Search This Blog

Friday 30 December 2022

आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी विनय गौडा

 


आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे

-जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर, दि. 30 :भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ नाशिक व अमरावती विभाग आणि शिक्षक मतदार संघ औरंगाबाद, नागपूर व कोकण विभागामध्ये द्विवार्षिक निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षक मतदार संघ नागपूर विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचारसंहिता दि. 29 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात राजकीय पक्षासोबत सभा व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाडगे, नायब तहसीलदार श्री. गभने, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, तसेच सर्व पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ, महाराष्ट्र विधान परिषदेचे सध्याचे आमदार नागो पुंडलिक गाणार असून त्यांचा निवृत्ती दि. 7 फेब्रुवारी 2023 आहे, त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नामनिर्देशन स्वीकारण्याचा दि. 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 पर्यंत राहील. छाननी दि. 13 जानेवारी रोजी तर नामनिर्देशन माघार घेण्याचा अंतिम दि. 16 जानेवारी 2023 रोजी राहील. मतदानाचा दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील तर मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर हे राहतील. तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर असतील. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील मागील 2017 मधील एकूण मतदार संख्या ही 5,638 तर सन 2022 मध्ये नोंदणी झालेल्या एकूण मतदाराची संख्या 7,460 आहेत. त्यापैकी पुरुष मतदार 4,854 तर स्त्री मतदार 2,606 आहेत. मागील मतदाराच्या संख्येत एकूण 1822 ने वाढ झाली आहे. एकूण मतदान केंद्र संख्या 27 असून मतदान केंद्र क्रमांक 80 ते 106 असेल. आदर्श आचारसंहिता दि. 29 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आली असून त्याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करेणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कळविले आहे.

000000


Thursday 29 December 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा साक्षीदार संरक्षण समितीचा आढावा

 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा साक्षीदार संरक्षण समितीचा आढावा

चंद्रपूर, दि. 29:  साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र साक्षीदार संरक्षण व सुरक्षा अधिनियम 2017 च्या प्रयोजनासाठी जिल्हास्तरीय जिल्हा साक्षीदार संरक्षण समिती गठीत करण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा साक्षीदार संरक्षण समितीची बैठक पार पडली.

यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उपअधीक्षक गृह राधिका फडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघमोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, समितीतील सदस्यांनी जसे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व  जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी योग्य समन्वय साधून साक्षीदाराबाबत योग्य माहिती प्राप्त करून शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावे. न्यायालयीन प्रकरणामधील साक्षीदार यांनी न घाबरता किंवा कोणाच्याही दडपणाखाली न राहता सत्यकथन करावे. यासाठी शासनामार्फत योग्य ती मदत देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शासनाविषयी चांगले मत, निर्माण होण्यास मदत होईल.

16 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच 25 एप्रिल 2018 रोजीच्या अधिसूचनेद्वारे दिलेल्या उपरोक्त विषयांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय जिल्हा साक्षीदार संरक्षण समिती नेमण्यात आली असून या समितीमध्ये जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सदस्य तर पोलीस उपअधीक्षक(मुख्यालय)/ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) हे सदस्य सचिव तर जिल्हा सरकारी अभियोक्ता हे सदस्य आहेत.

ही आहेत जिल्हा साक्षीदार संरक्षण समितीचे अधिकार व कार्ये:

सदर समितीने समितीच्या अधिकार क्षेत्रातील साक्षीदारांना दिलेल्या संरक्षणाचे सनियंत्रण करणे, कोणाला संरक्षण द्यावे याबाबत निर्णय घेणे आणि अशा संरक्षणाची व्याप्ती व स्वरूप ठरविणे. साक्षीदाराच्या संरक्षणासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे. साक्षीदारांच्या संरक्षणासाठी संबंधित पोलीस ठाण्याला आवश्यक ते निर्देश देणे. राज्य समितीकडून प्राप्त झालेल्या आदेशांवर आवश्यक उपाययोजना करणे. तसेच संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेणे. साक्षीदारांच्या संरक्षणाबाबत शासनाला व राज्य समितीला आवश्यक ती माहिती पुरविणे तसेच ज्यांना संरक्षण देण्यात आले आहे किंवा ज्यांचे संरक्षण काढुन टाकण्यात आले आहे, अशा साक्षीदारांचा अभिलेख ठेवणे. विहित करण्यात येतील असे इतर कोणतेही अधिकार व कार्य पार पाडणे आदी या समितीचे अधिकार व कार्ये आहेत.

000000

शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते समस्या सोडवणुकीसाठी रस्ता लोक अदालतीचे आयोजन

 शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते समस्या सोडवणुकीसाठी

रस्ता लोक अदालतीचे आयोजन

चंद्रपूर, दि. 29 : शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता शेत रस्ते असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असतांना ग्रामीणस्तरावर अनेक ठिकाणी सदर शेत रस्ते अडविल्याचे तसेच अतिक्रमण केल्याचे तक्रारी वरोरा तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या.  सदर अडचणी विहित वेळेत सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यादृष्टीने कामकाज मोहीम स्वरूपात राबविण्याचे निश्चित करण्यात आले. दि. 16 डिसेंबर 2022 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये रस्ता लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने, 28 डिसेंबर रोजी तालुक्यातील तीन मंडळस्तरावर प्रत्यक्षपणे लोक अदालत घेण्यात आली. सदर लोकअदालतीमध्ये माढेळी मंडळ, शेगाव मंडळ, खांबाळा येथील एकूण 48 इतकी प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली. सदर मोहिमेला नागरिकांमार्फत प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मंडळस्तरावर येऊन प्रत्यक्ष शेत रस्त्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही मोहीम आयोजित केल्याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रमात निकाली निघालेल्या प्रकरणांचे आदेश 5 जानेवारी 2023 रोजी तहसीलमधून वाटप करण्यात येणार आहेत. बैठकीला संबंधित मंडळाचे तलाठी, मंडळ अधिकारी, संबंधित मंडळाचे लिपिक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

00000

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाबाबत आढावा

                जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाबाबत आढावा

चंद्रपूर, दि. 29 : 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.या समारंभाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडणार असून दरवर्षी प्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी संबंधित विभागांनी यशस्वीपणे पार पाडावी. अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वतयारी बाबत आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.

बैठकीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, मनपा उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार निलेश गौंड, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, नायब तहसीलदार सुभाष चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, दरवर्षीप्रमाणे प्रत्येक विभागाकडे कार्यक्रमासंबंधीची जबाबदारी दिलेली असते त्या अनुषंगाने ती यशस्वीपणे पार पाडावी. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आदीं व्यवस्था करून घ्यावी. विभागनिहाय उत्कृष्ट कार्य पुरस्कार द्यावयाचे असल्यास संबंधित विभागांनी सदर नावांची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे 20 जानेवारीपर्यंत सादर करावी. राज्य शासनाकडून सदर कालावधीत कोविड संदर्भात काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्या अनुषंगाने कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल.

000000

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बांबू उत्पादनांना स्थान देण्याची पालकमंत्र्यांची रेल्वेकडे मागणी

                     बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बांबू उत्पादनांना स्थान देण्याची

पालकमंत्र्यांची रेल्वेकडे मागणी

चंद्रपूर, दि. 29 : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर "एक स्थानक एक उत्पादन " योजनेअंतर्गत बांबू उत्पादनांना स्थान मिळावे, अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बांबूचे मोठे उत्पादन होते. बांबूपासून विविध उत्पादनेही बनविली जातात. तसेच वन अकादमी, बांबू संशोधन केंद्र या माध्यमातूनही बांबूपासून विविध नवीन उत्पादनेही संशोधित विकसित केली जातात. या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी "एक स्थानक एक उत्पादन" योजनेचा उपयोग होईल, असे मत पालकमंत्री तथा वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. त्या अनुषंगाने श्री. मुनगंटीवार यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहून बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बांबू उत्पादनांना स्थान देण्याची मागणी केली आहे.

00000

काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी

 

काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी

Ø सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

चंद्रपूर, दि. 29 : काझीपेट-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही सध्या साप्ताहिक तत्वावर धावणारी गाडी रोज चालवावी, अशी मागणी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पुणे येथे जाण्याकरिता केवळ काझीपेट-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही एकच थेट गाडी सध्या उपलब्ध आहे. ही गाडी आठवड्यात केवळ एकच दिवस धावत असल्याने इतर दिवशी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. आजच्या काळात व्यापार उदिम आणि शिक्षणासाठी पुण्यात बरेच नागरिक ये-जा करित असतात. मात्र रोज रेल्वे उपलब्ध नसल्याने इतक्या दूरच्या अंतराचा प्रवास नाईलाजाने बसने करावा लागतो किंवा गाड्या बदलत प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर रोज धावणारी एक्सप्रेस गाडी असावी, अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी बरीच वर्षे प्रलंबित आहे. त्याअनुषंगाने सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

000000

Tuesday 27 December 2022

जिल्ह्यात “पीसीपीएनडीटी" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी विनय गौडा

 जिल्ह्यात पीसीपीएनडीटी" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

-जिल्हाधिकारी विनय गौडा

        चंद्रपूर, दि. 27: जिल्ह्यात गर्भलिंग परीक्षणास आळा बसावा तसेच स्त्री-पुरुषाचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

               जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात जिल्हा दक्षता पथकाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

               यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश्वरी गाडगे, कोरपणा वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड, डॉ. गजानन मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

               जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एखादी व्यक्ती गर्भलिंग निदान करीत असेल तर 1800 233 4475 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी अथवा माहिती द्यावी. जेणेकरून, गर्भलिंग परीक्षणास आळा बसेल. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रावर टोल-फ्री क्रमांक दर्शविणारे माहिती फलक अथवा पोस्टर लावावेत. तसेच जिल्ह्यात स्त्री-पुरुषाचे लिंग गुणोत्तर संतुलित राहण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

000000

गुप्तेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

 विधानसभा लक्षवेधी :

गुप्तेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देणार

- मंत्री सुधीर मुनगंटीवार

            नागपूर, दि.27 : मुख्यमंत्र्यांनी दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनाबाबत घोषणा केली आहे. या मंदिराच्या जतन दुरुस्तीसाठी 21 कोटी 2 लाख 70 हजार 746 रु.  इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

           मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरेसा निधी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर गुप्तेश्वर मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी असलेला आवश्यक 21 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडून सांस्कृतिक विभाग प्रलंबित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, गड किल्ले संरक्षित स्मारकासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती मधून तीन टक्के निधी याप्रमाणे पुढील तीन वर्षाकरीता या विकास कामासाठी 1 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे.

            श्री. महाकाली, श्री. मार्कंडेश्वर यांची देखभाल दुरुस्तीचे काम भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे होते. हे काम राज्य सरकारच्या अखत्यारीत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            गुप्तेश्वर मंदिर हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात धारासूर या गावात आहे. हे शिवमंदिर असून गोदावरी नदीच्या काठावर आहे. या मंदिराची निर्मिती यादव कालखंडात 12-13 व्या शतकात झाली आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्वेस मुखमंडप, दक्षिण व उत्तर बाजूस अर्धमंडप, सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिर 2.45 मी. उंच अधिष्ठानावर स्थित असून मंदिराचे बांधकाम काळ्या दगडातील सुष्कसांधी व शिखर विटांमध्ये असून ते चुन्याच्या बांधकामातील आहे. अधिष्ठानाला सुंदर अशी हत्तीका व गर्भगृहाच्या बाह्य बाजूने 37 कोरीव मुर्त्या आहेत. यामध्ये विष्णु, गणपती व सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. हे मंदिर शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रक  रू. 15 कोटीपेक्षा अधिक रकमेचे असल्याने त्यास उच्चस्तर सचिव समितीची मान्यता घेण्यात येत आहे.

            तसेच 15 व्या वित्त आयोगांतर्गत गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी रु. 8 कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि, 15 व्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाकडून यासाठी निधी मंजूर झालेला नाही.

            सदस्य श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, देवराव होळी, मनीषा चौधरी या लक्षवेधी सुचनेत सहभाग घेतला होता.

000000

कोकणातील वानरे आणि रानडुक्करांचा उपद्रवासंदर्भात उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची समिती - मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

कोकणातील वानरे आणि रानडुक्करांचा उपद्रवासंदर्भात उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची समिती 

 - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø वनविभाग तीन हजार नवीन पदभरती करणार

Ø विधानसभा लक्ष्यवेधी वरील चर्चेच्या उत्तरात दिली माहिती

नागपूर, दि. 27 : कोकणात रानटी वानरे आणि रानडुकरे यांच्यामुळे होणारे शेती फळबागा आणि घरांचे नुकसान टाळण्याकरीता उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती नियुक्त करण्यात येईल असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच वनविभागात यासाठी आवश्यक अशी तीन हजार पदांची भरती लवकरच केली जाईल असेही ते म्हणाले. या विषयात विधानसभा सदस्य योगेश कदम यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी  या दोन जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव गेली काही वर्षे वाढला आहे. त्याविषयी ही लक्ष्यवेधी होती. या लक्ष्यवेधीवरील चर्चेला उत्तर देताना श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रानडुकरांची कृषी क्षेत्रात पारध करण्याची परवानगी जिल्हा स्तरावर देण्याचे निर्देश दिले आहेत. वानरांचा उपद्रव कमी करण्याकरीता हिमाचलप्रदेश पॅटर्न राबवायचा असेल तर केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी संबंधित विधानसभा सदस्यांची एक समिती गठित करण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर कोकणातील जंगलात उंबर, रान अंजीर, बांबू आणि शेवगा हे वानरांची आवडती झाडे वाढवून त्यांना गावे व शेतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी एका सूचनेवर प्रतिसाद देतांना सांगितले.

फळबागांना वाढीव नुकसान भरपाई:

कोकणातील आंबा, काजू, राळ, पोफळी आदी फळबागांचे वानर जे नुकसान करतात, त्याची नुकसान भरपाई सध्या फारच तुटपुंजी आहे. ती राज्यातील इतर शेतीबाबत जशी दिली जाते त्या धर्तीवर देण्यासाठी सध्या समिती काम करत आहे, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की ही नुकसान भरपाई लवकरच वाढवता येईल. तसेच आंबा व काजू चा मोहोर, नारळ पोफळीचे कोवळी फळे यांचे नुकसान कसे मोजावे आणि भरपाई कशी द्यावी याची पद्धत ठरविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठित करण्यात येईल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर नुकसान भरपाईची पद्धत सोपी करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.

या लक्ष्यवेधी सूचनेवरील चर्चेत सर्वश्री योगेशजी कदम, भास्करजी जाधव, नितेशजी राणे आदी विधानसभा सदस्यांनी सहभाग घेतला.

00000

नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक

 नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक

Ø रेल्वे पोलिस व बाल संरक्षण कक्षाच्या कामगिरीमुळे बालक सुरक्षित

चंद्रपूर, दि. 27 : अहमदाबाद वरून विजयवाड़ा येथे नवजात बालकाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे पोलिसांनी केली असून त्यांच्या सतर्कतेमुळे बालक सुरक्षित आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक 25 डिसेंबर रोजी आर.पी.एफ व जी.आर.पी बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक 12655) डब्बा क्रमांक एस-3 मध्ये आरपीएफचे कर्मचारी व रेल्वे चाईल्ड लाईनचे कर्मचारी यांनी तपासणी केली असता, बर्थ क्रमांक 23 वर एक जोडपे संशयास्पद स्थितीमध्ये दिसून आले. त्यांच्याकडे अंदाजे दोन ते तीन महिन्याचे नवजात बालक आढळून आले. सदर बालकाबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते बाळ स्वतःचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जोडप्याच्या वर्तणुकीवरून ते बाळ त्यांचे नसल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे आरपीएफ बल्लारपूर यांनी सदर जोडप्याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनला उतरवून पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यांची विचारपूस केली असता पुरुषाने आपले नाव चंद्रकांत मोहन पटेल (वय 40 वर्ष, पत्ता- इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई) तर महिलेने आपले नाव द्रौपदी राजा मेश्राम (वय 40 वर्ष, पत्ता-आयबीएम रोड, धम्म नगर, गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर) असे सांगितले. त्यांच्यासोबतच दोन महिन्याचे असलेले बाळ त्यांचे नसल्याचीही कबूली त्यांनी दिली.

रेल्वे तिकीट बाबत विचारले असता अहमदाबाद ते विजयवाडा इथपर्यंतचे जनरल तिकीट नंबर डी-24 12 92 73 व डी-24 12 92 74 सादर केले. परंतु बालकाबाबत पुनश्च विचारले असता योग्य उत्तरे दिले नसल्यामुळे त्यांच्याजवळचा मोबाईल तपासण्यात आला. त्यामधील रेकॉर्ड व व्हाट्सअप चॅटिंग वरून स्पष्ट झाले की, सदर बाळ हे अहमदाबाद वरून तस्करी करून विजयवाडा येथे घेऊन जाण्यात येत होते. महिलेला अधिक विचारपूस केली असता संशयित व्यक्तीने बाळाला सोबत घेऊन जाण्याचे पाच हजार रुपये दिले होते, असे सांगितले. तर सोबत असलेल्या संशयित व्यक्तिला विचारले असता अहमदाबाद स्टेशनवर मला दोन व्यक्तीने बाळाला विजयवाडा येथे पोहोचून देण्याची जबाबदारी दिली होती, अशी कबुली दिली.

वरील प्रकरणाबाबत दोन्ही व्यक्तिंनी बरीच माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. आरपीएफ बल्लारपूरचे उपनिरीक्षक प्रवीण महाजन, महिला हेड कॉन्स्टेबल आरती यादव, आरपीएफ चंद्रपूरचे प्रवीण गाढवे, पोलीस उपनिरीक्षक ए.एस.अली तसेच डी. गौतम, अखिलेश चौधरी यांनी कार्यवाहीत भाग घेतला. कार्यवाहीदरम्यान रेल्वे चाईल्ड लाईन यांच्याकडे बाळ तात्पुरते ठेवण्यात आले. सदर बाळाची माहिती मिळताच बालकल्याण समिती चंद्रपूर आणि अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना देण्यात आली. त्यानुषंगाने महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत व पोलीस उपअधिक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनात माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी समन्वय साधून जीआरपी पोलीस उपनिरीक्षक अली यांच्यासोबत चर्चा केली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक के.एन.रॉय चंद्रपूर यांच्याद्वारे दोन्ही संशयित व्यक्तीवर रात्री उशीरा भारतीय दंड संहिता नुसार कलम 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर रेल्वे चाइल्डलाईन यांच्या सहकार्याने बालकाची शासकीय रुग्णालय, बल्लारपूर येथे वैद्यकीय तपासणी करून इतर कार्यालयीन प्रक्रिया झाल्यानंतर रेल्वे चाइल्ड लाईनचे समन्वयक भास्कर ठाकूर, समुपदेशिका त्रिवेणी हाडके, सुरेंद्र धोंडरे, अचल कांबळे व जीआरपी कर्मचारी बाळाला बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण)अधिनियम 2015 अन्वये किलबिल दत्तक योजना व पूर्व प्राथमिक बालगृह चंद्रपूर येथे काळजी व संरक्षणासाठी रात्री दाखल करण्यात आले.

दि. 26 रोजी सदर बाळाला बालकल्याण समिती समोर उपस्थित करून तात्पुरता दाखल आदेश देण्यात आला. सदर प्रकरणाची माहिती बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व पोलिस विभागाला दिली.

 

बालकांच्या तस्करी बाबत गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाला कळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन                      बालकांची तस्करी तसेच बालविवाहास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात बालकाशी निगडीत यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे. बालकांच्या तस्करी बाबत गोपनीय माहिती प्रशासनाला कळविल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच बालकांचे भविष्य सुरक्षित करता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. बालकांच्या तस्करीच्या घटना तसेच आपल्या परिसरात लैंगिक अपराध व  बालविवाहाची माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी किंवा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर तसेच चाईल्ड लाईनच्या 1098 या टॉल-फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले आहे.

000000

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आत्मा नियामक मंडळाचा आढावा


 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आत्मा नियामक मंडळाचा आढावा

Ø कृषी विस्ताराला चालना, शेतकरी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कृषी महोत्सवाबाबत चर्चा

चंद्रपूर, दि. 27: आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. बळकटे, रेशीम अधिकारी अजय वासनिक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर,तसेच अशासकीय सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कृषी विभागाच्या विविध योजनेसंदर्भात ग्रामीण पातळीवर बैठका आयोजित कराव्यात. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांना सुचित करुन ग्रामपंचायत स्तरावर प्रगतशिल शेतकऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. रब्बीचे पीक क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादन व शेती शाळेची संख्या वाढवावी. यासाठी अतिरिक्त निधी लागल्यास उपलब्ध करून देता येईल.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी आत्मा अंतर्गत 2022 मध्ये राबविण्यात आलेले कृषी संलग्न उपक्रम, विविध कार्यक्रम, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी गट, कृषी प्रात्यक्षिके, नाविण्यपुर्ण बाबी अंतर्गत कार्यक्रम आदी बांबीचा आढावा घेतला.

कृषी विस्ताराला चालना देणे, कृषी विस्तारामध्ये सेवा पुरवठादारांचा समावेश करणे, शेती पद्धतीनुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन व उत्पन्न वाढविणे, शेतकरी समूहाची क्षमतावृद्धी करणे, शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूह, शेतकरी गट तयार करणे, बाजाराभिमुख कृषी विस्तारावर भर देणे, कृषी संलग्न पशुसंवर्धन, मत्स्य, रेशीम, मधुमक्षिका, कुकुटपालन, कृषी प्रक्रिया विभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे हे आत्मा यंत्रणेचे उद्देश असल्याचे कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सागिंतले.

कृषि विस्तार कार्यात सुधारणा, स्मार्ट प्रकल्प, परंपरागत कृषि विकास योजना, 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेची योजना, कृषि निविष्ठा धारकांसाठी पदविका कार्यक्रम, जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन आदी विषयांवार सादरीकरण करण्यात आले.

राज्यस्तरावरून आत्मा नियामक मंडळात अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. या प्रगतशील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला व शेतीसंबंधी व उत्पादनासंबंधी माहिती जाणून घेतली. तसेच शेतातील पिकांची लागवड, शेती करण्याची पद्धती आदी बाबींची विचारणा केली. यावेळी अशासकीय सदस्यांनी शेती संदर्भातील चांगले व वाईट अनुभवाचे कथन केले. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आत्मा नियामक मंडळातील अशासकीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

000000

बीआरटीसी मार्फत बांबू निर्मित वस्तूंना मिळाला प्रतीक चिन्ह अनावरण सोहळ्याचा मान

 \



बीआरटीसी मार्फत बांबू निर्मित वस्तूंना मिळाला प्रतीक चिन्ह अनावरण सोहळ्याचा मान

चंद्रपूर, दि. 27: श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त विसापूर येथे वनस्पती उद्यानाचे प्रतीक चिन्ह अनावरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला.

या सोहळ्यादरम्यान बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथील ग्रामीण भागातील महिलांमार्फत तयार करण्यात आलेल्या बांबू निर्मित वस्तूच्या केंद्रास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान बीआरटीसी मार्फत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती घेऊन त्यांच्या हस्ते वनस्पती उद्यानाच्या प्रतीक चिन्हाचे अनावरण बीआरटीसी निर्मित बांबू वस्तूमार्फत करण्यात आले. सर्वप्रथम हा मान या बांबू वस्तूंना मिळाल्याने त्याची प्रशंसा वनमंत्री व उपस्थितांनी केली.

संचालक अविनाश कुमार यांच्या नेतृत्वात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे महिलांना रोजगार देणारे व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी सक्षम यंत्रणा असल्याचे नमूद केले. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. त्याद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे समाधान व्यक्त केले. याबाबत संपूर्ण बीआरटीसी टीमचे त्यांनी कौतुक केले. यावेळी केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मल्लेलवार, पर्यवेक्षिका योगिता साठवणे, हस्तशिल्प निर्देशक किशोर गायकवाड व इतर कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

000000

Monday 26 December 2022

आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार











 आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø विसापूर येथे लोगोचे अनावरण

      चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील विसापूर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. कोणत्याही वास्तुचा लोगो हाच त्याचा परिचय असतो. त्यामुळे बॉटनिकल गार्डनचा लोगो जगात सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन व्हावे. या लोगोच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगामध्ये विसापूरच्या (चंद्रपूर) बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विसापूर येथे बॉटनिकल गार्डनच्या लोगो (प्रतीक चिन्ह) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जीतेंद्र रामगांवकर, उपवनसंरक्षक श्वेता बोडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, ब्रिजभूषण पाझारे, किशोर पंदीलवार आदी उपस्थित होते.

            श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या लोगो चे अधिकृत उद्घाटन झाले, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोगो निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून हा लोगो निर्माण केला आहे. हा लोगो भविष्यामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये बॉटनिकल गार्डनचा परिचय करून देईल. या लोगोमध्ये बॉटनिकल गार्डनची भिंत म्हणजे गोंडकालीन किल्ल्याची प्रतिकृती, मत्सालय, प्ल्यॅनाटोरियम, जैवविविधता, तीन स्टार बॉटनिकल गार्डनच्या सर्वांगीण माहितीचा समावेश आहे. या लोगोमध्ये तीन स्टार असले तरी बॉटनिकल गार्डन मात्र फाईव्ह स्टार होईल.

            ते पुढे म्हणाले, बॉटनिकल गार्डन राज्यातील उत्तम वास्तू व्हावी, एवढेच नव्हे तर हे गार्डन ज्ञानाचे, रोजगाराचे केंद्र व्हावे, जैवविविधता, टॉकिंग ट्री व सायन्स पार्कच्या माध्यमातून विज्ञानाची माहिती देणारे  हे ज्ञानवर्धक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वनविभागातील 16 हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी नैसर्गिक उघड्या संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करतात, याचा मला अभिमान वाटतो. वनसंरक्षण व वनसंवर्धनासाठी सतत कार्यरत असलेले वनअधिकारी, वन कर्मचारी, वनरक्षक, वनक्षेत्रपाल व वनमजूर यांच्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रजातीचे रंगबिरंगी मासे हवे असल्यास तारापूर मत्स्यालयातून उपलब्ध करून देता येईल, असेही ते म्हणाले.

            विसापूर परिसरात एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षण, बॉटनिकल गार्डन ज्ञानवर्धक केंद्र, बल्लारपूर स्टेडियमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे तर सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सीमेची रक्षा करणारे सैनिक तयार करण्याचे कार्य होत आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती येथील कार्याचे कौतुक करून जाईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

            प्रस्ताविकेत मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर म्हणाले, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन या ठिकाणी होत आहे. लवकरच या गार्डनचे लोकार्पण करण्यात येईल. नैसर्गिक शिक्षण, निसर्ग पर्यटनात वाढ करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, रोपवाटिकांची संख्या वाढवणे, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, जैवविविधतेचे संवर्धन व जतन, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन व मत्सालय आदी उपक्रमाद्वारे ज्ञान-विज्ञानाचे शिक्षण या वनस्पती उद्यानातून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त वन अकादमी, सफारी प्रकल्प, रेस्क्यू प्रकल्प, उद्योजक केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र तसेच  बीआरटीसी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बॉटनिकल गार्डन देखील लवकरच लोकार्पित होणार असून आज लोगो अनावरण पार पडत आहे.

            यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा तयार करणारे शंतनु इंगळे, गार्डनचा लोगो निर्माण करणारे विवेक रानडे यांचा सत्कार करण्यात आला. 


बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील मृतक शिक्षिकेच्या कुटुंबियाला धनादेश वितरीत

            बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जाहीर केले होते. त्याअनुषंगाने श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार हे अर्थसहाय्य मंजूर झाले. श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण बल्लारपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, नायब तहसीलदार सतीश साळवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

0000000

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हयात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 









क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हयात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø  आतंरराष्ट्रीय दर्जाचे तिनही स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक राज्यात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात

चंद्रपूर, दि. 25: जिल्ह्यातील तरुणांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात, बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक प्राप्त करता यावे, यासाठी सर्व सोयी सुविधायुक्त क्रिडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे. याची फलश्रृती म्हणून जिल्ह्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्हयात आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुलातील 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड, चेंजिग रुम व इतर क्रीडा सुविधांच्या 12 कोटी कामांचे लोकार्पण तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅकच्या 51 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, माजी उपमहापौर राहुल पावडे, ब्रिजभुषण पाझारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वांच्या आशिर्वादाने विकासाच्या झंझावातात पुन्हा एक पुष्प गुंफल्या जात आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मागील काळात पालकमंत्री व वित्तमंत्री  असतांना 2019 मध्ये या क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. आता त्याचे  लोकार्पण होत आहे, याचा आनंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धक, खेळाडू कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. सिंथेटिक ट्रॅकचे काम पूर्णत्वास आले तेव्हा काही क्रीडा क्षेत्रातील तज्ञांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की, सिंथेटिक ट्रॅकवर वॉकिंग केले तर त्याचे नुकसान होईल. याची दखल घेत त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना सुचित करून सिंथेटिक ट्रॅकच्या बाजूला मातीचा वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने 50 लक्ष रुपये वॉकिंग ट्रॅक निर्मितीसाठी उपलब्ध करून दिले. येत्या दोन महिन्यात हा ट्रॅक पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जनतेच्या आरोग्यासाठी हा वॉकिंग ट्रॅक फिरण्याचे उत्तम साधन होईल, या दृष्टीने कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या संकुलातील जलतरण तलाव जुना झाला असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. चंद्रपूरमध्ये जसा धावपटूचा विचार केला तसाच जलतरणपटूचाही विचार करण्याच्या दृष्टीने 1 कोटी 57 लक्ष 15 हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळवून देत 1 कोटी 10 लक्ष रुपये त्वरित क्रीडा विभागाच्या खात्यात जमा केले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, युरोपच्या धर्तीवर येथील सैनिकी शाळेत ऑलंपिक स्तरावरचे स्टेडीयम निर्माण करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचा 56 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रातील बांधकाम करतांना या क्षेत्रातील कार्यरत मंडळी, तज्ञ व सामाजिक संघटना यांच्याकडून सूचना घ्याव्यात. 56 कोटी रुपयांचा आराखडा त्यांच्याकडून तपासून घ्यावा. जेणेकरून, कोणतीही गोष्ट सुटता कामा नये. चंद्रपूरातील जिल्हा स्टेडियम विदर्भातले सर्वात उत्तम स्टेडियम होईल, या दृष्टीने कार्य करण्यास पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक व शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केली आहे. आपल्या देशात या सर्व सुविधांची उत्तम वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तम दर्जाचे फक्त तीन सिंथेटिक ट्रॅक आहेत. ते म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल, सैनिकी शाळा, विसापूर व बल्लारपूर येथील क्रीडा स्टेडियम याठिकाणी. तिन्ही सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या ठिकाणी अनेक व्यवस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. तर सैनिकी शाळा, विसापूर येथे युरोपच्या धर्तीवर फुटबाॅल ग्राउंडची निर्मिती करण्यात आली असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

वन अकादमी येथे सुंदर मिनी स्टेडियम उभारण्याचे काम पुढील काळात करण्यात येणार आहे. महाकाली मंदिरासाठी मार्च 2019 मध्ये 60 कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ज्युबली हायस्कूलसाठी 8 कोटी रुपये व जुबली हायस्कूलच्या मागच्या 10 एकर ग्राउंडमध्ये वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाचे स्टेडियम निर्मितीसाठी 25 कोटी रुपये मार्च 2019 मध्ये जमा करण्यात आले आहे. नागपूर मुंबई व दिल्लीच्या धर्तीवर या जिल्ह्यात उत्तम असे एकही इनडोअर स्टेडियम नाही. त्यादृष्टीने 25 कोटी रुपयांमध्ये वातानुकूलित सोलरसहित वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्यासह वीरता व शुरता निर्माण करणारे स्टेडियम या ठिकाणी उभे राहत आहे. वीर बाबुराव शेडमाके स्टेडियम व इनडोअर स्टेडियमच्या नवीन अंदाजपत्रकाच्या सूचना दिल्या आहेत. एकूण 47 कोटीमध्ये वातानुकूलित स्टेडियम चंद्रपूर मध्ये निर्माण होईल.

जलतरण तलावाच्या नूतनीकरणाकरता 1 कोटी 60 लाख रुपये देण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या सुविधा निर्माण करण्याकरीता 56 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपूर जिल्ह्यात तयार करावी, अशी मागणी केली आहे. लवकरच बीसीसीआयची क्रिकेट अकॅडमी चंद्रपुरात तयार करण्यात येईल. अनेक विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. नवीन चंद्रपूरचं काम हाती घेण्यात आले आहे.  या जिल्ह्यातील युवक-युवती उंच आकाशात भरारी घेऊ शकेल, यासाठी मोरवा धावपट्टीवर पुढील वर्षात फ्लाईंग क्लबची स्थापना करण्यात येणार आहे.  येथील तरुण पायलटचे शिक्षण उपलब्ध होणार असून फ्लाईट उडवणारा तरुण मुंबई पुण्याचा नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचा असेल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  व्यक्त केला.

जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा जिल्ह्याचा उत्तम व्हावा यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे याव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले.

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मागील 10 वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्यप्राप्त व पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल येथे  खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसाठी व ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅकचे निर्माण देखील करण्यात आले आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे व वाढविण्याचे उत्तम असे कार्य होत आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना याचा नक्कीच फायदा होईल व या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जिल्ह्यातून निर्माण होण्यास मदत मिळेल.

प्रस्ताविकेत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड म्हणाले, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड, चेंजिंग रूम आदी आंतरराष्ट्रीय दर्जांची अत्याधुनिक क्रीडा सुविधा विशेष निधीतून जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात निर्माण करण्यात आल्या आहे. येत्या काही कालावधीत क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यात येणार आहे. अद्ययावत क्रीडा सुविधा, वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल यांचे अद्ययावतीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत मागील कालावधीत उत्कृष्ट असे कार्य या जिल्ह्यात झाले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे कार्य केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

०००००००


रामसेतू सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

 





रामसेतू सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø  देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज

चंद्रपूर, दि. 25 : चंद्रपूर येथील दाताळा रोडवरील इरई नदीवर ब्रिज उभारण्याचे एक स्वप्न व संकल्प होता, ते पूर्णत्वास आले असून चंद्रपूरचा रामसेतू ब्रिज हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल. सुंदर व आकर्षक अशा विद्युत रोषणाईने हा रामसेतू झळाळून निघणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

रामसेतू, दाताळा रोड, चंद्रपूर येथील विद्युत रोषणाई शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पुनम वर्मा, देवराव भोंगळे, राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर,राहुल पावडे आदी प्रामुख्याने उपथित होते.

रामसेतूवर सुंदर व आकर्षक अशा तीन कोटी रुपयाच्या विद्युत रोषणाई कामाचा शुभारंभ होत आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुंबईच्या सी-लिंक ब्रिजवरून जातांना वाटायचे की, चंद्रपूरमध्ये देखील असा देखणा ब्रिज व्हावा. मुंबईच्या धर्तीवर आणि पणजीमध्ये जो ब्रिज आहे तसाच हा रामसेतू होणार आहे. रामसेतू हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल, ज्याला सर्वांगसुंदर लायटिंग व म्युझिकची व्यवस्था असणार आहे. विद्युत रोषणाईसह हा रामसेतू पुढच्या 26 जानेवारीपर्यंत सर्व नागरीकांना बघण्यासाठी मिळेल. सुंदर ब्रिज व लायटिंग झाल्यानंतर रात्री लोक या ठिकाणी कुटुंबासह येतील तेव्हा सुंदर ब्रिज पाहून दिवसभरातील थकवा व कष्ट विसरून जातील, असा हा सर्वोत्तम ब्रिज होणार आहे.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून गणेश विसर्जन या नदीमध्ये करण्यात येत आहे, आता नव्याने दोन प्रकल्प हाती घेण्यात आले असून नदी परिसरात बाराही महिने पाणी असल्यास या ब्रिजची सुंदरता आणखी वाढेल. यासाठी जलसंधारण विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास जूनच्या पहिल्या पावसाच्या अगोदर या नदीवर बंधारा बाधंण्याचे काम पूर्णत्वास येईल. त्यासोबतच सुंदर घाट निर्मिती या ठिकाणी व्हावी यासाठी गणपती विसर्जनासाठी घाट बांधण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहे. देवी,गणेश विसर्जन तसेच इतर धार्मिक कार्यासाठी हा घाट निश्चितपणे उपयोगी पडेल, यासाठी घाट बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे या भागात पुराचे पाणी शिरते, यावर देखील नियोजन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापनाकडे संरक्षण भिंत उभारणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूरीनंतर या ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी देखील करण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रात उत्तम खेळाडू घडावेत यासाठी देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहे. उत्तम दर्जाच्या गुणवत्तेचा सिंथेटिक ट्रॅक महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळा, बल्लारपूर येथील स्टेडियम व जिल्हा क्रीडा संकुल ही तीन ठिकाणे आहेत.

जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे जाव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. 250 कोटी रुपये खर्च करून मुलींना प्रशिक्षण व 43 स्किल शिकविणारे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले. या उपकेंद्राचे बांधकाम पूर्णत्वास येईपर्यंत 10 प्रकारचे अभ्यासक्रम माहे जूनपासून सुरू करण्यात येत आहे.

हा जिल्हा विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

000000