Search This Blog

Tuesday 30 April 2024

सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

 

सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणी व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा

Ø कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन

चंद्रपूर दि. 30 : सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करीता शेतकऱ्यांकडील राखीव साठ्यामधील बियाण्याची किमान तीन वेळा घरगुती पद्धतीने चाचणी घेणे आवश्यक आहे. (बियाणे साठवणूक करतेवेळीमार्च/एप्रिल व पेरणीपूर्व) त्यामुळे मार्च/एप्रिल मध्ये राखीव साठ्याची घरगुती पद्धतीने बियाण्याची उगवण चाचणी  करण्यात यावी.

उगवणक्षमता घरच्या घरी तपासण्याची पध्दत : 1.शेतक-यांनी स्वत:कडे असलेल्या बियाण्याची चाळणी करून त्यामधील काडीकचराखडेलहान/फुटलेले बियाणे वेगळे करावे. चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो पूर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी 10 बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशा रितीने 100 बियांच्या 4 गुंडाळ्या तयार कराव्यात. नंतर या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळुहळु उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर ती संख्या 50 असेल तर उगवणक्षमता 50 टक्के आहे असे समजले जातेजर ती संख्या 80 असेल तर उगवणक्षमता 80 टक्के आहे असे समजावे. अशा पध्दतीने उगवणक्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चांगली म्हणजेच 70 ते 75 टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.

2) शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरण्यापुर्वी त्याची उगवणक्षमता वरील पध्दतीने तपासून नंतरच अशा बियाण्याची पेरणी करावी. उगवणक्षमता 70 क्क्यांपेक्षा कमी असल्यास त्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.

सोयाबीन बियाण्याचा पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी :

1) रायझोबियम व पीएसबी या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी 3 तास अगोदर बीज प्रक्रिया करून असे बियाणे सावलीत वाळवावे. 2) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. 375 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. 4) बियाण्याची पेरणी पुरेशा ओलीवर आणि 3 ते 4 से.मी. खोलीपर्यंत करावी. 5) प्रति हेक्टरी दर 70 किलो वरून 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकण पद्धतीने किंवा  प्लांटरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) यंत्राने करावी.

            अधिक माहिती करीता कृषी सहायकमंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. पेरणीपूर्व सोयाबीन बियाणे उगवणक्षमताबीजप्रक्रिया शेतकरी बंधुनी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

०००००००

चंद्रपूर जि.प.चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

 

चंद्रपूर जि.प.चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

              चंद्रपूर दि. 30 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142(4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) अधिनियम 1964  मधील तरतुदीनुसार,  मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन 2022-23 चा वार्षिक प्रशासन अहवाल ठराव क्रं. (3) दिनांक 15 डिसेंबर 2023  अन्वये प्रसिध्द केला आहे.

०००००

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव आमंत्रित

 

स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदी बाबतचे प्रस्ताव आमंत्रित 

चंद्रपूर, दि. 30 : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या दारिद्र रेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावेतसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून त्यांना कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यावयाची  आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2024-25 करिता अर्ज मागविण्यात येत आहे.

जिरायत जमीन चार एकर व बगायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास संमती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, गाव नमुना आठपरिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्रअर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊपत्नीमुले यांचे जमीन विकण्यासंबंधी नाहरकत व संमती प्रमाणपत्र आवश्यक आहे.

जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे  संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र  जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष दिनांक 15 मे 2024 पर्यंत संपर्क साधावा,  असे  सहाय्यक  आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर यांनी कळविले आहे.

००००००

शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन


शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन

Ø अतिरिक्त पैसे आकारल्यास करा तक्रार

चंद्रपूर, दि. 30 : जून महिन्यात इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होते. त्यामुळे ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक कारणासाठी लागणारे विविध दाखले त्वरीत काढून घेण्याचे आवाहन चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे. तसेच ठराविक दरापेक्षा अतिरिक्त दर आकारल्यास लेखी तक्रार करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

निकालापुर्वीच मे महिन्यात पुढील प्रवेशाकरीता गरजेचे शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी जवळच्या सेतु केंद्रात, आपले सरकार केंद्र किंवा ग्रामपंचायतीच्या महासंग्राम सेवा केंद्रात अर्ज करावे. महसूल प्रशासनामार्फत शैक्षणिक प्रवेशाकरीता प्रामुख्याने खालील प्रमाणे विविध दाखले निर्गमीत करण्यात येतात.

 आवश्यक दस्ताऐवज व शुल्क : जातीच्या प्रमाणपत्रासाठी अनुसूचित जाती जमाती – 1950 चा पुरावा, भटक्या जमाती – 1961 चा पुरावा, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती जमाती – 1967 चा पुरावा (शुल्क – 57.20 रुपये). नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राकरीता जातीचे प्रमाणपत्र, तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (शुल्क – 57.20 रुपये). उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 1 वर्षाकरीता तलाठ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, 3 वर्षाकरीता (नॉनक्रिमी) तलाठी यांचे उत्पन्न प्रमाणपत्र (शुल्क – 33.60 रुपये). रहिवासी दाखल्याकरीता 15 वर्षांचा महसुली पुरावा (शुल्क – 33.60 रुपये), ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राकरीता उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 1967 चा महाराष्ट्रातील पुरावा (शुल्क – 33.60 रुपये) आणि महिला आरक्षण प्रमाणपत्रासाठी उत्पन्न दाखला, परिशिष्ट 1 व 2, जातीचे प्रमाणपत्र (शुल्क – 33.60 रुपये).

विहित प्रमाणपत्राकरीता सेतु चालकाने निर्धारीत प्रमाण शुल्कापेक्षा जास्त पैशाची मागणी केल्यास संबंधित सेतू चालक / मालकाच्या नावाची लेखी तक्रार तहसीलदार, चंद्रपूर यांच्याकडे द्यावी, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

०००००००  

Monday 29 April 2024

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता

 

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता

चंद्रपूर दि. 29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. 1 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रम होणार आहे.

००००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी


भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी

चंद्रपूर दि. 29 :भारतीय  सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service  Selection Board (SSB)  या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नाशिक  येथे नवयुवक व नवयुवयतींसाठी दिनांक 20 मे  ते 29 मे  2024  या कालावधीत SSB  कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीं निवासभोजनआणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचंद्रपूर येथे दिनांक 9 मे 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Wel‍fare, Pune (DSW)  यांच्या वेबसाईट  WWW.Mahasainik.Maharashtra.gov.in या संकेत स्थळावर   जाऊन  (other- PCTC Nashik –SSB-५७ ) कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची उपलब्ध करुन दिले जाईल किंवा व्हॉटस्ॲप 9156073306 या मोबईल नंबर वर SSB-५७ हा मेसेज  केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट Whatsapp द्वारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस.एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एन.सी.सी. ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड  मध्ये पास झालेले असावे व एन .सी.सी.ग्रुप हेडक्वार्टर्सने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.  UNIVERSITY Entry Scheme   साठी एस.एस.बी. कॅाल लेटर असावे किंवा एस.एस. बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक  यांचा ईमेल आयडी-  training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253 -2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावाअसे आवाहन सैनिक कल्याण अधिकारीचंद्रपूर यांनी केले आहे.

                                                      ००००००

तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

 

तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 29 : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र  व ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावयाचे असल्याने तृतीयपंथीयांची  कागदपत्रासह माहिती आवश्यक आहे. त्याकरीता तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थातृतीयपंथीयांची मंडळे किंवा  संघटना येथील प्रतिनिधीनी किंवा स्वत: तृतीयपंथी या व्यक्तींने सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन तृतीयपंथी असलेबाबतची वैयक्तिक व  रहिवाशी पुराव्याबाबतची माहिती त्वरित सादर करावी. जेणेकरून अपले माहितीचे आधारे NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS या पोर्टलवर माहिती भरुन तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळाखपत्र देण्यात येईल, असे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी कळविले आहे.

  ००००००


Thursday 25 April 2024

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर






 मतदानाचा सेल्फीरिल्स्पोस्टर्समिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

Ø मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा

चंद्रपूरदि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक  - 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फीरिल्स्पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सहकार्य केले. या स्पर्धांचा निकाल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ च्या माध्यमातून नुकताच घोषित करण्यात आला आहे.

सन 2019 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे यावर्षी 2024 मध्ये मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह निर्माण व्हावालोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढावीया उद्देशाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविले. तरुण मतदारांमध्ये रिल्स्पोस्टर्समिम्स् बाबत असलेली प्रचंड उत्सुकता पाहता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी माय व्होट इज माय फ्युचरपॉवर ऑफ वन व्होट’ या थीमवर रिल्स्पोस्टर्समिम्स् तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करणेतसेच तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या थीमवर आधारीत मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करून फोटो अपलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुढील आठवड्यात नियोजन भवन येथे पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा लकी ड्रा काढतांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डूउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे आहेत स्पर्धेतील विजेते मतदार : मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करणे

            या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र देवराव पोहाणेरा. तुकुम चंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत मधुकर गेडामरा. मूल यांना तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक ऋषी बारसागडेरा. चंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            रिल्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडेरा. टिळक वॉर्डबालाजी मंदीरजवळचिमूर यांनाद्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकररा. पालगावपो. आवाळपूरता. कोरपना यांनातृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमील ज्ञानेश्वर मडावीरा. वॉटर सप्लाय कॉर्टरगोपालनगरतुकुमचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            पोस्टर्स स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश यशवंत निकोडेरा. नेहरू नगरनवीन वस्तीडीआरसी रोडचंद्रपूर यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल राजू धोगडेरा. शासकीय कन्या वसतीगृहभिवकुंड (विसापूर) यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी राजू मिलमिलेरा. तिलक वॉर्डबोर्डाता. वरोरा यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

            मिम्स् स्पर्धा : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन संतोष येलमुलेरा. सुब्बईता. राजुरा यांनाद्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय बाबुराव सोनुनेरा. हुडको कॉलनीअमर चौकचंद्रपूर यांनातृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप रंगलाल शाहारा. मच्छीनालामुक्तीकॉलनीचंद्रपूर यांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून घोषित करण्यात आले आहे.

०००००००

Wednesday 24 April 2024

खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा



 

खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

Ø जिल्हाधिका-यांच्या कृषी विभागाला सुचना

Ø जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक

चंद्रपूर दि. 24 : खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कृषी विभागाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात बोगस बियाणांची वाहतूक व विक्री होणार नाही, याबाबत पोलिस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरवात होण्यापूर्वीच सुक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात खते, बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे, यादृष्टीने आतापासूनच कार्यवाही करावी. खरीप विमा मंडळनिहाय काढणे गरजेचे आहे. जेवढे खरीपाचे क्षेत्र आहे, त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये. यासाठी तालुका कृषी अधिका-यांनी फिल्डवर जावे. तसेच ई-केवायसी बाबत विशेष मोहीम राबवावी. तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कृषी विषयक माहिती शेतक-यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात रब्बी क्षेत्रात वाढ : सादरीकरण करतांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार म्हणाले, जिल्ह्यात एकूण 5 लक्ष 52 हजार 729 हेक्टर (48.30 टक्के) क्षेत्र लागवडीखाली असून खरीप हंगाम 2024 – 25 मध्ये धानासाठी 1 लक्ष 91 हजार हेक्टर, कापूस 1 लक्ष 80 हजार हेक्टर, सोयाबीन 75 हजार हेक्टर, तूर 36 हजार हेक्टर व इतर पिकासांठी पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र  88245 हेक्टर असून प्रत्यक्षात 1 लक्ष 20 हजार 84 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या 136 टक्के आहे.

जिल्ह्यात खतांची उपलब्धता : जिल्ह्यासाठी युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी, संयुक्त खते आणि मिश्र खते असे एकूण 1 लक्ष 56 हजार 300 मेट्रीक टन खते कृषी आयुक्तालयाकडून मंजूर झाले आहे. 24 एप्रिल 2024 अखेर जिल्ह्यात 89329 मेट्रीक टन साठा शिल्लक आहे.

०००००

Tuesday 23 April 2024

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा




 

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पिपरे, डॉ. श्वेता सावलीकर, डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (माध्य) निकिता ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, तंबाखू प्रतिबंध उपाययोजनेबाबत जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम घेऊन नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत अवगत करावे. तसेच शाळा – महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे. याबाबत शाळांकडून माहिती मागवून त्यांच्या परिसरात तंबाखू विक्रीची दुकाने नाहीत, याबाबत हमीपत्र घ्यावे. शासकीय कार्यालयामध्येही तंबाखू प्रतिबंधासाठी भरारी पथके स्थापन करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

करण्यात आलेली दंडात्मक कार्यवाही : सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) कलम – 4 अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने सन 2023-24 मध्ये 566 नागरिकांकडून 55370 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस विभागाच्या वतीने गत वर्षी 2076 प्रकरणांमध्ये 4 लक्ष 15 हजार 200 दंड ठोठावण्यात आला. तर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत नियम व नियमन 2011 प्रतिबंध अन्नपदार्थ कार्यवाही अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीतमध्ये 15 प्रकरणात 13329 किलो (एकूण किंमत 1 कोटी 44 लक्ष 80 हजार 227 रुपये) साठा जप्त करण्यात आला.

यावेळी मागील सभेचे इतिवृत्त, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणा-या कार्याचा अहवाल सादर करणे, 31 मे रोजी जागतिक तंबाखु नकार दिन साजरा करणे, जिल्ह्यामध्ये कोटपा कायदा कलम 4, कलम 5, कलम 6 (अ) आणि (ब) प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करणे, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्ह्यातील शाळा तंबाखु मुक्त करणे, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

०००००००

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

 आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया  ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचितदुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीर्इ अतंर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते  30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम2009 मधील सुधारित अधिसूचना नुसार वंचितदुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25 टक्के  प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळाशासकीय शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. तथापिएखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची / शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास शाळा  निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अतंरावर अनुदानित शाळाशासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्याशाळा नसतील व 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना 25 टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्याच्या निवास स्थापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर शाळा नसेल तर ३ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमांने होतील. मुलांना 25 टक्के प्रवेशअंतर्गत प्रवेशासाठी महानगरपालिका शाळानगरपालिका /नगरपरिषद /नगरपंचायत शाळाकॅन्टोमेंट बोर्डशाळाजिल्हा परिषद प्राथमिक शाळामहानगरपालिका शाळा (स्वंयअर्थ्सहाय्यीत) ,जिल्हा परिषद (माजी शासकीय),खाजगी अनुदानितस्वयअर्थसहाय्यीत शाळा इ. व्यवस्थापनाच्याशाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी : 1. प्रवेश प्रक्रियेसाठी निवासी  पुराव्याकरीता रेशनिंग कार्डड्रायव्हिंग  लायसन्सवीज /टेलीफोन देयकप्रॉपर्टी टॅक्स  देयक /घरपट्टीआधार कार्ड, मतदान ओळखपत्रपासपोर्टराष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ई. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य राहील. 2. जन्म तारखेचा पुरावा 3. जातप्रमाणपत्र पुरावा (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे)  4. उत्पन्नाचा दाखला उ (उत्पन्नाचा दाखला रु. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न) प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. 5. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षकअधिसूचित जिल्हा शासकीय रुगणालय यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र 6. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता बालकाचे वय 6 वर्ष आणि अधिक गृहित धरताना मानिव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करणेत आलेली आहे. 7. पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Singal Parent,  विधवाघटस्फोटितआई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येईल

शाळा पुढील कारणांमुळे आरटीई 25 टक्के प्रवेश नाकारू शकेल : अवैध निवासाचा पत्ताअवैध जन्मतारखेचा दाखलअवैध जातीचे प्रमाणपत्रअवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्रअवैध फोटो आयडीअवैध दिव्यांग प्रमाणपत्र. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. पडताळणी समितीद्वारे प्रवेशपात्र  बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला 3 वेळा प्रवेशाकरिता संधी देवून पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करण्यात येईल.

पडताळणी समिती द्वारे रहिवासी पत्तागुगल वरील  पत्ता व वय याबाबत पात्र विद्यार्थ्यांची अचूक खात्री करण्यात येईल. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक  दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न प्रमाणप्रत्राची पडताळणी करण्यात येईल. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता  RTE Portal वर  वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल  घेतली जाणार नाही, याची सर्व पालकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. तरी इच्छूक व पात्र पालकांनी आपल्या पाल्याचे सदर ऑनलाईन अर्ज विहित कालावधीमध्ये भरावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.

००००००

Monday 22 April 2024

शासकीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन

 

शासकीय अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांकरीता उन्हाळी शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 22 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजात मानाचे स्थन प्राप्त व्हावे, तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिने  आदिवासी विभाग नियमित प्रयत्नशील असतो.  त्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत या शैक्षणिक  सत्रात 23 एप्रिल ते 22 मे 2024 या कालावधीत उन्हाळी शिबीर हा उपक्रम राबविला जात आहे. प्रकल्पात पहिल्यादांच अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमाचे आयोजन शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा ता. जि. चंद्रपूर येथे करण्यात येत आहे.

उन्हाळी शिबिरात शासकीय /अनुदानित आश्रम शाळेतील एकूण 150 विदयार्थी (75 मुले व 75 मुली ) सहभागी होणार आहेत. या शिबिराकरीता विद्यार्थ्यांच्या निवासाचीभोजनाची व प्रशिक्षणाची मोफत सोय करण्यात येणार आहे.

शिबिरात घेण्यात येणारे उपक्रम : 1. योगा प्रशिक्षण  2. आर्चरी प्रशिक्षण 3. गोंडी पेटींग प्रशिक्षण  4. तायक्वांडो प्रशिक्षण 5. व्यक्तिमत्व  विकास प्रशिक्षण 6.  इंग्लिश स्पीकिंग कोर्स 7. संगीत कला प्रशिक्षण.            

या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले असून या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत शिक्षणाची नाळ जुळून राहण्यास मदत होणार आहे. शिबिरात प्रशिक्षित प्रशिक्षकामार्फत वरील सर्व उपक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहेत्यामुळे भविष्यात स्वत: च्या पायावर उभे राहण्याकरीता सदर प्रशिक्षण हे उपयोगी पडणार आहे. प्रकल्पात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात असल्यामुळे सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत. शिबिरादरम्यान प्रकल्प कार्यालयातील विविध अधिकारी प्रशिक्षण स्थळी भेट देतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

०००००

Saturday 20 April 2024

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान









चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ

चंद्रपूर, दि. 20 : 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण  67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.  

शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

००००००००