Search This Blog

Friday 5 April 2024

11 व 12 एप्रिल रोजी मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

 

11 व 12 एप्रिल रोजी मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

Ø  उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन 

चंद्रपूर, दि. 5 : निवडणुकीकरिता मतदान यंत्र तयार करण्यास ( Commissioning of EVM ) 11 व 12 एप्रिल 2024 या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या असून या प्रक्रियेदरम्यान निवडणुकीत उभे असलेले उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 13- चंद्रपूर लोकसभा क्षेत्र अंतर्गत 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक विभागामार्फत विविध कार्ये केली जात आहेत. यात निवडणूक कर्तव्यावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांकरीता टपाली मतपत्रिका व EDC उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याकरिता सुविधा केंद्र 7 व 8 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बी.जे.एम. कार्मेल अकॅडमी, DOC रोडजैन मंदीर जवळतुकुम चंद्रपुर येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच दिनांक 09, 10 व 11 एप्रिल रोजी 85 वर्ष वा त्यावरील वयाचे मतदार तसेच दिव्यांग मतदार ज्यांनी नमुना 12 (ड) मध्ये मागणी नोंदविलेली आहे, त्यांच्या मतदानाकरीता नेमून दिलेले पथक सकाळी 10 ते सांयकाळी 5 च्या दरम्यान घरोघरी फिरून मतदान नोंदवून घेणार आहेत.

71- चंद्रपूर विधानसभा मतदान संघात 379 मूळ मतदान केंद्र व 4 सहकारी मतदान केंद्र असे एकुण 383 मतदान केंद्र आहेत. या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदान स्लिपचे वाटप ब्लॉक लेव्हल अधिका-यांमार्फत 5 ते 12 एप्रिल पर्यंत करण्यात येणार आहे. या विधानसभा क्षेत्रात 5 स्थीर निगराणी स्थळे ठेवण्यात आली असून त्यांचे मार्फत 24 बाय 7 वाहनाची कसून तपासणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहचविणे व परत आणणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा लावण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरून मतदान यंत्र परत 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता असलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल.

            उमेदवारांच्या खर्चावर देखरेख करण्याकरिता व्हीडीओ निगरानी पथक (Video Surveillance Team) व सहायक खर्च निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. 71- चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात एकूण 192 मतदान केंद्रावर बेव कास्टींग करण्यात येणार असून  C-Vigil App (सतर्कता मोबाईल ॲप ) कार्यान्वीत केले आहे.आदर्श आचारसंहिता भंग झाल्याबाबत तक्रार असल्यास सदर App वर नागरिक तक्रार करू शकत असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment