Search This Blog

Wednesday 6 September 2017

विद्यार्थ्याना ज्ञान देण्यासह समाज घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे -- ना.सुधीर मुनगंटीवार



शिक्षक दिनानिमित्त 16 आदर्श गुरुजनांना जिल्हा शिक्षक पुरस्कार

       चंद्रपूर, दि.05 सप्टेंबर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतांनाच समाज घडविण्याचे उत्तम कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. 
यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती क्रिष्णाजी सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राम गारकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकरआदी मान्यवर उपस्थित होते.
            शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु असतो तसाच समाजामध्ये परिवर्तन घडविण्याचेही शिक्षक मोलाचे कार्य करीत असल्याने पूर्वी शिक्षकाकडे समाज सुधारक म्हणूनच  बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन होता. त्याच भावनेतून आताही शिक्षकांनी कार्य केल्यास देशाला आकार देण्यात मोठे योगदान शिक्षकांचे राहील असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात आदर्श निर्माण होईल अशा पध्दतीने चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सर्व प्रकारच्या मूलभूत व भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सहा हजार शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व सहा हजार शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी पात्र ठरतील , असे त्यांनी सांगितले.
            चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या शेतकरी, शेतमजूर व गरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देवून मोठया उंचिवर नेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केले. तसेच सर्व शिक्षकांनी पुढे येवून ज्ञानार्जनाचे योग्य काम केल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी मुलांना शोधून आण्याची पाळी येणार नाही, असेही ते म्हणाले. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे यांनी ही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
            यावेळी  शंकर आत्राम, बाबुराव डोंगरवार, ज्योती लहामगे, अनंता भोयर, सिमा भसारकर, आकाश झाडे, मंजुषा साखरकर, रविंद्र उरकुडे, मधुकर वाटेकर, विलास सावसाकडे, हिशोद तुरे, बंडू डाखरे, बाबा कोडापे, कविराज मानकर व भाऊराव तुमडे या जिल्हा परिषदेच्या 15 प्राथमिक शिक्षकांचा तर माध्यमिक शिक्षिका संगीता घोडेस्वार या सर्वांना सन 2017-18 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या 24 शाळांना आयएसओ नामांकन मिळाला असून त्यापैकी प्राथमिक स्वरुपात तीन शाळेतील शिक्षकांचाही सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राम गारकर यांनी तर संचालन शिक्षण विस्तार अधिकारी अर्चना कासीरकर यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षण व क्रिडा समितीचे सदस्य पृथ्वीराज अवताडे, रणजित सोयाम, गोपाळा दडमल, नितु चौधरी, रोशनी खान, कल्पना पेचे, योगीराज डबले, मेघा नवले, तसेच अधिकारी, कर्मचारी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                                                0000  

No comments:

Post a Comment