Search This Blog

Friday, 21 August 2026

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवस विविध उपक्रम

Ø 28 ते 30 ऑगस्टदरम्यान क्रीडा व तंदुरुस्तीविषयक कार्यक्रम

Ø खेलेगा भारत, जितेगा भारत संकल्पनेवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 21 : महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. क्रीडा ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त, संघभावना, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा प्रभावी मार्ग आहे. याच व्यापक उद्देशाने सन २०२६ मध्ये खेलेगा भारत, जितेगा भारत या थीमवर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात 28 ते 30 ऑगस्ट 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत विविध क्रीडा, तंदुरुस्ती, जनजागृती आणि लोकसहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था, युवक मंडळे, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

पहिला दिवस – क्रीडा नायकांचा गौरव : 28 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात यावी. विविध प्रोत्साहनात्मक खेळ, क्रीडा आव्हाने, भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यशाचा गौरव, राष्ट्रीय व स्थानिक क्रीडा नायकांच्या प्रेरणादायी कामगिरीची माहिती देणे आदी उपक्रम आयोजित करता येतील.

दुसरा दिवस – ‘एक घंटा खेल के मैदान में’ : 29 ऑगस्ट रोजी  एक घंटा खेल के मैदान में, एक वर्ग, एक खेळ, शिक्षक विरुद्ध विद्यार्थी मैत्रीपूर्ण सामने, क्रीडा आव्हाने, पारंपरिक व देशी खेळ तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव यासारख्या उपक्रमांचे आयोजन करता येईल. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी क्रीडा पोशाख परिधान करून सहभाग नोंदवावा.

तिसरा दिवस – सायकलिंग, पदयात्रा आणि धावणे : 30 ऑगस्ट रोजी सामूहिक क्रीडा शपथ घेऊन ‘सायकल ऑन संडे’, पदयात्रा, धावणे व रॅली यासारखे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. या उपक्रमांमध्ये स्थानिक खेळाडू, क्रीडापटू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात यावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहर, शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा संघटना तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आपल्या स्तरावर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करून क्रीडा संस्कृतीचा विस्तार आणि निरोगी समाजाच्या निर्मितीस हातभार लावावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment