लसीकरणापासून सुटलेल्या बालकांना गोवर-रुबेलाची लस प्राधान्याने द्या -सीईओ विवेक जॉन्सन
Ø गोवर-रुबेलाच्या नियंत्रणासाठी विशेष लसीकरण मोहिम
चंद्रपूर, दि. 23: राज्यात गोवर-रुबेला आजाराचा उद्रेक झाला आहे. त्यासोबतच राज्यातील काही भागात या आजाराची अनेक बालकांना लागण झालेली दिसून येत आहे. गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. हा मुख्यतः लहान मुलांना होतो व आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यु होऊ शकतो. त्यामुळे लसीकरणापासून सुटलेल्या बालकांना गोवर-रुबेलाची लस प्राधान्याने द्या, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
जिल्हा परीषदेच्या समिती कक्ष सभागृहात जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
बैठकीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.प्राची नेहुलकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.वनिता गर्गेलवार, डॉ. प्रिती राजगोपाल तसेच आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख, आशा सेविका आदी उपस्थित होते.
सदर आजाराचा उद्रेक, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनेकरीता राज्यातील उद्रेक असलेल्या व उद्रेक नसलेल्या सर्व जिल्ह्यात गोवर आजाराच्या प्रतिबंधाकरीता गोवर-रुबेला लसीकरणा माहे डिसेंबर 2022 मध्ये 15 ते 25 डिसेंबर व जानेवारी 2023 मध्ये 15 ते 25 जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण मोहिम राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोवर आजाराचा उद्रेक नसला तरी सुध्दा गोवर आजाराच्या प्रतिबंधाकरीता गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहिम जिल्हयात राबविण्याचे शासनातर्फे सुचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालके एमआर-1 व एमआर-2 चे लसीकरणापासून सुटलेले आहे, अशा सर्व बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण या मोहिमेत करण्यात येत आहे. सदर मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील आरोग्यसेविका, आशा व अंगणवाडी कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करुन 9 महिने ते 5 वर्षांच्या बालकांची यादी तयार करुन लसीकरणापासुन सुटलेल्या बालकांचे नियमित लसीकरण सत्रासोबतच विशेष लसीकरणाचे सत्र आयोजन करुन या मोहिमेदरम्यान लसीकरण करण्यात येणार आहे.
सदर मोहिम माहे डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात गोवर-रुबेला पहिला व दुसरा डोस 100 टक्के पूर्ण करण्याच्या मार्गावर असून शहरी भागात निवडक लाभार्थी शिल्लक राहीले आहेत. सदर मोहिमेचा माहे डिसेंबर महिन्याचा (दि. 25 डिसेंबर)शेवटचा दिवस असून या दिवशी गोवर-रुबेला मोहिमेची 100 टक्के उद्दिष्टपुर्तीचे नियोजन करण्यात आले आहे.
माहे जानेवारी 2023 पासून 9 व्या महिन्यात देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसी सोबत आयपीव्हीची अतिरीक्त मात्रा राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार नियमित लसीकरणात समाविष्ट करण्यात येत आहे. त्याबाबतचे जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देणे सुरु आहे.
000000
No comments:
Post a Comment