Search This Blog

Thursday, 1 December 2022

अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्‍वरीत पूर्ण करावी

 

अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची

प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया त्‍वरीत पूर्ण करावी

                                                                                                         मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø एक महिन्‍याच्‍या आत जाहिरात प्रसिध्‍द करण्‍याचे उपमुख्‍यमंत्र्यांचे आश्वासन

चंद्रपूर, दि. 1 : राज्‍यातील अनुसुचित जमातीची वर्ग 1 ते 4 पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्‍यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे केलेली आहे. येत्‍या एक महिन्‍यात ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने जाहिरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

अनुसुचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या प्रलंबित पदभरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक 10 मार्च 2022 रोजी श्री. मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अनुसुचित जमातीची वर्ग 1 ते 4 पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहिराती देवून पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. न्‍यायालयीन आदेशाप्रमाणे व दिनांक 21 डिसेंबर 2019 च्‍या शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित संस्‍थातील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिव्‍हील अपील क्रमांक 8928/2015 व इतर याचिकानुसार दिनांक 6 जुलै 2017 रोजी दिलेल्‍या निर्णयाची राज्‍यात अंमलबजावणी करण्‍याच्‍या दृष्‍टीने सामान्‍य प्रशासन विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्‍यामुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरला आहे. त्‍यामुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्‍याची मागणी श्री. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली होती. या चर्चेदरम्‍यान तत्‍कालीन सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन देवूनही ही पदभरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

नुकत्‍याच झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्‍यात याबाबत जाहिरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

००००००

No comments:

Post a Comment