चंद्रपूर दि.2
सप्टेंबर- जिल्हयातील पायाभूत सुविधांमध्ये
नवनव्या वास्तुंची भर पडत असून आता लवकरच मुल पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय
भवनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या इमारतीच्या
बांधकामास ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
महाराष्ट्रातील
एक महत्वपूर्ण शहर म्हणून आणि सर्वाधिक आधुनिक तालुक्याचे गाव म्हणून मुल शहराचा
विकास करण्याचा संकल्प ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. नुकतेच 15 ऑगस्टला मुल येथील इको पार्कचे उदघाटन
करण्यात आले होते. मुल हे जिल्हयातील तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून या ठिकाणी
मा.सा.कन्नमवार स्मारक मुल शहरात कर्मवीर मा.सा. कन्नमवारांचे
स्मारक व सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद
मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून शहरात सीसीटीव्ही सर्व्हेलंस
सिस्टीम स्थापीत करण्यात आली आहे. 6 कोटी रू. निधी खर्चून तालुका क्रिडा संकुल
तयार होणार असुन 11 कोटी रू. किमतीच्या आठवडी बाजाराच्या कामाला सुध्दा लवकरच
सुरुवात होणार आहे. शहराच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण
करण्यात आले आहे. मुल शहरातील अत्याधुनिक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट ठरणार
आहे. लवकरच मुल हे 24 तास नळाचे पाणी देणारे शहर ठरणार आहे. ग्रामीण भागातही
विकासाची विविध कामे वेगाने सुरू असून चिचडोह प्रकल्प 2018 पर्यंत सुरू होणार
आहे. माजी मालगुजारी तलावासाठी 150 कोटी रूपये निधी शासनाने दिला आहे. मागेल त्याला
विहीर या योजनेचा लाभ शेतक-यांना दिला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या
माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून याकरिता 5 कोटी निधी मंजूर
करण्यात आला आहे. तालुक्यात प्रत्येक गावात शुध्द पाण्याची आरो मशिन लावण्यात
येणार आहे.
मुल येथे
तयार होणा-या पंचायत समितीच्या इमारतीला 7 कोटी 96 लक्ष 59 हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात
आली आहे. यामध्ये नव्या इमारतीमध्ये महिला पदाधिका-यांसाठी प्रसाधन गृहासह, महिला विश्रांती कक्षाची व्यवस्था
करण्यात येणार असून नैसर्गिक प्रकाश योजना व पाण्याची काटकसर तसेच जलपुर्नभरण आणि
जास्तीत जास्त पर्यावरण पुरक बांधकाम साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. या
इमारतीमध्ये अपंगाच्या सोईसुविधाच्या दृष्टीने विशेष लक्ष घालण्यात येणार आहे. दोन
मजली या इमारतीमध्ये 1051 चौ.मी.बांधकाम क्षेत्रात बांधकाम करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment