सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे
- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर बाबुराव शेडमाके व संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे लोकार्पण
चंद्रपूर, दि.5 : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व समाजाची प्रगती व उन्नतीच्या दिशेने योग्य प्रवास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सर्वांनी सहभागी होण्यासाठी व गावाच्या प्रगतीचे चिंतन, मंथन करण्यासाठी सामाजिक सभागृहाचा उपयोग करावा. सामाजिक सभागृहे ही केवळ दगडमातीची इमारत न राहता विचार आणि प्रबोधनाची केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले
पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर बाबुराव शेडमाके व संताजी जगनाडे महाराज या तीन सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार शुभांगी कनवाडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे, तसेच आशिष देवतळे, अलका आत्राम, अजित मंगळगिरीवार, शामसुंदर नैताम, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, गंगाधर मडावी, आशिष कावटवार, ऋषभ दारव्हेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा फुले यांनी सांगितलेला सत्यशोधकाचा मार्ग, वीर बाबुराव शेडमाके यांचा वीरतेचा आणि संताजी जगनाडे महाराजांच्या सेवेच्या विचारावार पुढे जावून भविष्याचा वेध घेण्यासाठी एकत्रित चिंतन करण्यासाठी सामाजिक सभागृहांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, स्थानिक नागरिकांनी आपल्या कौशल्यातून तयार केलेले कारपेट व वनउपजावरील इतर वस्तू संपुर्ण भारतात विक्रीसाठी जाव्यात व ते आत्मनिर्भर बनावे यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.
पोंभुर्णा येथे तहसील कार्यालय, नगर पंचायतचे व्हाईट हाऊस, व्यायामशाळा, पत्रकार भवन, स्टेडियम, आयटीआय, श्री राजराजेश्वर मंदिर, रस्ते, तलावाचे सौंदर्यीकरण, पंचायत समिती इमारत, आठवडी बाजार, पाणी पुरवठा योजना, विश्रामगृह अद्यावतीकरण, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, स्मशानभूमी बांधकाम आदी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. शासनाची मदत न घेता 20 लक्ष रुपये खर्चून पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या सुराज्यावर पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले.
पोंभुर्ण्याचा विकास पाहून महाराष्ट्रातील इतर तालुक्यांना आपल्या गावाचा विकास असाच व्हावा, असे वाटले पाहिजे. अतिवृष्टीमुळे बाधित एकही शेतकरी शासकीय मदतीपासून सुटता कामा नये. सर्व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी आपण प्रशासनाला निर्देश दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
देवराव भोंगळे यांनी महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका म्हणून पोंभुर्णाची ओळख असल्याचे व पोंभुर्णा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते आतापर्यंत विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आल्याचे सांगितले.
नगर पालिकेचे लेखाधिकारी सुशांत आपटे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देतांना तीनही सभागृहासाठी प्रत्येकी 75 लक्ष रुपये खर्च आल्याचे सांगितले. रोशन येमूलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
याप्रसंगी पोंभुर्णा येथील माळी समाज, तेली समाज व आदिवासी समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी, समाज बांधव नगर पंचायतीचे नगरसेवक, संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment