Search This Blog

Wednesday 10 April 2024

महाकाली यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून मंदिर परिसराची पाहणी





 महाकाली यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून मंदिर परिसराची पाहणी

चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेाल्या उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपा उपायुक्त चंदन पाटील, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मीता सुतावणे, मंदिराचे विश्वस्त सुनील महाकाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, मंदिर परिसराची स्वच्छता नियमित होणे आवश्यक आहे. उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच गर्दी टाळण्यासाठी भाविकांचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्यामुळे या परिसरात असलेल्या दोन मतदान केंद्राच्या परिसरात दि. 18 एप्रिलच्या दुपारपासून तर 19 एप्रिल रोजी मतदान संपेपर्यंत 100 मीटर परिसरात येण्यास बंदी राहणार आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना सूचना द्याव्यात. तसेच महानगर पालिकेने झरपट नदी व परिसराची स्वच्छता नियमित करावी. अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा, पोलिस अधिक्षक श्री. सुदर्शन व इतर अधिका-यांनी माता महाकालीचे दर्शन घेतले.

००००००

No comments:

Post a Comment