Search This Blog

Thursday, 1 October 2026

एसआयआर मोहीम : दावे व हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


 एसआयआर मोहीम : दावे व हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Ø नोटीस मिळालेल्या मतदारांना तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही

Ø मतदान केंद्रे, महाविद्यालये, उद्योग व विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 01 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)-2026 अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ‘नो मॅपिंग’ अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत.

मतदार यादीतील जुळवणी न झालेल्या अथवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना नोटीस प्राप्त झाली असल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) अथवा तहसील कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणीसाठी येण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी नोटीस मिळालेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. संबंधित बीएलओ मतदारांच्या घरी भेट देऊन ती संकलित करतील. मतदारांना व्हॉट्सअॅप अथवा उपलब्ध ऑनलाइन माध्यमातूनही कागदपत्रे सादर करता येतील.

तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांत केवळ संबंधित विसंगतीपुरती आवश्यक कागदपत्रे, बीएलओचा पडताळणी अहवाल अथवा पंचनाम्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल. विहित कागदपत्रे उपलब्ध नसतील किंवा सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसेल, अशा अपवादात्मक प्रकरणांत शक्यतो ऑनलाइन सुनावणी घेतली जाईल. सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकेल.

अंतिम निर्णयापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पुरेशी संधी दिली जाईल. तसेच आवश्यक प्रकरणांची माहिती राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना देऊन कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार आहे.

3, 4, 10 व 11 ऑक्टोबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे : दावे व हरकतींच्या वाढीव कालावधीत एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 3 व 4 ऑक्टोबर तसेच 10 व 11 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या दिवशी संबंधित बीएलओ मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. शिबिरांमध्ये नवीन मतदारांची नमुना 6 द्वारे नोंदणी, प्रारूप मतदार यादीतील नावाची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी नमुना 8, तसेच नोटीस प्राप्त मतदारांची आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध असेल.

5 ते 9 ऑक्टोबरदरम्यान महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम : जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये 5 ते 9 ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी नमुना 6 द्वारे ऑनलाइन करण्यावर भर दिला जाणार आहे. औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील पात्र नागरिकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

घरबसल्या ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्या : मतदारांना प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासणे, नवीन नोंदणीसाठी नमुना 6 तसेच दुरुस्तीसाठी नमुना 8 ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाचे Voters' Services Portal तसेच ECINET आणि Voter Helpline App या डिजिटल सुविधांचा वापर करता येईल. एसआयआर संदर्भात शंका, मतदार यादी, नोटीस, नोंदणी अथवा शिबिरांची माहिती मिळविण्यासाठी 1950 मतदार हेल्पलाईन उपलब्ध आहे.

पात्र मतदाराचे नाव घाईगडबडीने वगळले जाणार नाही : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही पात्र मतदार, मतदार यादीतील समावेशनापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरेशा पुराव्याअभावी कोणताही प्रतिकूल निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

त्यामुळे नोटीस मिळालेल्या मतदारांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी करू नये. नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील बीएलओशी संपर्क साधावा, आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा किंवा ऑनलाइन सुविधांचा वापर करावा. कोणत्याही अफवा अथवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

0000000

आचारसंहितेमुळे 5 ऑक्टोबरचा लोकशाही दिन रद्द

 आचारसंहितेमुळे 5 ऑक्टोबरचा लोकशाही दिन रद्द

चंद्रपूर, दि. 01 : ऑक्टोबर महिन्याचा पहिला सोमवार 5 ऑक्टोबर 2026 रोजी येत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दुपारी 1 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. 5 ऑक्टोबर रोजी नियोजित लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार होता. तथापि, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने या महिन्यातील लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर

Ø सेवा संकल्प अभियानांतर्गत 6 ते 16 ऑक्टो. दरम्यान आयोजन

चंद्रपूर, दि. 01 : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. सदर शिबिर हे तालुकास्तरावर 6 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत आयेाजित केले जातील.

उमेदचे तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी/कर्मचारी, बचत गटातील महिला तसेच बँक सखी उपस्थित राहून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील युवक-युवतींना या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर येथील अधिकारी सुध्दा या शिबिरांना उपस्थित राहून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनेची माहिती देतील. तसेच पात्र युवक-युवतींचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत युवक-युवती, बचत गटातील महिलांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

असे आहे तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिरांचे वेळापत्रक : 6 ऑक्टो. रोजी चंद्रपूर पंचायत समिती कार्यालय (वेळ दु. 12 वा.) आणि बल्लारपूर पंचायत समिती कार्यालय (वेळ दु. 3 वा.), 7 ऑक्टो. रोजी मूल पं.स. कार्यालय (वेळ दु. 12.30 वा.) आणि सावली पं.स. कार्यालय (वेळ दु. 3.30 वा.), 8 ऑक्टो. रोजी सिंदेवाही पं.स. कार्यालय (वेळ स. 11.30 वा.) आणि नागभीड पं.स. कार्यालय (वेळ दु. 2 वा.), 7 ऑक्टो. रोजी मूल पं.स. कार्यालय (वेळ दु. 12.30 वा.) सावली पं.स. कार्यालय (वेळ दु. 3.30 वा.) ब्रम्हपुरी प.स. कार्यालय (वेळ दु. 4 वा.), 9 ऑक्टो. रोजी पोंभुर्णा पं.स. कार्यालय (वेळ दु. 12.30 वा.) आणि गोंडपिपरी पं.स. कार्यालय (वेळ दु. 3.30 वा.), 12 ऑक्टो. रोजी भद्रावती पं.स. कार्यालय (वेळ दु. 12.30 वा.) आणि वरोरा पं.स. कार्यालय (वेळ दु. 3.30 वा.), 14 ऑक्टो. रोजी राजुरा पं.स. कार्यालय (वेळ दु. 12.30 वा.) आणि कोरपना पं.स. कार्यालय (वेळ दु. 3 वा.), 15 ऑक्टो. रोजी चिमूर पं.स. कार्यालय (वेळ दु. 3 वा.) आणि 16 ऑक्टो रोजी जिवती पं.स. कार्यालय येथे (वेळ दु. 3 वा.) आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी कळविले आहे.

००००००

दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी

 



दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह

नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी

Ø अपर जिल्हाधिका-यांसह अधिका-यांच्या देवाडा व नागाळा येथे क्षेत्रभेटी

चंद्रपूर, दि. 01 : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. याच अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी चंद्रपूर तालुक्यातील देवाडा व नागाळा गावांना भेट देऊन ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेल्या पीक पंचनाम्याच्या कामाचाही आढावा घेतला.

शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थिती अचूकपणे नोंदवून पीक पंचनामे तसेच ई-पीक पाहणीचे काम तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष आणि वस्तुनिष्ठ नोंद होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषी, महसूल आणि ग्राम प्रशासन विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने संवेदनशीलपणे आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिले.

देवाडा येथील शेतकरी जयराम मारुती पिपरे यांच्या गट क्र. 143 मधील कापूस पिकाची डीसीएच ॲपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात आली. तसेच नागाळा (सी.) येथील शेतकरी किसन वैद्य यांच्या शेतातील कापूस, धान व भाजीपाला पिकांची पाहणी करून पाण्याच्या कमतरतेमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली.

कमी पर्जन्यमानामुळे कापूस पिकामध्ये फुलगळ, पातगळ तसेच बोंडांची संख्या कमी झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये सुमारे 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. धान पिकाची वाढही खुंटलेली दिसून आली. याशिवाय भाजीपाला, तूर व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेवरही कमी पर्जन्यमानाचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोलीस पाटील, सर्व्हेअर तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.

००००००

7 ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजन

7 ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 01 : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनातसुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार आणि मंडळ स्तरावर 7 ऑक्टो 2026 रोजी ‘महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी राहील प्रक्रिया : 1) सुनावणीचे वेळी तडजोड योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यांवर अंतिम आदेश पारीत करून प्रकरण कायमस्वरुपी निकाली काढण्यात येईल 2) महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान मध्ये प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रकरणांची सुनावणी ही एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

 जिल्हाधिका-यांचे आवाहन : या लोक अदालतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची महसूल संदर्भात प्रकरणे असतील, त्या नागरिकांनी अधिवक्त्यांमार्फत या लोक अदालतीमध्ये सदर प्रकरणे ठेवावी. अधिवक्त्यांनी सुध्दा पुढाकार घेऊन आपसी तडजोडीची प्रकरणे महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढावी. जेणेकरून पक्षकांराचा वेळ आणि पैसा वाचेल व प्रकरण निकाली निघाल्याचे समाधान पक्षकारांना मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

०००००००

विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

 विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 01 :  सेवा संकल्प कार्यक्रमाअंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा योजना तसेच पाणी गुणवत्तेबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने ऊर्जानगर येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूल, राजीव गांधी विघालय वरवट, इंदिरा गांधी विघालयल पडोली येथे  इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर येथे भेट देऊन गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी कशी केली जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. पाण्याचे नमुने घेण्याची पद्धत, पाण्यातील विविध घटकांची तपासणी तसेच सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. एफटीके कीट व्दारे गावपातळीवर पाणी नमुने कसे तपासल्या जातात, याबाबतही माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणे, दूषित पाण्यामुळे होणारे संभाव्य धोके ओळखणे आणि नागरिकांमध्ये पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती निर्माण करणे, या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील विविध तपासणी प्रक्रिया उत्सुकतेने जाणून घेतल्या. यावेळी तिनही शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते. 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प संचालक मच्छींद्रनाथ धस व वरिष्ठ भुवैज्ञानिक लिन बाराहाते यांच्या मार्गदर्शनाखाली  सोनाली इंगळे (रसायनी), नितीन सपाटे (अनुजीव तज्ञ), रजनी पिंपळकर (प्रयोगशाळा सहाय्यक), अंजली डाहुले (जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार ), राखी बोबडे (उपविभाग पाणी गुणवत्ता सल्लागार, राजुरा), तेजल महाडोळे  यांनी विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीच्या विविध बाबींची माहिती दिली.

०००००००

#सेवा_संकल्प_अभियान

कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात


कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात

Ø एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक स्थळांची स्वच्छता

चंद्रपूर, दि. 01 : महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावात महाश्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, युवक, महिला आणि विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेकडो नागरिक स्वच्छतेसाठी पुढे आले. हातात झाडू आणि स्वच्छता साहित्य घेत नागरिकांनी सार्वजनिक परिसर, रस्ते, शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले.

महाश्रमदान मोहिमेत गावकऱ्यांसोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला. गावातील सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे एकाच दिवशी जिल्ह्यातील विविध गावांमधील अनेक सार्वजनिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनावी, यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महाश्रमदानाच्या माध्यमातून सामूहिक सहभाग, श्रमदान आणि स्वच्छतेची जबाबदारी यांचा प्रभावी संदेश गावागावात पोहोचला.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातील सर्व उपक्रम यशस्वी करा : चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या सहकार्याने महाश्रमदान मोहीम मोठ्या उत्साहात राबविता आली. गावागावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी दाखविलेला सहभाग कौतुकास्पद आहे. स्वच्छता ही सेवा अभियानातील सर्व उपक्रम प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त गाव निर्मितीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले.

००००००

#सेवा_संकल्प_अभियान

वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात

 वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात

Ø सेवा संकल्प अभियानांतर्गत डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट

चंद्रपूर, दि. 01 : सेवा संकल्प अभियानांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी वृद्धांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार आणि तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी गुरुवारी (दि. 1) वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक गरजा तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभाबाबत माहिती घेतली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. वृद्धाश्रमातील पात्र नागरिकांना या योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून द्यावा. तसेच त्यांच्या प्रलंबित समस्या व अडचणींचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी थेट वृद्धाश्रमात येऊन आपुलकीने विचारपूस करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक श्री. बोम्मेवार, मंडळ अधिकारी श्री. वरभे, तलाठी श्री. उगलमुगले, श्री. सोळंके तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

००००००