Search This Blog

Thursday 14 May 2020

चंद्रपूरमधील दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व पाचही अहवाल निगेटिव्ह

चंद्रपूरमधील दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या
संपर्कातील सर्व पाचही अहवाल निगेटिव्ह
चंद्रपूर, दि.14 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सानिध्यातील अती जोखमीच्या 5 नातेवाईकांपैकी पाचही जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 2 मे रोजी पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण सध्या नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये बिनबा भागातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या अति जवळच्या कुटुंबातील व्यक्तींचे काल घेण्यात आलेले स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात बिनबा गेट जवळ चंद्रपूर येथील 1 महिला संक्रमित असल्याचे आढळून आले होते. सदरील रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे भरती आहे. 13 मे रोजी या व्यक्तीच्या संपर्कातील 5 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या 5 लोकांचे प्रतिक्षेत असणारे स्वॅब नमुने सायंकाळी 5 वाजता निगेटिव्ह आल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिले आहे.
बिनबा गेट परिसरातील नव्या रुग्णाच्या संपर्कातील 10 व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी 5 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. बिनबा गेट  परिसरातील रूग्ण देखील चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या परिसरातील एकूण 190 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याठिकाणी एकूण 728 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व माहिती घेण्यात येत आहे.
तर 2 मे रोजी आढळलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या संपर्कातील आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या 55 नागरिकांच्या नमुन्यांपैकी 53 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 2 नमुने प्रतीक्षेत आहे. या परिसरातील 2 हजार 152 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून 8 हजार 540 नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी 2 तारखेपासून सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा संशयित रुग्ण या परिसरात आढळलेला नाही.
संपूर्ण जिल्ह्याची आतापर्यंतची कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. आत्तापर्यंत स्वॅब नमुने घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 300 आहे. यापैकी 2 नागरिक पॉझिटीव्ह निघाले असून 272 नागरिक निगेटीव्ह आहे. 26 नागरिकांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
      जिल्ह्यात आतापर्यंत तालुकास्तरावर 215 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 117 असे एकूण 332 नागरिक संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृह अलगीकरण करण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या व्यक्तींची संख्या 57 हजार 814 एव्हढी आहे. यापैकी 40 हजार 62 नागरीकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 17 हजार 752 नागरिकांचे सध्या गृह अलगीकरण सुरू आहे.
00000

No comments:

Post a Comment