स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्र्यांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी ऑनलाइन संवाद
मुंबई, दि. 14 : गावपातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यभरातील विविध आरोग्य समित्यांच्या अशासकीय सदस्यांशी थेट ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता होणाऱ्या या जनसंवादातून गावागावातील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना आणि अपेक्षा थेट आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचणार असून, त्याचवेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे.
निरोगी महाराष्ट्रासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भागीदारी अधिक मजबूत करणे, या दिशेने होणारा हा जनसंवाद आरोग्य क्षेत्रातील लोकसहभागाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती, जन आरोग्य समिती, रुग्ण कल्याण समिती आणि एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती या समित्या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या समित्यांमध्ये ग्रामपंचायत प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, युवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांचा सहभाग असतो.
आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक अडचणी याबाबत या जनसंवादातून थेट चर्चा होणार आहे. निवडक पाच समिती सदस्यांना आपले मनोगत मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मार्गदर्शन करणार आहेत.
गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत व्यापक सहभाग : या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावर पूर्वतयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर समितीतील अशासकीय सदस्यांना एकत्रित उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गावपातळीवर समिती सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित उपस्थित राहून ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडक सदस्यांसोबत थेट द्विमार्गी संवादासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून, इतर समिती सदस्यांसाठी युट्यूब व ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध राहणार आहे.
124 आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटन : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांत नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच कार्यान्वित झालेल्या आरोग्य संस्थांचे ऑनलाइन उद्घाटनही करण्यात येणार आहे. उपलब्ध नियोजनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, यांसह विविध आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. यामध्ये ग्रामीण भागासोबतच महानगरपालिका क्षेत्रातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश असून, नागरिकांना त्यांच्या घराजवळ गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यामुळे अधिक बळ मिळणार आहे.
लोकसहभागातून सक्षम होणार आरोग्य व्यवस्था : आरोग्य व्यवस्था ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी न राहता त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने आरोग्य समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा समिती सदस्यांशी होणारा हा थेट संवाद आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गावातील आरोग्यविषयक प्रश्न थेट शासनापर्यंत पोहोचविणे, स्थानिक पातळीवरील चांगले उपक्रम जाणून घेणे, आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतील अडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देणे, हा या जनसंवादाचा प्रमुख उद्देश आहे.
No comments:
Post a Comment