Search This Blog

Sunday 17 May 2020

जिल्ह्यातील दोन्ही पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर

जिल्ह्यातील दोन्ही पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर
845 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
चंद्रपूर,दि.17 मे: जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. रुग्णाच्या अति जोखमीच्या संपर्कातील 7 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेला रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीन मध्ये बिनबा गेट येथील 23 वर्षीय पॉझिटिव्ह युवतीच्या संपर्कातील सर्वच 7 नमुने ‌निगेटिव्ह आलेले आहे. या परिसरातील 4 आरोग्य पथकाद्वारे 190 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.
तर,दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या कृष्ण नगर येथील रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आतापर्यंत घेण्यात आलेल्या 67 नागरिकांच्या नमुन्यांपैकी 66 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 1 नमुना प्रतीक्षेत आहे. या परिसरातील 2 हजार 152 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून हे सर्वेक्षण 47 आरोग्य पथकामार्फत करण्यात आले आहेत. या परिसरातील कंटेनमेंट झोनला 14 दिवस पूर्ण झालेले आहेत.त्यामुळे मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी या ठिकाणच्या निर्बंधांना स्थगित केले आहे. लॉकडाऊनमधील नियमित निर्देश या परिसरात लागू असतील.
संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढीलप्रमाणे आहे. आतापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 426 आहे. यापैकी 2 नागरिक पॉझिटिव्ह निघाले असून 324 नागरिक निगेटिव्ह आहेत.तर 100 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तालुकास्तरावर 671 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 174 असे एकूण 845 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तसेच 44 हजार 292 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे.तर 17 हजार 343 नागरिकांचे  गृह अलगीकरण सुरू आहे.
00000

No comments:

Post a Comment