डेटा मायग्रेशनकरीता जुन्या सेवार्थ प्रणालीतील कामकाज 20 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा
Ø जिल्हा कोषागार कार्यालयाच्या सर्व शासकीय कार्यालयांना सुचना
चंद्रपूर, दि. 12 : वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी वित्त विभागाच्या 1 जुलै 2026 च्या शासन निर्णयानुसार नवीन सेवार्थ प्रणाली लागू केली आहे. या सेवार्थ प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जुन्या सेवार्थ प्रणाली मधील सर्व कर्मचा-यांची माहिती आणि सेवा तपशील नवीन पोर्टलवर स्थलांतरित (डेटा मायग्रेशन) करण्याची प्रक्रिया सध्या कोषागार कार्यालय स्तरावर युद्ध पातळीवर सुरू आहे.
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना, जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कोणतेही नवीन कामकाज किंवा बील निर्मिती 20 ऑगस्ट 2026 नंतर करता येणार नाही. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर (संपूर्ण जिल्हा व तालुके) अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचा-यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच डेटा मायग्रेशनची प्रक्रिया आणि नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये जुलै 2026 चे वेतन देयक तयार करणे इत्यादी कामकाज 20 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. याबाबत कोणालाही मुद्दतवाढ मिळणार नाही, असे निर्देश लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांनी दिले आहे.
तरी सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी नवीन सेवार्थ प्रणालीमध्ये डेटा मायग्रेशन व पायलट देयक तयार करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाशी समन्वय साधून विहीत कालावधीत कामकाज पूर्ण करावे. यासाठी सर्व कोषागार / उपकोषागार कार्यालय सुटीच्या दिवशी सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment