Search This Blog

Monday, 28 September 2026

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत



नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी समन्वयाने काम करावे

Ø तहसीलदारांना दररोज आढावा घेण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 28 : दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतापर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ, गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करून त्याचा अहवाल दररोज सादर करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, या दृष्टीने शासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पीकपेरा व प्रत्यक्ष नुकसान यांची खातरजमा करून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तपणे शेतावर जाऊन पंचनामे करावेत..

 पिकांचे नुकसान हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कळीचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने या कामाकडे संवेदनशीलतेने पाहावे. आपल्या परिसरात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत आणि प्रशासन आपल्या शेतापर्यंत पोहोचत आहे, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून पंचनाम्याच्या कामावर बारकाईने लक्ष द्यावे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांनी काम करावे. तहसीलदारांनी या कामाचा दररोज आढावा घेऊन प्रगती अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

पंचनाम्याच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांकडून काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत वरिष्ठांकडे तातडीने अहवाल सादर करावा. तहसीलदारांनीही अधूनमधून प्रत्यक्ष पंचनामा सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाची पडताळणी करावी.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि विविध स्वरूपात दिसून येऊ शकते. त्यामुळे पंचनामे करताना संभाव्य नुकसानीचे सर्व पैलू विचारात घेणे आवश्यक आहे. केवळ पीक हिरवे दिसत आहे म्हणून त्याचे नुकसान झालेले नाही, असा निष्कर्ष काढू नये. प्रत्यक्ष उत्पादनावर होणारा परिणाम आणि पिकाची सद्यस्थिती यांचेही योग्य मूल्यमापन करावे.

ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी व महसूल यंत्रणेने सतर्क राहावे. तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा. कोणतेही गाव किंवा नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृशी अधिकारी गजानन पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. सोनोने यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००००

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून धान पिकाची पाहणी



दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून धान पिकाची पाहणी

Ø मूल तालुक्यातील चिखली, डोंगरगाव व राजोली येथील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा

चंद्रपूर, दि. 28 : पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मूल तालुक्यातील चिखली, डोंगरगाव व राजोली येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन भात पिकाच्या सद्यस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम, उपलब्ध पाण्याची स्थिती तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी यावेळी घेतली.

पाहणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, पुलकित सिंग, उपविभागीय अधिकारी आनंद जाधव, तहसीलदार मृदुला मोरे, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

चिखली येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शेतकरी सविता गुणाजी कडस्कर यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी केली. उशिरा झालेली भात लागवड आणि पावसाची कमतरता यामुळे पिकाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे तसेच फुटव्यांची संख्या कमी असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

त्यानंतर शेतकरी नरेश योगेश्वर कडस्कर यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि पिकांच्या वाढीबाबत माहिती जाणून घेतली.

डोंगरगाव येथे संजय यादव गेडाम यांच्या शेतातील तर राजोली येथे रमेश चितावार यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणीही पावसाच्या कमतरतेचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याचे तसेच भात पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी असल्याचे आढळून आले.

ई-पीक पाहणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या कामाचाही आढावा घेतला. एकूण खातेदारांपैकी किती खातेदारांची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे, याबाबत माहिती घेतली. ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत उर्वरित खातेदारांची ई-पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करा 

पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले. तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार यांच्याकडून भात पिकावरील रोग व कीड नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच त्यासंदर्भातील जनजागृती व प्रचार-प्रसिद्धीचा आढावाही त्यांनी घेतला.

पावसाची कमतरता लक्षात घेऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांना भेटी द्याव्यात. भात पिकावरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक सल्ला द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.

0000000

आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करा – जिल्हाधिकारी पंत



आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करा – जिल्हाधिकारी पंत

Ø महाराष्ट्र विधान परिषद नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक

चंद्रपूर दि. 28 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व संबंधित विभागांनी आदर्श आचारसंहितेचे गांभिर्याने पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिका-यांचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. पुढे जिल्हाधिकारी म्हणाल्या, निवडणुकांमध्ये सर्व संबंधित विभागांना देण्यात आलेली जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक आणि गांभिर्याने पार पाडणे अपेक्षित असते. यात कोणतीही चूक होता कामा नये. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. आचारसंहितेमधून दुष्काळी उपाययोजना, नुकसानीचे पंचनामे यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पंचनामे थांबवू नये. जिल्ह्याच्या सीमेवर एसएसटी/एफएसटी आदी पथकांची नियुक्ती करावी. आतापासूनच मतदान केंद्राची तपासणी करून किरकोळ दुरुस्ती असल्यास करून घ्यावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.

बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, शुभम दांडेकर, नगर पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.

असा आहे निवडणूक कार्यक्रम : 29 सप्टेंबर 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर असून, 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

0000000

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

 

ग्रामीण महिला व युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी

Ø जिल्हा परिषदेचे ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टल कार्यान्वित

चंद्रपूर, दि. 28 : ग्रामीण भागातील महिला व युवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी जि.प. महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत सुलभपणे पोहोचविण्यासाठी ‘ग्रामसमृद्धी’ हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

महिला व युवतींच्या कौशल्य विकासाला चालना देणे, रोजगार व स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाचे शाश्वत साधन निर्माण करणे हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे. यासोबतच मुला-मुलींना इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचाही विविध योजनांमध्ये समावेश आहे.

आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण : महिला व बालकल्याण विभागाच्या योजनेंतर्गत पात्र महिला व युवतींना त्यांच्या आवडी, गरज आणि उपलब्ध संधींनुसार विविध व्यवसाय व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणातून व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याबरोबरच स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा : या योजनांसाठीची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने gramsamruddhi.in/wcdscheme हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध योजनांची माहिती, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा.

पात्र महिलांनी लाभ घ्यावा – पुलकित सिंह

ग्रामीण भागातील अधिकाधिक महिला व युवतींना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र व इच्छुक महिला व युवतींनी ‘ग्रामसमृद्धी’ पोर्टलवर उपलब्ध योजनांची माहिती घेऊन या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

0000000

1 ऑक्टोबर रोजी जिल्हाभर एक तास सामुहिक श्रमदान

 

1 ऑक्टोबर रोजी जिल्हाभर एक तास सामुहिक श्रमदान

Ø ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 28 : ‘‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाचे आयोजन 1 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्ह्यात व्यापक स्वरूपात करण्यात येणार आहे. श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी गावांच्या निर्मितीसाठी लोकसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते, चौक, जलस्रोत परिसर तसेच इतर आवश्यक ठिकाणी सामूहिक श्रमदान व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती प्रत्येक गावाची आणि प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी झाली पाहिजे. 1 ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने किमान एक तास स्वच्छतेसाठी दिल्यास सामूहिक सहभागातून स्वच्छ आणि निरोगी गावांची निर्मिती अधिक प्रभावीपणे करता येईल. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचवावा तसेच या उपक्रमात  अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, युवक, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

0000000

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन

 सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 28 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध जनजागृतीपर व सर्जनशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळांसह पीएम श्री शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांनी केले आहे.

अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक सहभाग आणि देशाच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, समुदायापर्यंत अभियानाची माहिती पोहोचविणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे, समुदायाचा सक्रिय सहभाग वाढविणे, समन्वयक शिक्षकांची भूमिका निश्चित करणे तसेच उपक्रमाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच शाळांनी अभियानातील उपक्रमांची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ/रील्स तयार करून त्यांचा उपयोग जनजागृतीसाठी करावा. उत्कृष्ट उपक्रमांची नोंद घेऊन त्यांना व्यापक स्तरावर प्रसिद्धी देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात यावेत, असे नमूद करण्यात आले आहे. ‘बच्चों के सपनों का भारत’ या संकल्पनेशी विद्यार्थ्यांना जोडत त्यांच्या कल्पना, स्वप्ने आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी केले आहे.

0000000

चंद्रपूर जिल्ह्यात ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान-२०२६’ला सुरुवात

 

चंद्रपूर जिल्ह्यात ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान-२०२६’ला सुरुवात

Ø १४ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी आरोग्य तपासणी ; जिल्ह्यात १,५३७ पथके कार्यरत

Ø जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. २८ : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात दि. २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. समाजात निदान न झालेले संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांचे वेळीच निदान करणे आणि निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने बहुविध औषधोपचार सुरू करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या संदर्भात आज (दि. 28) जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पराग जीवतोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन टेंभुर्णे उपस्थित होते.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामीण भागासह शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांच्या पथकांमार्फत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची कुष्ठरोगाच्या दृष्टीने आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या संशयित व्यक्तींना पुढील तपासणीसाठी संदर्भित करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत निदान निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १,५३७ पथकांची निर्मिती

कुष्ठरुग्ण शोध अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अभियानांतर्गत एकूण ४ लाख ४१ हजार ३६२ घरांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ लाख ८६ हजार ८९०, शहरी भागातील २८ हजार ३७१ आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २६ हजार १०१ घरांचा समावेश आहे.

या सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात १,३८२ पथके, शहरी भागात ८० पथके आणि चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ७५ पथके, अशी एकूण १,५३७ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत निर्धारित कालावधीत घरोघरी भेट देऊन कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.

संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर

समाजात निदान न होता लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शक्य तितक्या लवकर आणि कोणतीही विकृती निर्माण होण्यापूर्वी शोधणे, त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नवीन सांसर्गिक रुग्णांचे वेळीच निदान करून संसर्गाची साखळी खंडित करणे हा अभियानाचा उद्देश आहे. त्यासोबतच कुष्ठरोगाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे. कुष्ठरोग दुरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करत सन २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे, हा या मोहिमेमागील व्यापक उद्देश आहे.

‘ही’ लक्षणे आढळल्यास तपासणी आवश्यक

त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा असणे व त्या ठिकाणी घाम न येणे, त्वचा जाड, बधीर, तेलकट अथवा चकाकणारी दिसणे, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्णपणे बंद करता न येणे ही कुष्ठरोगाची संभाव्य लक्षणे आहेत. तसेच तळहात किंवा तळपायाला मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे, त्वचेला थंड-गरम संवेदना जाणवू नये, हात-पायाच्या बोटांमध्ये वाकडेपणा येणे, हात किंवा पायात अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे किंवा चालताना पायातून चप्पल निसटणे अशी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

अभियानादरम्यान आरोग्य पथक घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीमध्ये कुष्ठरोगाची संशयित लक्षणे असल्यास ती न लपविता आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगावीत आणि आवश्यक तपासणी करून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान आणि नियमित बहुविध औषधोपचारामुळे रुग्णाला विकृतीपासून वाचविण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी कुष्ठरुग्ण शोध अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000000

Saturday, 26 September 2026

‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह




 ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह

ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Ø सिंदेवाही येथे जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकाचा शुभारंभ

Ø पहिल्या टप्प्यात 100 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न व केशर आंबा लागवड

चंद्रपूर, दि. 26 : ‘स्वस्तिक पॅटर्न’ वृक्षलागवडीमुळे कमी जागेत अधिक झाडांची लागवड करून पाण्याची बचत, हरित क्षेत्रात वाढ आणि पर्यावरण संवर्धन साधता येणार आहे. त्यासोबतच केशर आंबा फळबागांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना भविष्यात स्वतःचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.

विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्ही -बी -जी राम-जी),  ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व विविध योजनांच्या अभिसरणातून सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात 25 सप्टेंबर रोजी ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी त्या बोलत होत्या. ए. एस. नाथन (ऑक्सिजन मॅन) यांच्या संकल्पनेवर आधारित ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

स्वस्तिक पॅटर्नच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून त्या म्हणाल्या, सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी व सरपंचांचे नियमित प्रशिक्षण होते. त्यामुळे चारही जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थींना स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि या अभिनव पद्धतीचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी या केंद्राची ‘डेमो साइट’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्वस्तिक पॅटर्नमुळे कमी जागेत अधिक झाडे लावणे, झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळणे, पाण्याची बचत व संवर्धन तसेच हरित क्षेत्र वाढविण्यास मदत होणार आहे. केशर आंबा फळबाग लागवडीमुळे ग्रामपंचायतींना भविष्यात उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतही निर्माण होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 100 ग्रामपंचायती

या जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकानंतर पुढील महिन्यात खनिज क्षेत्र बाधित 50 ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवड, तर अन्य 50 ग्रामपंचायतींमध्ये केशर आंबा लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबत पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्रवाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी पंत यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपर्यंत उपक्रम नेण्याचे नियोजन : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग 

या पथदर्शी प्रयोगानंतर जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींमध्ये वृक्षलागवड करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी केशर वाणाच्या आंब्याची लागवड करण्यात येत आहे. फळबागा उत्पादनात आल्यानंतर फळांच्या विक्रीतून ग्रामपंचायतींना स्वतःचे उत्पन्न अर्थात प्राप्त होऊ शकते. या उत्पन्नाचा उपयोग गावातील रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा, शाळा व इतर विकासकामांसाठी करता येईल. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या स्वयंपूर्णतेला चालना मिळेल. या उपक्रमांच्या माध्यमातून गावांना सुंदर, हिरवेगार आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले.

ही केवळ वृक्षलागवड नव्हे, वृक्षक्रांती’ – ए. एस. नाथन : ‘ऑक्सिजन मॅन’ ए. एस. नाथन यांनी स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपणाबाबत मार्गदर्शन केले. स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण हा केवळ वृक्षलागवडीचा उपक्रम नसून विविध योजनांचे अभिसरण, रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा संगम घडविणारा अभिनव प्रयोग आहे. ही केवळ वृक्षलागवड नसून ‘वृक्षक्रांती’ असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत व मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर अंतरगाव व गडमौशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, विभागीय वन अधिकारी बापू येडे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली दुपटे, प्रभारी गटविकास अधिकारी विभावरी तितरे, लक्ष्मी कुमरे, कृषी अधिकारी महेश वट्टी, चंद्रकांत दलाल, बंडू गुंतीवार, थामदेव अगडे, प्यारेलाल देवगडे, ओम चनफने  यांच्यासह प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मीनारायण दोडके यांनी आभार मानले.

0000000

298 आरोग्य शिबिरांतून 24 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी


 

298 आरोग्य शिबिरांतून 24 हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

Ø 'श्री गणेशा आरोग्याचा’ उपक्रम

चंद्रपूर, दि. 26 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा' अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 16 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत 298 आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून 24 हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. लक्षदीप पारेकर यांच्या नियोजनातून शहरी भागातील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, आपला दवाखाना, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर विशेष आरोग्य शिबिरे घेण्यात आली.

24,548 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी

16 ते 25 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात एकूण 298 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण 24,548 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 10,868 पुरुष, 12,200 महिला, 1,334 बालके तसेच हृदयविकाराशी संबंधित 51 लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरोग्य शिबिरांमध्ये 3,166 लाभार्थ्यांची रक्त तपासणी तर 273 लाभार्थ्यांची ECG तपासणी करण्यात आली. याशिवाय 1,298 लाभार्थ्यांची आयुष्मान भारत व आभा कार्डसंबंधी नोंदणी करण्यात आली.

विविध आजारांची तपासणी व उपचारासाठी संदर्भ सेवा

शिबिरांमध्ये मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, त्वचारोग यासह विविध आजारांबाबत तपासणी व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेतच विविध आरोग्य सेवा व तपासण्या उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तपासणीदरम्यान आजाराची लक्षणे आढळलेल्या तसेच पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्यात आले.

138 जणांचे स्वेच्छा रक्तदान

आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांमध्ये रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली. विविध शिबिरांच्या माध्यमातून 138 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. तसेच अवयवदानाबाबत नागरिकांना माहिती देऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.

0000000

सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण








 

सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण

Ø प्रियदर्शिनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाचे आयोजन

चंद्रपूर दि. 26 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी  सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित 'गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम'  मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.

सात वर्षीय कृष्णा गादेवार याने गणरायाचा गजर गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर पुरुष आणि स्त्री यांचा एकत्रित आवाज काढत देवदत्त सातपुते यांनी आपल्या गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हितांशी भालेकर या विद्यार्थिनीने नृत्य सादर केले तर विजेंद्र टेंभुर्डे आणि त्यांच्या कलाकारांनी कथ्थक चे सादरीकरण केले. विद्यानिकेतन स्कूलचे किरण गीते व सहकाऱ्यांनी समूह नृत्य, किरण खोब्रागडे व सहकाऱ्यांनी सामूहिक नृत्य, लोकमान्य टिळक गर्ल्स प्राथमिक शाळेच्या सुनीता नागभीडकर यांनी सुद्धा नृत्य केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अभियंता रवींद्र हजारे यांनी तसेच सुरेश भालेकर यांनी सुद्धा गीत सादर केले. उप कृषी अधिकारी ज्योती कार्लेकर यांनी एकपात्री अभिनय सादर केला. तर राजुरा येथील गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. मुल नगर परिषदेचे तुषार मोटघरे, बल्लारपूर नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी संगीता उमरे व प्रणाली पाटील यांनी सुद्धा नृत्य सादर केले. स्थानिक कलावंत, विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, अतुल जटाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सपना पिंपळकर यांनी केले व रोहयो कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यात नायब तहसीलदार गीता उत्तरवार , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विक्रांत जोशी, निशा मेश्राम, वैशाली बावनकर यांचा समावेश होता.

सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

0000000

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

 



सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

Ø जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र रुग्णांच्या सेवेत

चंद्रपूर, दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डायलिसिस केंद्राचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामुळे मूल व लगतच्या परिसरातील किडनी विकाराच्या रुग्णांना डायलिसिसची  सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंत हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रवीण पंत, पोटदुखे हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. प्रसाद पोटदुखे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभिषेक दीक्षित, प्रा. महेश पानसे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकार्पणानंतर केंद्रामध्ये प्रत्यक्ष डायलिसिस सेवेला सुरुवात करण्यात आली. सिंदेवाही येथील नंदलाल मेश्राम या रुग्णावर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या केंद्रातील पहिले डायलिसिस करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे यापूर्वी डायलिसिस केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे जिल्ह्यातील तिसरे डायलिसिस केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे मूल व परिसरातील रुग्णांना त्यांच्या जवळच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील डायलिसिस केंद्रावरील रुग्णांचा ताण कमी होण्यासही मदत होईल.

किडनी विकाराच्या रुग्णांना नियमितपणे डायलिसिससाठी दूरवर प्रवास करावा लागू नये आणि आवश्यक आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे केंद्र जनतेच्या सेवेसाठी  कार्यान्वित झाले असून परिसरातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रामटेके यांनी केले.

0000000