अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
Ø उद्योगांसाठी तरुणांना मिळणार 15 लाख
चंद्रपूर, दि. 8 : उद्योजक बनण्यास इच्छुक असणाऱ्या मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प योजना आदींचा समावेश आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 10 लाखांची असलेली मर्यादा 15 लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतल्यास त्याचे व्याज महामंडळ भरणार आहे. त्यासाठी मात्र रकमेची मर्यादा असणार आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लक्ष रुपये होती. महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाखापर्यंत केली आहे. याअंतर्गत व्याज परतावा 4 लाख 50 हजाराच्या मर्यादेत केला जाणार आहे. या योजनेत व्याज परतावा सुद्धा मिळत आहे.
अशा आहेत योजना:
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: या योजनेत उद्योग उभारणी, नवीन व्यवसाय सुरू करणे अशा विविध कारणासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यानंतर महामंडळ त्याचे व्याज भरते.
निकष : उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुष व महिलांकरिता जास्तीत जास्त 60 वर्षे, वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत असावी. या योजनेअंतर्गत लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
गट कर्ज व्याज परतावा योजना : दोन व्यक्तीसाठी मर्यादा 25 लक्ष रुपये, तीन व्यक्तीसाठी 35 लक्ष, चार व्यक्तींसाठी 45 लक्ष तर पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखाच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करेल.
निकष : या योजनेतंर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी कंपनी कायद्यातंर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट/ संस्था लाभास पात्र असतील.
गट प्रकल्प कर्ज योजना : एकूण प्रकल्प रकमेच्या 10 टक्के रक्कम गटाने जमा करणे बंधनकारक असेल. तर उर्वरित 90 टक्के रक्कम ( 10 लाखाच्या मर्यादेत) महामंडळ कर्ज स्वरूपात अदा करेल. प्रकल्पाची किंमत 11 लाखापेक्षा जास्त असल्यास गटाला प्रकल्पाची उर्वरित रक्कम इतर स्त्रोतातून जमा करावी लागणार आहे.
निकष : या योजनेअंतर्गत एफ पी ओ गटाची संख्या 20 पेक्षा जास्त असल्यास संबंधित गटाच्या संचालकाने सर्व सदस्यांच्या उत्पन्नाचे पुरावे अपलोड करणे अनिवार्य आहे.
वैयक्तिक कर्ज योजनेचे कर्ज उचलल्यानंतर त्याची नियमित परतफेड करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. 18 ते 60 वर्षे वयोगटातील उमेदवारांना महामंडळा अंतर्गत कर्ज घ्यावयाचे असल्यास महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा व सदर योजनांचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment