Search This Blog

Wednesday, 14 December 2022

बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार




 बिबट सफारीचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत तयार करावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/ चंद्रपूर, दि. 14:  जुन्नर तालुक्यात होणारा बिबट सफारी प्रोजेक्ट स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीनेच या प्रकल्पाची आखणी व्हावी. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत.

जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे नियोजित बिबट सफारीच्या अनुषंगाने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. वाय. एल. पी. राव  यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्यात बिबट्यांची संख्या अधिक आहे. याठिकाणी बिबट सफारी प्रकल्प केला तर त्यामुळे स्थानिक भागात रोजगार आणि पर्यटनाच्या अधिकच्या संधी निर्माण होणार आहेत. याशिवाय, या परिसरात इतर अनेक पर्यटनस्थळेही आहेत. या प्रोजेक्टमुळे या पर्यटनक्षेत्रांकडेही पर्यटक आकर्षिले जाणार आहेत. त्यामुळेच बिबट सफारीच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करतांना या सर्व बाबींचा विचार केला जावा. बिबट सफारीचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होताच तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करावी. विहित वेळेत कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी माजी खासदार श्री. आढळराव व माजी आमदार श्री. सोनवणे यांनी, जुन्नर आणि आसपासच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे सांगितले. 

00000

No comments:

Post a Comment