Search This Blog

Thursday 15 December 2022

पशुसंवर्धन विभागातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 पशुसंवर्धन विभागातंर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 15 : पशुसंवर्धन विभागांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 100 कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया या वर्षात राबविली जाणार आहे.

पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

अर्जदारांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत किंवा   गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध AH.MAHABMS या अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशनवरून देखील अर्ज भरता येईल. अर्ज करण्याचा कालावधी 13 डिसेंबर ते 11 जानेवारी 2023 पर्यंत असेल. अर्ज भरतांना काही अडचणी आल्यास 1962 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील वरील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नयेयासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन 2021-22 पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन  2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. योजनांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांकावर किंवा संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.मंगेश काळे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर यांनी केले आहे.

०००००००


No comments:

Post a Comment