पालकमंत्र्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश
चंद्रपूर, दि.01 सप्टेंबर- चंद्रपूर शहरातील व जिल्हयातील सामान्य नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अशा पध्दतीचे नियोजन करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
चंद्रपूर महानगर व जिल्हयातील सर्व नगरपालिका यामध्ये यावर्षीच्या आतापर्यंतच्या पावसाची उपलब्धता बघता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पाणी टंचाई संदर्भात सामान्य नागरिकांना सद्याच कुठल्याही कपातीला सामोरे जाण्याचे काम पडू देऊ नका. उपलब्ध असलेल्या जलसाठयाचे बळकटीकरणाची मोहिम पुढील काही दिवस राबविण्याचे नियोजन करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव त्यांनी नाकारला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या आरक्षित पाण्याचा साठा प्रसंगी वापरला तरी चालेल. मात्र शहरातील सामान्य नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी त्रास होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. या जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करत असतांना या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत देखील पुढील अनेक वर्षात समस्या राहू नये, यासाठी धानोरा-आमडी या ठिकाणच्या बॅरेजचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमध्ये महानगरपालिकेने सुचविलेल्या उपाय योजनांना मर्यादित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौर अंजली घोटेकर आणि आयुक्त संजय काकडे यांना दिले. संभाव्य पाणी टंचाई बघता पाणी पुरवठा एक दिवस आड करणे, नवीन नळ कनेक्शन बंद करणे आदी प्रकार करु नका. शहराच्या पारंपारिक पाणीसाठयाचा योग्य वापर करण्याची उपाययोजना शोधा असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विद्युत वितरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिकेच्या अधिका-यांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. शहरातील पाणी पुरवठयासाठी पाऊस न झाल्यास चारगांव धरण, लालनाला प्रकल्प, गोसेखूर्द प्रकल्प, माना खाण, धानोरा स्त्रोत आदी ठिकाणच्या शक्यता तपासून पाहण्यात आल्या. या संदर्भात 6 सप्टेंबरला पुन्हा बैठक होणार असून संभाव्य पाणी टंचाईवर यामध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आमदार नाना शामकुळे, ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नियति ठाकर, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे उपस्थित होते. याशिवाय सर्व नगरपालिका व नगर पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील सर्व शहरांचा आढावा घेण्यात आला. जिल्हयातील सर्व स्थानिक संस्थांनी पाणी टंचाईच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेता पारंपारिक स्त्रोतांना बळकटी देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
0000
No comments:
Post a Comment