Search This Blog

Monday, 26 December 2022

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

 हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

        चंद्रपूर, दि. 24: शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे बारकाईने निरीक्षण करून हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. या किडींची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंडयावर, कळ्यावर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीत दाण्यासारखी दिसतात. त्यामुळे 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीतद्रव्य खरडुन खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होउन वाळतात व गळुन पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात, त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठया झालेल्या अळया घाटयाला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30 ते 40 घाटयांचे नुकसान करते.त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच घाटे अळीचे व्यवस्थापन करावे.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन:

घाटे अळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकांमध्ये फिरून घाटेअळी वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा अति वापर टाळावा.

ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल, त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षीथांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावेत. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा, यासाठी घाटेअळीचे कामगंध सापळे (हेक्झार्ल्युर) एकरी 2 किंवा हेक्टरी 5 सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.  

शेतकरी बंधुनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावरः आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळुन कराव्या. पहिली फवारणी (50 टक्के फुलोऱ्यावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि.(1x 109 पिओबी/मिली) 500 एल.ई./हे किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मि.ली. तर दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर) इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के, एस.जी 3 ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ई.सी. 25 मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्यु जी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मि.ली. या प्रमाणात फवारण्या कराव्यात.

                  अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment