Search This Blog

Wednesday 20 May 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त

चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त
सलग 2 चाचण्या निगेटिव्ह निघाल्यात
दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर
चंद्रपूर, दि. 20 मे : चंद्रपूर जिल्ह्यातील कृष्ण नगर परिसरात 2 मे रोजी पॉझिटिव्ह जाहीर करण्यात आलेला पहिला रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. कोविडशिवाय अन्य आजारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णाच्या 16 व 17 मे रोजीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यात आता फक्त 1 पॉझिटिव्ह रुग्ण आहे.
        कृष्ण नगर परिसरात 1 मे रोजी स्वॅब तपासणी केली असता. रात्रपाळी मध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका नागरिकाचा अहवाल 2 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. हा चंद्रपूर जिल्ह्याचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण ठरला होता. त्यानंतर कृष्णनगर परिसर 14 दिवस पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. सदर रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर उपचारादरम्यान कोविडशिवाय अन्य आजारासाठी या रुग्णाला नागपूर येथे पाठवने आवश्यक झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारार्थ होता. दरम्यान 14 दिवसांच्या कालावधीनंतर 16 मे रोजी पहिली व 17 मे रोजी दुसरी कोरोना चाचणी करण्यात आली. या दोन्ही चाचणीमध्ये हा रुग्ण निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कृष्ण नगर परिसरातील हा रुग्ण आता कोरोना मुक्त झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.
चंद्रपूर येथे 13 मे रोजी दुसरा रुग्ण बिनबा गेट परिसरात आढळला आहे. यवतमाळ येथून आलेल्या 23 वर्षे युवतीला संसर्ग झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते. या युवतीची देखील चाचणी 25 व 26 मे रोजी होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे मूळपत्ते असल्यामुळे केंद्रीय पथकाद्वारे व राज्य आरोग्य विभागाच्या मोजणीमध्ये चंद्रपूर येथे वरील 2 रुग्ण व नागपूर येथे विदेशातून आलेले व तेथेच भरती झालेले 2 रुग्ण असे एकूण 4 रुग्ण यादीमध्ये दाखविण्यात येत आहे. मात्र चंद्रपूरमध्ये कृष्ण नगर परिसरातील 1 व बिनबा परिसरातील 1 असे दोनच रुग्ण आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
दरम्यानजिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 539 आहे. यापैकी 2 नागरिक पॉझिटिव्ह असून 445 नागरिक निगेटिव्ह आहे. तर 92 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातूनराज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 65 हजार 306 आहे.जिल्ह्यात हजार 159 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच 50 हजार 825 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. तर,14 हजार 481 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

00000

No comments:

Post a Comment