कापूस पिकावरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन
चंद्रपूर, दि. 19 : कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तूडतूडे आणि फुलकिडे ह्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडींचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून, तूडतुड्याचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून, फुलकीडयांचा ऑगस्टच्या पहिला आठवडयापासून तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डॉंबकळयाच्या स्वरूपात ऑगष्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडींमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडीचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येत. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा.
रस शोषक किडीचे व्यवस्थापन : 1. पिकामध्ये पिवळे चिवट सापळे (25/हे.) लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे. 2. वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे, यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खादयतणे जसे अंबाडी, रानभेडी ई. नष्ट करावी. 3. मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा जेणेकरून कपाशीची अनावश्यक वाढ होणार नाही आणि दाटणार नाही. पर्यायाने अशा पीकावर किडही
कमी प्रमाणात राहील.
4. रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफीड माशी, कातीन, ढालकिडे, कायसोपा, अॅर्नेसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक ई संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. 5. रस शोषक किडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भाव बाबत सर्वेक्षण करावे. 6. सरासरी संख्या 10 मावा/पान किंवा 2 ते 3 तूडतूडे/पान किंवा दहा फूलकीड/पान किंवा मावा, तूडतूड़े आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा/पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा.
गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन : 1. पिक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनतर फोरोमोन सापळ्याचा वापर करावा. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फुट अंतर ठेवावे जेणेकरून फेरोमोन सापळ्याच्या प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तोन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी 10 ते 20 कामगंध सापळे लावावेत. 2. प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जिनींग फॅक्टरीमधे 15 ते 20 कामगंध सापळे लावून दर आठवडयाने पतंगाचा नायनाट करावा.
3. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल.
4. पिक उगवणी नंतर 35 ते 40 दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅडॉडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिलीप्रति 10 ली पानी याप्रमाणे फवारणी. 5. पिक उगवणी नंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकाची 1.5 लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा सोडावे. 6. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनसाठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी.
अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला भेट द्यावी, असे जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment