमी पुरवठा असणे, हृदय किंवा अन्य अवयवांची पुरेसी वाढ नसणे आदींचा समावेश असतो. प्रसूतीमध्ये हजार बालकांमध्ये अशा प्रकारच्या गंभीर आजाराची 10 ते 15 टक्के शक्यता कायम असते. त्यामुळे या रुग्णालयातील एक हजार रुग्णामागे होणा-या या दुर्दैवी घटना आहेत. यावेळी त्यांनी प्रसूती विभागामध्ये नवजात शिशूंचा अतिदक्षता विभाग (एसएनसीयू) पूर्णक्षमतेने कार्यरत असून  या ठिकाणी सहा डॉक्टर कायम तैनात असून प्रसूती विभागात अन्य सहा डॉक्टर कार्यरत आहेत. जवळपास एक हजारामध्ये 250 ते 300 बालकांना अतिदक्षता विभागात ठेवावेच लागते. त्यामुळे हजार बालकांच्या मागे किमान 250 ते 300 नवजात शिशूंना प्रसुतीपूर्वी व प्रसुतीनंतर धोका असतो, असे सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बळकटी करणासाठी आवश्यक सूचना करण्याचे यावेळी सांगितले. तथापि, कोणत्याही परिस्थितीत सामान्यातील सामान्य नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी अधिक जागरुकतेने सल्ला देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  
000

No comments:

Post a Comment