Search This Blog

Wednesday 7 December 2022

नागरिकांनी क्षयरोगाची मोफत तपासणी करावी

 


नागरिकांनी क्षयरोगाची मोफत तपासणी करावी

Ø जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 7 : क्षयरोग हा संपूर्ण उपचाराअंती पूर्णपणे बरा होणारा आजार असून त्यासंदर्भात पूर्णपणे मोफत उपचार शासनाने उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी दोन आठवड्यापेक्षा जास्त काळाचा खोकला, ताप, वजन कमी होणे, थुंकीद्वारे रक्त पडणे, इत्यादी लक्षणे आढल्यास शासकीय रुग्णालयात थुंकी तपासणी व एक्सरे द्वारे निदान करून क्षयरोगाची तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांनी केले आहे.

क्षयरोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन क्षेत्रीय चिकित्सालय, लालपेठ व जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डब्लूसीएल उपक्षेत्रीय दुर्गापूर परिसरात नुकतेच घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय वैरागडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डब्लूसीएलचे उपविभागीय व्यवस्थापक इकम्बरम, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती चंद्रगडे, डॉ. अमित जयस्वाल, डॉ. राव, डॉ. रोशनी, खिरेंद्र पाझारे, महेश येरमे, अमोल जगताप उपस्थित होते.

डॉ. प्रकाश साठे पुढे म्हणाले, 9 सप्टेंबर 2022 रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आहे. यावेळी त्यांनी क्षयरोग आजार व घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय महाप्रबंधक संजय वैरागडे यांनी क्षयरोग निर्मूलनाकरिता वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड तर्फे आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी  क्षयरोग जनजागृती व तपासणी शिबिरामध्ये 23 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 संशयित क्षयरुग्ण आढळून आले. पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानअंतर्गत गणपतराव पाझारे बहुउदेशीय संस्था, चंद्रपुर तसेच डॉ. अमित जयस्वाल, डॉ. मधूसुदन राव, डॉ. रोशनी, शरानू हल्ली, सुनंदा घाटे, सुनंदा कुचनकार, संध्यारानी खंडाळे, दिपक मांदूरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूर कार्यक्षेत्रातील 11 क्षयरुग्णांना दत्तक घेतले असून त्यांना सहा महिने पोषण आहार दिल्या जात आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमात पोषण किट वाटपाचा कार्यक्रम उपक्षेत्रीय दुर्गापूर परिसरात संपन्न झाला.

            याप्रसंगी क्षयरोग कार्यालय, लालपेठ व दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक कामगार व नागरिक उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment