Search This Blog

Sunday 31 May 2020

शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत फेरपालट करावे

शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत फेरपालट करावे
एकच एक पीक घेण्याची पद्धत बदलविण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 31 मे : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाला सुरुवात होत असताना केवळ एकच एक पीक एकच एक जमीन क्षेत्रावर पिकाची फेरपालट न करता करीत राहणे जमिनीवर देखील अन्याय असून बदलती परिस्थिती लक्षात घेता खाद्यान्न निर्मिती जनावरांना चारा मिळणे आणि हातात आवश्यक पैसा राहणे यासाठी आपल्या पीक पद्धतीचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय हे बघून पिकाची पद्धत ठरली गेली पाहिजे सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा अशी मार्गदर्शक सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील  यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केली आहे.
साधारणता 1990 नंतर सोयाबीन पिकाची लागवड विदर्भ व अन्य भागात झाल्याची दिसते. त्या अगोदर मूगज्वारीमटकीकापूसहे पीक शेतकरी घेत होते. त्यापैकी मूग,उडीदमटकीया पिकांपासून जनावरांना कडबा अर्थात चारा मिळत होता. तसेच ज्वारी पिकापासून हिरवा चारा व कडबा मिळत होता. परंतु, सोयाबीन या नगदी पिकाकडे सगळे वळल्यामुळे मुंगउडीदज्वारी,मटकीया पिकांचा अंतर्भाव पीक संरचनेमध्ये करण्याची सूचना कृषी विभागाने शेतकऱ्यांना केली आहे.
आंतर पिकाबाबत सल्ला देतांना कृषी विभागाने आपल्या जमिनीची पत मध्यम भारी असेल तर तूर पिकामध्ये सोयाबीन एकास दोन किंवा दोनास चार या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निवड तुरी पेक्षा फायदेशीर आढळून आले आहे. तसेच कपाशी पिकामध्ये लवकर येणारे सोयाबीन हे एकास एक किंवा एकास दोन या गुणोत्तरात घेणे फायदेशीर ठरू शकते.
कोरडवाहू शेती असेल तर धान्य चारा व कडधान्यांची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळविण्याकरिता सोयाबीन ज्वारी व तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीत ( 6 : 2 : 1 ) किंवा (9 :2 : 1 ) या ओळीच्या प्रमाणात पेरणी करावी.
तसेच जमिनीत कपाशी तूर ज्वारी ही सलग पिके घ्यावीत.आंतरपिके तसेच दुबार पिकासाठी सुद्धा या जमिनी योग्य असल्यास कपाशी सोबत मूग उडिद ( एकास एक ) ज्वारी सोबत मूग तूर ( तीनास तीन ) तूर + मूग / उडिद ( एकास दोन कींवा दोनास चार ) तूर अधिक सोयाबीन ( एकास दोन ) कपाशी अधिक ज्वारी अधिक तूर अधिक ज्वारी (यासाठी 3 :1 : 1 : 1 / 6 : 1 : 2 : 1 ओळी ) पद्धत अवलंबवावी.
याशिवाय डवरणी च्या दोन पाळ्या द्याव्यात पहिली डवरणी पेरणी 15 ते 20 दिवसांनी व दुसरी 30 ते 35 दिवसांच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा निंदणी करावे. दुसऱ्या डवरणी च्या वेळी त्या डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी.यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सगळ्या पडल्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होईल. सोयाबीनचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रा सोबत 50 ते 70 दिवसांनी दोन टक्के युरियाची फवारणी करा किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत 2% पाण्यात विरघळणारे खत वापरणे योग्य ठरेल.
00000

चंद्रपूर जिल्हयातील 63 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण

चंद्रपूर जिल्हयातील 63 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
Ø  सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 10
Ø  कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत तीन हजारावर घरांचे सर्वेक्षण
Ø  49 नमुने प्रतीक्षेत
चंद्रपूर,दि.31 मे: जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9 रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 10 असून  या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन ) मध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेचआयएलआयसारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआयसारीचे 11 नमुने घेतले असून आयएलआयसारीच‌े 10 नमुने निगेटिव्ह आले आहेत.तरएक नमुना प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण 943 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 872 आहे तर 49 नमुने प्रतीक्षेत आहेत.
दिनांक 31 मे रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 293 नागरिक आहेत. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 427 नागरिकतालुकास्तरावर 460 नागरिक तर जिल्हास्तरावर 406 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 72 हजार 854 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच,63 हजार 654 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले असून हजार 200 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
00000

ऐतिहासिक रामाळा तलावाची सफाई सुरू

ऐतिहासिक रामाळा तलावाची सफाई सुरू
सौंदर्यीकरण व गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक
चंद्रपूर,दि.31 मे: मान्सूनच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाची मान्सून पूर्व सफाई आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे 30 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेत रामाळा तलावातील गाळ काढणे, सफाई, सौंदर्यीकरण यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रामाळा तलावाची मान्सूनपूर्व सफाई व गाळ काढणे गरजेचे आहे या विषयावर चर्चा झाली तसेच तात्काळ सफाईचे काम सुरू करावेअसे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहितेसार्वजनिक बांधकाम  विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळजिल्हा खनिकर्म अधिकारी जी.डि कामडे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागकार्यकारी अभियंता यांत्रिकी उपसासिंचन विभागप्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारीडब्ल्यूसीएलचे अधिकारी, इको प्रो चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे तसेच रश्मी बाबेरवाल उपस्थित होते.
शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण, मान्सून पूर्व गाळ काढणे, सफाई करणे महत्त्वाची असून यासाठी सामाजिक दायित्व निधीतून हे काम करावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे, यासंदर्भात विविध विभाग प्रमुख व इको प्रोच्या अध्यक्षांनी आपल्या सूचना यावेळी दिल्यात.
आज पासून रामाळा तलावाची गणपती विसर्जनाच्या बाजूची सफाई सुरू झाली असून लवकरच सफाईचे काम पूर्ण होणार आहे.
00000

आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार मोफत तांदूळ व चना

आता विना शिधापत्रिकाधारकांना सुद्धा मिळणार
मोफत तांदूळ व चना
Ø  पात्र लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होणार
Ø  लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे धान्य वितरण दुकानाची माहिती देण्यात येणार
चंद्रपूर, दि.31 मे: ज्या कुटुंबाकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच इतर राज्य योजनेअंतर्गत कोणतीही शिधापत्रिका नाहीज्यांना अन्नधान्याची गरज आहे असे सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बलविस्थापित मजूररोजंदारी मजूर अशा गरीब व गरजु शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रति व्यक्ती प्रति माह 5 किलो तांदूळ मोफत वितरीत करण्याचे निर्देश आहेत. तसेच शासन पत्र दिनांक 27 मे, 2020 नुसार या लाभार्थ्यांना प्रति कुटुंब 1 किलो अख्खा चना मोफत वितरीत होणार आहे.अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून, 2020 या दोन महिन्याच्या कालावधी करिता मोफत तांदूळ वितरीत करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक 19 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्देश प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात उपरोक्त शासन निर्णयानुसार प्रत्येक गावनिहाय व शहरी भागात वार्डनिहाय संबंधित तहसील, नगरपालीकामहानगरपालीका यांच्याकडून गरजु व्यक्तींची यादी तयार करण्यात आली असून या यादीनुसार जिल्ह्यात 32 हजार 642 कुटुंबामधील 1 लाख 16 हजार 124 लाभार्थी व्यक्ती निश्चित करण्यात आले असून या सर्व लाभार्थ्यांना निश्चित केलेल्या स्वस्त धान्य दुकानातून जून महिन्यात मे व जून या दोन्ही महिन्याचे धान्य एकत्रितपणे म्हणजेच 10 किलो प्रति व्यक्ती तांदूळ व 2 किलो अख्खा चना प्रति कुटुंब या प्रमाणे एकदाच वाटप करण्यात येईल.
पात्र लाभार्थ्यांची यादी चंद्रपूर जिल्हयातील www.chanda.nic.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे त्यांना धान्य वितरीत करण्यात येणाऱ्या दुकानाची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांना निश्चित करुन दिलेल्या केंद्रावरूनस्वस्त धान्य दुकानातूनच धान्य प्राप्त करून घ्यावे लागेल. इतर केंद्रातून, स्वस्त धान्य दुकानातून त्यांना धान्य मिळणार नाही. निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्र, स्वस्त धान्य दुकानामध्ये त्यांना जोडलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांनी धान्य घेण्यासाठी दुकानात एकाच वेळी गर्दी करु नये व मास्क घालून यावे. तसेच दुकानात सामाजिक अंतराचे पालन करावे. वरील धान्य वितरणासंबंधी नागरीकांच्या काही तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक 1800-22-4950 व 1967 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.
000000

पीपीई किट आता मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध

पीपीई किट आता मेडिकल स्टोअर मध्ये उपलब्ध
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा पुढाकार
चंद्रपूरदि. 31 मे: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आता पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट)  मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहीते व सहाय्यक आयुक्त औषधी,अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर पी. एम बल्लाळ यांनी दिली आहे.
मजबूत पुरवठा साखळी विकसित होईपर्यंत विक्रेत्यांशीनिर्मात्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग हे  काम बघणार आहे.
               सध्या चांडक मेडिकलच्या 6 वेगवेगळ्या दुकानात पीपीई किट उपलब्ध आहेत. यासंदर्भात ऑर्डर दिल्यास 10 मिनिटात ती उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर यासारख्या प्रमुख तालुक्यात एका दुकानात पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
सामान्य नागरिकांना पीपीई किट उपलब्ध होणार नसून फक्त जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या काळात पीपीई किट गरजेची आहे. त्यामुळे आता पीपीई किट सहज उपलब्ध होणार आहे.
00000

Saturday 30 May 2020

नवीन येणाऱ्या रुग्णावर एकाच ठिकाणी उपचार करण्याची उपाययोजना ठेवा


नवीन येणाऱ्या रुग्णावर एकाच ठिकाणी
उपचार करण्याची उपाययोजना ठेवा
विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी घेतला कोविड उपचाराचा आढावा
चंद्रपूर, दि. 30 मे : आज जी परिस्थिती मुंबई-पुण्याची आहे. ती उद्या चंद्रपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांची होऊ शकतेहे लक्षात घेऊन पुढील काळाचे नियोजन करा. सर्व गंभीर रुग्णांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक उपाययोजनांसह उपचार करता येईलअशी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निर्माण कराअसे निर्देश विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी आज येथे दिले.
       विभागीय आयुक्त संजीव कुमार आज गडचिरोली येथून चंद्रपूर येथे कोविड संदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर येथे आले होते.त्यांच्यासोबत अतिरीक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. त्यांनी सर्वप्रथम विभागीय नियंत्रण कक्षाला भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या जिल्ह्याच्या एकत्रित वार रूमची पाहणी केली. सोबतच आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
कोरोना संदर्भात रुग्णांवर उपचार करतांना अधिक रुग्ण येण्याच्या नियोजनात अनेक ठिकाणी उपचाराची व्यवस्था केली जाते. तथापिएकत्रित उपचार पद्धतीला यापुढे प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डीमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहितेचंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे याशिवाय विविध विभागाचे विभाग प्रमुख,आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी या संदर्भात सुरू असलेल्या प्रबोधन, प्रशिक्षणशिक्षण व कार्यवाहीची माहिती दिली. तर उपजिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी देखील यावेळी सादरीकरण केले. या सादरीकरना दरम्यानसंजीव कुमार यांनी नव्याने चंद्रपूर जिल्ह्यात उभे रहात असलेल्या कोरोना प्रयोगशाळेचा लाभ चंद्रपूर सोबतच गडचिरोलीला देखील व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या संदर्भात अहवाल गोळा करण्याची कार्यपद्धत अवलंबण्याचे आग्रही प्रतिपादन केले.
जोखीम असणाऱ्या कुटुंबाकडे अधिक लक्ष ठेवा. ही माहिती पुढील दीर्घकाळासाठी साठवून ठेवा. जेणेकरून मुंबई पुण्यासारखी परिस्थिती पुढच्या काळात उद्भवल्यास आपल्याकडे जोखमीच्या व कमी जोखमीच्या रुग्णाची नोंद असेलत्यानुसार गतिशील पद्धतीने उपचार करता येईलयासाठी ही विभागणी करून ठेवण्याबाबत त्यांनी यावेळी बजावले. आपल्याकडची यंत्रणा मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेतानाच रुग्ण एकाच वेळेस वाढल्यानंतर प्रत्येकाकडे योग्य पद्धतीने लक्ष देता येईल अशा पद्धतीची एकत्रित उपचार पद्धत एकाच ठिकाणी होईलअसे नियोजन करण्याचे देखील त्यांनी यावेळी सुचविले.
 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्याचे ही त्यांनी निर्देश दिले. महानगरपालिका हद्दीमधील झोपडपट्टीवर अधिक लक्ष ठेवा. अनेक वेळा अपुऱ्या मनुष्यबळ व आरोग्य व्यवस्थेमुळे अशा ठिकाणी उद्रेक होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे सर्व यंत्रणेने केवळ महानगरपालिकेवर दायित्व न ठेवता यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
चंद्रपूर जिल्ह्याने अतिशय जागरूकतेने या काळामध्ये लढा दिल्याबद्दल त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. मात्र येणारा काळ आणखी कठीण असणार आहे. कारण जे मुंबई पुण्यामध्ये उद्रेकाचे प्रमाण आहे. तो कालावधी नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यात पुढील महिन्यात संभवू शकतो.अशा वेळी येणाऱ्या परिस्थितीला सामना देण्यासाठी आपली यंत्रणा योग्य माहितीसह तयार ठेवावी, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
000000

जिल्ह्यातील अॅक्टिव 10 रुग्णांची प्रकृती स्थिर

जिल्ह्यातील अॅक्टिव 10 रुग्णांची प्रकृती स्थिर
आतापर्यंत 72 हजार नागरिक जिल्ह्यात दाखल
Ø  जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित
Ø  4 हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
Ø  10 हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत
चंद्रपूरदि. 30मे: जिल्ह्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9 रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत बाहेर राज्यातूनजिल्ह्यातून  एकूण 72 हजार ‌412 नागरीक चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेचआयएलआयसारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकुण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. 933 स्वॅब नमुने तपासणीस पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुनेनिगेटिव्ह 866 नमुने तर 45 नमुने प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यामध्ये ग्रामस्तरावर 3 हजार 483 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तालुकास्तरावर 460 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तरजिल्हास्तरावर 311 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहेत असे एकूण जिल्ह्यातील 4 हजार 254 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच,62 हजार 232 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहेत. तर 10 हजार 180 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
00000

फी वाढीसंदर्भात जिल्हा परिषद येथे आढावा सभा

फी वाढीसंदर्भात जिल्हा परिषद येथे आढावा सभा
चंद्रपूरदि.30 मे: जिल्ह्यातील शाळेची फी वाढफी भरणे संदर्भात आमदार यांचे प्रतिनिधीसंस्थाचालक,यंग चांदा बिग्रेड व पालक प्रतिनिधी यांची समन्वय सभा शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर व शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांचे प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दिनांक 22 मे रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उपशिक्षणाधिकारी (माध्य)पूनम म्हस्केउपशिक्षणाधिकारी (प्राथ) मोहन पवार,विस्तार अधिकारी शिक्षण गणेश चव्हाणचंद्रपूर विधानसभेचे आमदार प्रतिनिधी प्रतीक शिवणकरमहिला प्रमुख यंग चांदा बिग्रेड वंदना हातगावर तसेच पालक प्रतिनिधीविविध शाळेचे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेमध्ये  शिक्षणाधिकारी (माध्य) संजय डोर्लीकर यांनी शासन परिपत्रक दिनांक 30  मार्च 2020 व शासन निर्णय दिनांक 8 मे 2020 चे वाचन करून सविस्तर माहिती दिली.तर, शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांनी सभेमध्ये  आरटीई अॅक्ट 2009 प्रमाणे प्रवेश प्रक्रिया व फी संबंधाने मार्गदर्शन केले.
सदर सभेमध्ये फी वाढ बाबत,फी इंस्टालमेंटचालू वर्षाची फी बाबतफी सक्तीचुकीचे मोबाईल संदेशविद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांच्या गृह भेटीकेवळ फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून टी.सी.देणेपालकशाळा व शासन यांनी मिळून फी बाबत तोडगा काढणेसंस्थेला सहाय्य होण्यासाठी शासनाला आर्थिक मदत मागणेशासन निर्णय पालकांना अवगत करणेफी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना टी.सी. न देणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येवू नये. पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21 मधील देय,शिल्लक फी वार्षिकएकदाच न घेता मासिक,त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय दयावा.शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोणतीही फी वाढ करु नये,लॉकडाऊन कालावधीत गैरसोई टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय द्यावा.फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तगादा लावू नये.अतिशय गरीब विद्यार्थी असेल तशी खात्री होत असेल तर फी संबंधाने सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा, या बाबींवर चर्चा होऊन अंमलबजावणी करण्याचे ठरविण्यात आले.
00000

जिल्ह्यात आतापर्यंत दिड लाख नागरिकांकडून ‘आरोग्यसेतू’ॲप डाऊनलोड

जिल्ह्यात आतापर्यंत दिड लाख
नागरिकांकडून आरोग्यसेतूॲप डाऊनलोड
चंद्रपूर, दि.30 मे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासन त्यासोबतच जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. सर्वात महत्त्वाची उपायोजना म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहितीआजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे. यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले आहे. जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 525 नागरिकांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावेअसे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
हे अ‍ॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत 11 भाषांमध्ये उपलब्ध आहे.कोरोना विषाणूबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभारावायासाठी हे अ‍ॅप मार्गदर्शन करेल.
सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करते. जीपीएसद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. तसेच कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. 6 फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकते.
कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. अंगणवाडीआशा कार्यकर्त्यांसह शालेय शिक्षक आणि आरोग्य खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या अ‍ॅपबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकते.
कोरोनाला घाबरू नकाआरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फोनमध्ये आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य सेतू अ‍ॅप असे करा डाऊनलोड :
गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आरोग्य सेतू सर्च करून हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बनवलेले आहे. त्यामुळे एनआयसीने जारी केलेले ॲपच डाऊनलोड करावे.
असे वापरावे आरोग्य सेतू अ‍ॅप :  
आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हा अॅप डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लुटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन  ऑलवेज असे ठेवावे. आपल्याला आवश्‍यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्यसेतूद्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे कायाची माहिती देखील लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयीची माहितीदेखील त्यावर मिळत असल्याने हा अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आरोग्य सेतू अॅपचा असा करा वापर :  
आरोग्य सेतू अॅप वापरण्यासाठी आपला फोन नंबर रजिस्टर करा.फोन नंबर टाकल्यावर एक ओटीपी येईल. जो इंटर केल्यावर अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन होईल.हे एक कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप आहे.इंटर झाल्यानंतर अॅप आपल्याला ब्लूटूथ आणि जीपीएस अॅक्सेस विचारते.आपल्या डिव्हाईसमधून युझरचा डेटा अनक्रिप्टेड फॉर्ममध्ये घेतला जातो.अॅप उघडल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारली जातात. यामध्ये जेंडरनाववयव्यवसाय आणि मागील 30 दिवसांच्या ट्रॅव्हल हिष्ट्रीबाबत विचारलं जातं. अर्थात या माहितीला आपण स्कीप देखील करू शकतो.यानंतर अॅपची भाषा निवडावी लागते.
अ‍ॅप मध्ये सर्व राज्यांमधील हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली आहे.आपल्याला वाटल्यास आपण या संकटकाळात स्वतःला स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करू शकता.या अॅपमध्ये  युझर आपले सेल्फ असेसमेंट करू शकतात.
काय आहेत खास फीचर्स :
आरोग्य सेतु अॅपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अॅप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देत.
00000

शेतकऱ्यांना थेट बांधावर होणार कृषी निविष्ठांचा पुरवठा

शेतकऱ्यांना थेट बांधावर होणार कृषी निविष्ठांचा पुरवठा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचा पुढाकार
चंद्रपूरदि. 30 मे:  कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर  जिल्हांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर येऊन बियाणेखते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टसिंग न पाळले गेल्यामुळे कोरोना विषाणुंचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होवू शकतो त्यामुळे जसे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने करण्यात आला त्याच धर्तीवर कृषि निविष्ठांचा पुरवठा कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गटशेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय ठेवून करता येणार आहे. कृषि विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ग्राम पातळीवर समन्वयक म्हणून काम करुन कृषि सेवा केंद्र आणि शेतकरी गट यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे शेतावर कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे,असे एका पत्रकाद्वारे आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.
अशी असणार कार्यवाही :
शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी. नोंदणी करतांना आत्मा अंतर्गत ज्या गटांची नोंदणी झालेली आहे.त्याच गटाकडे नोंदणी होईल असे पाहावे.त्यानिमित्ताने 100 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी कोणत्या ना कोणत्या गटाकडे करणे शक्य होईल.
शेतकऱ्यांनी त्यांचे नावपत्तासर्वे नंबर,गट नंबरमोबाईल क्रमांकआधार क्रमांकत्यांना ज्या कृषि सेवा केंद्रामधुन निविष्ठा खरेदी करावयाच्या आहेत त्यांच्या नावासहत्यांना खरीप हंगामामध्ये आवश्यक असणारे विविध पिकांचे बियाणेखतेकिटकनाशके यांची मागणी गटाकडे करावी.
कृषि विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी,कर्मचारी यांनी उत्पादक शेतकऱ्यांचे गट पिकनिहाय तयार करुन शेतकऱ्यांना गटाद्वारे आवश्यक बियाणे नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. ही सर्व कार्यवाही क्षेत्रीय स्तरावरील कृषि सहाय्यककृषि पर्यवेक्षकमंडळ कृषि अधिकारी यांनी समन्वयक म्हणून करावी.
निविष्ठा नोंदणी गटाकडे झाल्यानंतर गटप्रमुखानेच बियाणेखते,किटकनाशके खरेदी करावी.जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.
ज्या विक्रेत्यांना शक्य. आहे अशा विक्रेत्यांनी मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घ्यावी आणि मोठी मागणी असल्यास मागणीप्रमाणे बियाणे खते व किटकनाशके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहच करावेत.
सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकी करीता कृषि विभागाच्या अधिकारीकर्मचाऱ्यांनी समन्वयक म्हणून काम करावे. या वाहतुकीकरीता आवश्यक असणारे परवाने कृषि विभागामार्फत गटांकरीता उपलब्ध करून द्यावेत.
मंडळ कृषि अधिकारीकृषि पर्यवेक्षक किंवा कृषि सहाय्यक यांचे मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे शेतकरी आणि कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवून आणावा.जेणेकरुन सदर निविष्ठा खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता राहून शेतकऱ्यांची फसवणुक होणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या आणि वाजवी दरामध्ये निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्याकडून निविष्ठा खरेदी करण्यासाठी नोंदणी करावी.
शेतकरी व निविष्ठा विक्रेता यामधील आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत पारदर्शक पद्धतीने हाताळण्यात याव्यात. कृषि विभागाच्या अधिकाऱ्याने या बाबी हाताळू नये.
निविष्ठा पुरवठ्याबाबत तालुका स्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा व दि.31 मे 2020 पुर्वी अथवा पेरणी हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व निविष्ठांचा पुरवठा होईल असे पहावे.
00000

Friday 29 May 2020

चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील दोघांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये अलगीकरण कक्षातील 
दोघांचा मृत्यू, 
एकाने केली आत्महत्या ; दुसऱ्याचा आकस्मिक मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सकाळी दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (इन्स्टिट्यूशनल कारेन्टाइन )अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला.
      यापैकी चंद्रपूर येथील श्याम नगर भगतसिंग चौक येथील रहिवासी असणाऱ्या ३० वर्षीय युवकाने सकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहातील अलगीकरण कक्षात ७.३०च्या सुमारास आत्महत्या केली. हा युवक नागपूर येथून आल्यानंतर अलगीकरण कक्षामध्ये होता.
     दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवासी कक्षामध्ये ( शासकीय निवासस्थान ) आपल्या कुटुंबासह अलगीकरणात असणार्‍या ४० वर्षीय नागरिकाचा प्रकृती अस्वास्थामुळे आकस्मिक मृत्यू झाला. मूळचे यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील शिरपूर गावाचे आहे. त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत यावेळी होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. कुटुंबासोबत त्यांचा सकाळी संवादही झाला. सकाळी साडेसातला ते आराम करत होते.झोपेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन्ही मृतकांचे कोरोना स्वॅब देखील घेण्यात येणार आहेत. या दोन्हीही रुग्णांची प्रकृती स्थिर होती. दोन्हीही रुग्ण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या इमारतीमध्ये अलगीकरणात होते. या दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार , मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

सर्वांसाठी मिळणार ! महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

सर्वांसाठी मिळणार ! महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयातही
मिळणार कोविड-19 आजारग्रस्त गंभीर रुग्णास उपचार
चंद्रपूर,दि.29 मे: कोविड-19 उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून आता सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. यापुर्वी राज्यातील सुमारे 85 टक्के लोकसंख्येचा समावेश होता तथापि राज्यातील कोविड-19 उद्रेकाची सद्यस्थिती पाहता सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असून उर्वरित नागरिकांना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुज्ञेय 996 उपचारपद्धतीचा लाभ मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या योजनेतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरीता लाभार्थी रुग्णांबरोबर राज्यातील सदर योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-19 आजारासाठी उपचार अनुज्ञेय राहील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी व संनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केले जात आहे.
योजनेच्या लाभाचे निकष :
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पिवळेकेशरीअंत्योदयअन्नपुर्णा योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यांमधील (औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जीवित नोंदणीकृत लाभार्थी कुटुंब समाविष्ट आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणना-2011 मधील नोंदित लाभार्थी कुटुंबे समाविष्ट असून ग्रामीण भागासाठी स्वाभाविक निकष व शहरी भागासाठी व्यावसायिक निकष ठेवण्यात आले आहेत.
हि द्यावी लागणार आवश्यक कागदपत्रे:
लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळीअंत्योदय,अन्नपूर्णा, केशरीशुभ्र शिधापत्रिका पात्र राहील. त्याचप्रमाणे, 31 जुलै 2020 पर्यंत किवा पुढील आदेशापर्यंत शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबे सुद्धा सदर योजनेस पात्र राहतील.
परंतु,लाभार्थ्यांनजवळ शिधापत्रिका नसल्यास तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक पुरावा जन्य कागदपत्र सादर करावे लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांर्भीयउपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्राबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारीराज्य आरोग्य हमी सोसायटीवरळीमुंबई यांना देण्यात आली आहे.
असे मिळणार मोफत उपचार :
सद्यस्थिती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 हजार 209 उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील 2.3 कोटी कुटुंबांना मिळत आहे.
शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 उपचारांपैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवण यंत्रांचा उपचार वगळता 120 उपचार अंगीकृत खासगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यताप्राप्त दराने देण्यात येणार आहे.
काही किरकोळ व काही मोठे उपचार व काही तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत. त्या उपचार व तपासण्या सदरील योजनेतर्गत अंगीकृत सर्व लाभार्थ्यांना (योजनेतंर्गत लामार्थी असलेले व लाभार्थी नसलेले) सीजीएचएस च्या दरानुसार (एनएबीएच,एनएनबीएल) उपलब्ध करून देण्यात येतील.
कोविड -19 साठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरीता पीपीई किट्स व एन-95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल.त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य'चिकित्सक यांचेमार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील.
मोफत वैद्यकीय सेवेचे स्वरूप:
या योजनेअंतर्गत रुग्णालयातील खाटा,आवश्यक औषधोपचार, निदान सेवा, शुश्रुषा व भोजन, भूलसेवा व शस्त्रक्रिया, एक वेळचा परतीचा प्रवास या मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
टोल फ्री क्रमांक 155338 / 18002332200 तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राला संपर्क करा.अधिक माहितीसाठी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

00000

जिल्ह्यातील 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे


जिल्ह्यातील 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे
Ø  सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 10
Ø  कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण
Ø  67 नमुने प्रतीक्षेत
Ø  चार हजारांवर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
चंद्रपूर,दि.29 मे: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये  आतापर्यंत  12 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असल्याची माहिती  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहुल कर्डिले यांनी आज दिली.
जिल्ह्यामध्ये  यापूर्वी  2 मे ( एक रूग्ण ), 13 मे ( एक रुग्ण ) 19 व 20 मे ( 10 रुग्ण ) पॉझिटिव्ह आढळले होते. या एकूण 12 रुग्णांना आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाने कोरोना आजारातून बरे झाले असल्याचे जाहीर केले आहे. यातील पहिला रुग्ण नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आला होता.तर एका युवतीला दोन दिवसांपूर्वी बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. आरोग्य विभागाने नव्याने जाहीर केलेल्या आरोग्य सूत्रानुसार 19 व 20 मे रोजी पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना 10 दिवसानंतर कोणतेही लक्षणे न दिसल्यामुळे या आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता 10 रुग्ण जिल्ह्यात  वैद्यकीय वास्तव्यात आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेचआयएलआयसारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआयसारीचे 9 नमुने घेतले असून सर्वच आयएलआयसारीच‌े 9 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
कोविड-19 संक्रमित 22 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-3ठाणे -2पुणे-6यवतमाळ -2नाशिक -3कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण 906 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 817 आहे तर 67 नमुने प्रतीक्षेत आहेत.
दिनांक 29 मे रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 419 नागरिक आहेत. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 586 नागरिकतालुकास्तरावर 482 नागरिक तर जिल्हास्तरीय 351 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 71 हजार 914 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच,61 हजार 134 नागरिकांची गृह अलगीकरण पूर्ण झाले असून 10 हजार 780 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
0000000