Search This Blog

Tuesday 30 October 2018

31 ऑक्टोंबर रोजी सिंदेवाही येथे धान महोत्सव 2018

चंद्रपूर, दि.30 ऑक्टोबर – अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ स्थापनेला 20 ऑक्टोंबर 2018 रोजी 50 वर्षपूर्ण झाले आहे. त्या निमित्त विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे दिनांक 31 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही, कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
               सदर महोत्सवाअंतर्गत कृषि मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या धान महोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री ना.राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते हे उपस्थित राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले असणार आहे.  त्याचप्रमाणे आमदार  विजय वडेट्टीवार, आमदार किर्तीकुमार भांगडिया, सिंदेवाही पंचायत समिती सभापती मधुकर मडावी, कार्यकारी परिषद सदस्य जयन्नुद्दीन जव्हेरी,  स्नेहाताई हरडे, नागपूरचे विभागीय कृषि सहसंचालक रविंद्र भोसले, गडमौशीचे सरपंच सचिन नाडमवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
               या कृषि विद्यापिठाने मागील पाच दशकात  शेतकरी  भिमूख आणि शेतकरी समृध्द होण्यासाठी सर्वोत्तम कार्य  करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यत्वेकरून बिजात्पादन कार्यात विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही संशोधन केंद्राने लक्षणीय कामगीरी बजावून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. सदर कार्यक्रमामध्ये धान पिकांचे रासायनिक व जैविक तण नियंत्रण, धान पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन, धान पिकाविषयक जैविक खते, बुरशीनाशके व किटकनाशके, भाजीपाला व फळपीक लागवड, पूर्व विदर्भातील कडधान्य पिके लागवड तंत्रज्ञान (लाखोळी, हरभरा, वाल, तूर), पूर्व विदर्भातील गळीत धान्य पिके लागवड तंत्रज्ञान (जवस, मोहरी, उन्हाळी भूईमूग), शाश्वत धान उत्पादन तंत्रज्ञान इत्यादी विषयांवर विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख यांचे या कार्यक्रमात मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे.
               तरी पूर्व विदर्भ विभागातील सर्व शेतकरी व महिला शेतकरी यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संशोधन संचालक डॉ.व्ही.के.खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.एम.मानकर, कुलसचिव डॉ.प्रकाश  कडू, सहयोगी संशोधन संचालक डॉ.प्रशांत शेंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ.विनोद नागदेवते यांनी केले आहे.                                                                                        0000

Monday 29 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार मेळाव्यातून दोन दिवसांमध्ये 5201 युवकांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड




दुसऱ्या दिवशी 18 हजार विद्यार्थ्यांची हजेरी
मान्यवरांच्या मार्गदर्शनाने गाजला दुसरा दिवस

चंद्रपूर दि.29 ऑक्टोबर : उत्साह, उत्सुकता व जिज्ञासेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जवळपास 40 हजार युवकांच्या भरगच्च उपस्थितीतील युथ एम्पावरमेंट समिटचा आज शानदार समारोप झाला. 38 हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी 5201 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र दोन दिवसात देण्यात आले. केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे जिल्ह्यातील 5000युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरआमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 28 ऑक्टोबर पासून हा रोजगार मेळावा सुरू झाला होता.
आज दुसऱ्या दिवशी  18 हजार विद्यार्थ्यांपैकी 2423 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी आपल्या आस्थापनांसाठी निवड केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा 53 प्रतिष्ठित कंपन्यांना या ठिकाणी आयोजकांतर्फे पाचारण करण्यात आले होते. मुंबई, पुणे,औरंगाबाद या ठिकाणच्या कंपन्यांच्या आस्थापना बल्लारपूर येथे येऊन मुलांच्या मुलाखती घेत असल्याबद्दलचा आनंद यावेळी मुलांनी व्यक्त केला. अनेकांसाठी ही सुरुवात होती. तर अनेकांना यावेळी संधीची अपेक्षा होती. तथापि, 38हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना दोन दिवसात संधी भेटणे ही देखील मोठी उपलब्धी ठरली. माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या सहकाऱ्यांना या दोन दिवसाच्या मेळाव्यातून संधी मिळाल्याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. आजच्या निवडीमध्ये देखील मुलींची संख्या प्रचंड होती. ग्रामीण भागातील गोंडपिंपरी, जिवती, कोरपना राजुरा, बल्लारपूर, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही अशा अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांनी या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मुद्रा बँक लोन वितरण संदर्भात अनेक बँकांनी या ठिकाणी आपले स्टॉल लावले होते. या स्टॉलवर देखील मोठ्या प्रमाणात युवकांनी नव्या व्यवसायाच्या संदर्भात चौकशी केली. जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात बामणी मैदानावरून 190 युवकांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिल्या गेले. या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेले दर्जेदार मार्गदर्शन हे देखील युवकांसाठी एक पर्वणी ठरले. या मेळाव्याचे दुसऱ्या दिवशी मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मुलाखतीपूर्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चाणक्य मंडळातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आज दिवसभरात विषयावर तज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
                                                            00000

Sunday 28 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात पहिल्या दिवशी 2778 युवकांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड


* उद्या देखील हजारो युवकांच्या होणार मुलाखती
* नोंदणीकृत उमेदवारांनी एसएमएस प्रमाणेच येण्याचे आवाहन
* बल्लारपूर मध्ये 74 दिव्यांगांना पहिल्या दिवशी मिळाली नोकरी
* हजारो मुलांच्या शांततामय मुलाखतींचे कौशल्य विकास मंत्र्यांकडून कौतुक

चंद्रपूर दि. 28 ऑक्टोबर- 38 हजार नोंदणीकृत उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी मुलाखत झालेल्या जवळपास 20 हजार उमेदवारांपैकी 2778 उमेदवारांना बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यात नोकरी मिळाली आहे. निवड झालेली ही संख्या लक्षणीय असून एका मोठ्या आयोजनातून एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने युवकांना वेगवेगळ्या आस्थापनेवर काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून या आयोजनावर काम सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी राज्यातील 53 प्रतिष्ठित कंपन्यांना बल्लारपूर येथे  आणण्यात आयोजकांना यश आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी 2 हजार 778 उमेदवारांना वेगवेगळ्या आस्थापनांनी पसंती दिली आहे.
राज्याचे वित्तनियोजन मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर, आमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी येथे आजपासून हा रोजगार मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशीची निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर नेमक्या किती लोकांना रोजगार मिळाला याबाबतची उत्सुकता होती. आयोजन समितीकडून रात्री 8 वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी 2778 लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांनी आपली पसंती दाखवली आहे. यामध्ये 74 दिव्यांग व्यक्तींचा देखील समावेश आहे.

पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद
या आयोजनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभरापासून केलेल्या अथक परिश्रमामुळे व आमदार अनिल सोले यांच्या फॉर्च्यून फाउंडेशनने  केलेल्या टेक्निकल सपोर्टमुळे पहिल्याच दिवशी आपल्या जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा आनंद असल्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले आहे. या आयोजनामागे हजारो हात असून त्याच्या सकारात्मक ऊर्जेतून जिल्ह्यातील गरीब, गरजू मात्र गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जॉब मिळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या योजनेत सहभागी झालेल्या कंपन्यांनी उद्या देखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट लेटर द्यावेत्यांची निवड करावीअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर व परिसरातील मुले अतिशय मेहनती असून सचोटीने वेगवेगळ्या आस्थापणासाठी काम करतीलअशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.
निवडीचा आकडा उत्साहवर्धक :ना.निलंगेकर
 ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातील या मोठ्या आयोजनात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाती मोठ्या प्रमाणात नोकऱ्या पडतील, असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वाटत होते. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या निवड प्रक्रियेतून अडीच हजारावर मुलांची निवड झाल्याबद्दल अतिशय आनंद वाटतो. राज्य शासन कौशल्य विकासाबाबत अतिशय आग्रही असून लोकांच्या हाताला कौशल्ययुक्त कामातून रोजगार मिळावा हे राज्य शासनाचे धोरण आहे. चंद्रपूर मध्ये याबाबत भरीव काम झाल्याचे अतिशय समाधान आहे. शांततामय मुलाखतीसाठी मी आयोजकांचे कौतुक करील तितके कमी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
                                                0000

हाय-टेक रोजगार महामेळाव्यात’ मुलुख चांदा’ व ‘हॅलो चांदा’ अॅपचा शुभारंभ




हजारोंच्या संख्येतील युवकांच्या शिस्तबद्धपद्धतीने मुलाखती 
मुलींची लक्षणीय उपस्थिती, अनेकांना लगेच अॅपॉइन्मेंट लेटर
चंद्रपूर दि 28 : बल्लारपूरच्या बीआयटी कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने हजारों युवकांची गर्दी बघायला मिळाली. मात्र या गर्दीमध्ये शिस्त होती अनेकांना जागेवरच निवडीचे पत्र देखील मिळाले. तर या हायटेक रोजगार महामेळाव्याच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात एकाच दिवशी मुलाखत व त्याच वेळी त्यांच्या हातात निवडीचे पत्र अशा आनंदाच्या क्षणाला ही अनुभवता आले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने या मेळाव्यात मुलुख चांदा व हॅलो चांदा या दोन अॅपचा शुभारंभ केला.राज्याचे वित्त ,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात नागपूरचे फॉर्च्यून फाऊंडेशन, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर , जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समिती, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमांमध्ये आयोजनातील शिस्त सर्वत्र दिसून आली. हजारो विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आगमन झाल्यानंतरही एकाच वेळी शेकडो लोकांच्या मुलाखती झाल्या.
त्याच वेळी त्यांच्या हातात निवड पत्र देण्याची प्रक्रिया सुद्धा पार पाडण्यात आली.आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या दोन उपयुक्त ॲपचा देखील शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील जनतेला सर्व शासकीय योजनांची माहिती व्हावी व पर्यटनात अग्रेसर असणारा जिल्हा चंद्रपूरची त्या क्षेत्रात ॲपच्या माध्यमातून आगेकूच व्हावी, यासाठी अॅपची निर्मिती केली आहे .
चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या ॲपची संकल्पना पूर्ण करण्यात येत असून नागरिकांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जिल्ह्याची माहिती, योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना, त्यासाठीची पात्रता,  त्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध व्हावी आणि जिल्हा प्रशासनाचा थेट संवाद सामान्य नागरिकांशी प्रस्थापित व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. 
        या दोन अॅप पैकी मुलुख चांदा हे ॲप चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटनाला व सांस्कृतिक वारशाला लोकांपर्यंत पोचविण्याच्या कामात उपयोगी येणार आहे. तर हॅलो चांदा हे ॲप शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देणारे आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असणारे हे ॲप प्रशासनामार्फत लवकरच विकसित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक माहिती आपल्या मोबाईलवरच मिळावी, ही यामागची भूमिका आहे .याशिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावी योजना असणारी १५५३९८ या टोल फ्री क्रमांकाची हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा देखील लवकरच यांच्यामार्फत अधिक सुलभ करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सप्टेंबर अखेरपर्यंत माफ करण्यात आलेले कर्ज व शेतकऱ्यांना या हंगामात देण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाबाबतची घरी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली  आहे.याशिवाय अण्णासाहेब साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यातर्फे जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कर्जवाटपातबाबत माहिती देणाऱ्या घरी पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.याशिवाय या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य असणारे सहा मिशनबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय उद्घाटनप्रसंगी जाहीर केले.यावेळी त्यांनी मिशन सेवा ,मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य, विकास ,मिशन फोरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क ,या सहा सूत्री कार्यक्रमाचा पुनरुच्चार केला. यापैकी एक असणाऱ्या मिशन सेवाच्या लोगोचाही शुभारंभ करण्यात आला. सीएमफेलो या मोहिमेवर काम करीत आहे.
यावेळी मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यातील वाचनालयामध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या संचाचे देखील लोकार्पण करण्यात आले. जिल्हा ग्रंथालयामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे.या कार्यक्रमात मुद्रा बँक योजनेसंदर्भातही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी बँक काऊंटर उघडण्यात आले असून मुद्रा लोन संदर्भात यामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज या योजनेतून उद्योग व्यवसाय करणाऱ्या दीडशे लोकांना मान्यवरांच्याहस्ते कर्ज वितरण करण्यात आले.
याच कार्यक्रमात बीआयटी कॉलेजमधून फूड अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी शाखेत प्रथम आलेल्या सुनाली गाडगेचा सत्कार करण्यात आला. याशिवाय नाबार्ड व अंबुजा सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या 160 प्रशिक्षणातून पैकी सहा लोकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.मिशन कौशल्य विकास व मिशन स्वयंरोजगार या संदर्भात श्रीकांत पाटील व सेवानिवृत्त महाप्रबंधक बँक ऑफ इंडिया श्री बालकृष्णन यांनी अनुक्रमे मार्गदर्शन केले मार्गदर्शनाचे सत्र मुख्य मंडपात घेण्यात आले या ठिकाणी बीआयटी मैदानावर येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन करणारे महत्त्वाचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेचंद्रपूर रोजगार युक्त बनविण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रमाच्या आयोजन अंतर्गत उपयोगी पडतील अशा पद्धतीचे हे स्टॉल असून प्रत्येक स्टॉलवरून यासंदर्भातील माहिती पत्रक दिले जात आहे.   
सोमवारी चाणक्य मंडळाचे मार्गदर्शन उद्या देखील बी आय टी मैदानावर विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे यासोबतच उद्या सकाळी 10.30 वाजता श्री आनंद देसाई व श्री लीना देशपांडे यांचे भविष्यातील रोजगार व करिअर मार्गदर्शन यावर मार्गदर्शन होणार आहे.दुपारी 11.30 वाजता चाणक्य आयएएस अकादमी मार्फत विद्यार्थ्यांना मिशन सेवा ,अर्थात स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 ते 1 या दरम्यान विशेष सोशल वर्क या विषयावर जयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता मिशन सोशल वर्क यासंदर्भात युवक कल्याण मंत्रालय नवी दिल्लीच्या सदस्य श्रीमती राणी निघोट -ब्दिवेदी यांचे मार्गदर्शन होणार आहे.
                                00000

बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्यातून जिंकण्याची मानसिकता घेऊन जा : ना.सुधीर मुनगंटीवार








38 हजार नवयुवकांना स्पर्धेच्या मैदानात उतरवणाऱ्या युथ एम्पॉवरमेंट समीटचा शानदार शुभारंभ

चंद्रपूर दि 28 ऑक्टोबर : नोकरी,रोजगार,स्वयंरोजगार, प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधीला उपलब्ध करणारी बल्लारपूरची युथ एम्पॉवरमेंट समीट ही रोजगार युक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची सुरुवात आहे. हा रोजगार महामेळावा आपल्याला जिंकण्याची मानसिकता देणार आहे. बल्लारपूरवरून ही मानसिकता घेऊन लढायला सिद्ध व्हा, असे आवाहन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          38 हजार युवकांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्याला स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनीमार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर उद्घाटक म्हणून कौशल्य विकासमंत्री संभाजीराव निलंगेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी  आ. नानाजी शामकुळे, आ. संजय धोटे ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे ,  चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर,बल्लारपूरचे  नगराध्यक्ष हरीश शर्मा , फॉर्च्युन फाउंडेशनचे अध्यक्ष आ.अनिल सोले , जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर , पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , बीआयटी कॉलेजचे प्रमुख बाबासाहेब वासाडे , उद्योजक श्रीकांत बडवे , अॅड. संजय वासाडे, प्रशांत वासाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युथ एम्पॉवरमेंट समिट मधील सहा सूत्रांची मांडणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व युवकांना अगदी रेल्वे,सैन्यदल,खाण क्षेत्र व अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक असणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची मार्गदर्शनाची उपलब्धता जिल्ह्यातील युवकांना आगामी काळात केले जाणार असून त्यामार्फत त्यांना ही संधी दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा सर्व सरकारी नोकरी मध्ये टक्का वाढविण्यासाठी ही मोहीम आम्ही आगामी काळात हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          मिशन कौशल्य विकास या अंतर्गत युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास करून त्यांना नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनविण्याच्या अभियानाचा प्रारंभ आहे. त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मदत घेतली जाईल. योग्य प्रशिक्षण व मुद्रा योजनाची मदत अशा पद्धतीने मिशन कौशल्य विकास,मिशन स्वयंरोजगार या जिल्ह्यांमध्ये राबविली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.    
        कधीकाळी जग एकमेकांपासून दूर होते.परंतु आता जग हे ज्ञानावर चालणारे आहे.भारताची एकूण लोकसंख्या बघता दर सहा माणसामध्ये एक भारतीय असू शकतो. या संख्याबळाचा वापर करून आम्ही जगावर राज्य करू शकत नाही का ?असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ज्यांना जग जिंकण्याची आकांक्षा आहे त्यांच्यासाठी मिशन फॉरेन सर्विसेस सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
          आमचा परंपरागत उद्योग हा शेती होता. तरीही आता पारंपरिक पद्धतीने शेती करता येणार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टाटा ट्रस्टच्या मदतीने पाच हजार शेतकरी  नव्या पद्धतीची शेती करण्यासाठी सिद्ध झाले आहेत. हा पथदर्शी प्रकल्प  आहे. आगामी काळात नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची संधी मिशन शेतीतून केली जाणार आहे.
          सगळ्यांनाच नोकरी व व्यवसाय करणे शक्य नसते .मात्र अनेकांसाठी काहीतरी करण्याची एक सामाजिक उर्मी काही विशिष्ट तरूणात असते.अशा पद्धतीच्या युवकांना मिशन सोशल वर्कमध्ये नवे प्रयोग करण्याची सिद्धता या माध्यमातून दिली जाणार आहे. पोंभूर्णा येथे आदिवासी बांधवांनी एकत्रित येऊन एक मोठी कंपनी तयार केली आहे. आदिवासी महिला देखील उद्योजिका  बनू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे .
          राज्य शासनाने महिला उद्योजकांची संख्या 9टक्‍क्‍यांवरून 20 टक्के करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यासाठी आगामी काळात महिलांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासावर खूप भर आहे त्यामुळे प्रधानमंत्री यांनी स्टार्टअप , स्टॅड अप,मुद्रा आदी योजना सुरू केल्या आहेत. उद्याचे नवीन चंद्रपूर हे रोजगार युक्त असावे हे आपले स्वप्न असून यासाठी या सर्व योजनांचा उपयोग केला जाईल असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
   
हा मेळावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनतेच्या विश्वासाचे द्योतक 
                                                                - संभाजी पाटील निलंगेकर
                   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकासाची संकल्पना पुढे नेत राज्य शासनाने या विभागाच्या माध्यमातून अनेक उत्तम निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू आहे .राज्यात अनेक ठिकाणी रोजगार मेळावे मी बघितले आहे पण उत्तम नियोजन व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला  हा मेळावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे. केवळ एम्प्लॉयमेंट पर्यंत मर्यादित न राहता त्यांनी एमपॉवरमेंट साठी जो पुढाकार घेतला आहे तो अभिनंदनिय आणि मार्गदर्शक असल्याचे कौशल्य विकास मंत्री निलंगेकर म्हणाले .चंद्रपूर आणि लातूर येथे मॉडेल आयटीआय साठी 15 कोटी रु. ची तरतूद करून अर्थमंत्र्यांनी औद्योगिक प्रशिक्षणातून कौशल्य विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले. युवक युवतींनी त्यांना मिळालेल्या या संधीचे सोने करण्याचे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
हा सर्वस्पर्शी सहा सूत्री कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याला विकासाग्रणी करेल
                                           - हंसराज अहिर
चंद्रपूर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार ह्या क्षेत्रात अग्रेसर व्हावा यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो सहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर अध्यक्षीय भाषणादरम्यान म्हणाले. या जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे , लोकोपयोगी उपक्रम यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्याचे ज काम जिल्ह्यात पालकमंत्री करीत आहे . पंतप्रधानांची मुद्रा योजना चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे.रोजगार , स्वयंरोजगार , उन्नत शेती ,कौशल्य विकास , सोशल वर्क , फॉरेन सर्व्हिसेस असा हा सर्वस्पर्शी सहा सूत्री कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याला विकासाग्रणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
       फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी या युथ एम्पॉवरमेंट समिटचे प्रास्ताविक केले. त्यांनी यावेळी या आयोजना मागची भूमिका मांडताना प्रत्येकाला नोकरी मिळेल ,असे नाही मात्र आजच्या मेळाव्यातून प्रत्येकाला भरपूर शिकायला मिळेल ,हे मात्र निश्चित असल्याचे सांगितले. विविध आस्थापना या ठिकाणी आल्या असून मोठ्या प्रमाणात त्यांच्या मार्फत नोकरी दिली जाईल. या ठिकाणी युवकांसाठी आयोजित मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी देखील यावेळी युवकांना संबोधित केले.
आयएएस होताना त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी युवकांपुढे मांडला. परिश्रमाची तयारी ठेवून लोकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या या आयोजनातून जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले. तर आमदार अॅड. संजय धोटे यांनी जिल्ह्यामध्ये निर्माण होत असलेल्या मोठमोठ्या पायाभूत सुविधांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. बीआयटी प्रमुख अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी देखील यावेळी संबोधित केले. या कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रशांत आर्वे यांनी केले.

Friday 26 October 2018

महारोजगार मेळाव्यासाठी बल्लारपूरच्या बीआयटी कॉलेजमध्ये तयारी पूर्ण



उमेदवारांना एसएमएसद्वारे कळणार मुलाखतीची वेळ
योग्य वेळी पोहचून संधी घेण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्हयातीलच विद्यार्थ्यांना संधी
चंद्रपूर दि. 26 ऑक्टोबर: राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील प्रमुख कंपन्यांना आमंत्रित करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्याची  तयारी पूर्ण झाली आहे .या कार्यक्रमासाठी भव्य सभा मंडप  काराला येत असून मुलाखती घेण्यासाठी बीआयटी कॉलेज सज्ज झाले आहे. 
        28 आणि 29  ला मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना आपल्या मुलाखतीची तारीख आणि वेळ एसएमस (SMS ) मार्फत कळवण्यात येईल. उमेदवारांनी त्यांना दिलेल्या वेळेतच यावे म्हणजे गैरसोय होणार नाही, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.    रोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या व तसा एसेमेस आलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश राहील,ऑनलाइन फॉर्म भरलेल्याची प्रिंट आणि आपले आधार कार्ड प्रवेशद्वारावर तयार ठेवावे,आपल्या बायोडेटाच्या 3 कॉपी आणणे अनिवार्य आहे,आपले डॉक्युमेंटची ओरिजिनल आणि आणि झेरॉक्स प्रत (सेल्फ अटेस्टेड) सोबत आणावी,विना कागदपत्रे, ओळखपत्र, ऑनलाईन फॉर्म प्रिंट, विना कुणालाही आत प्रवेश मिळणार नाही,इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना अॅपटीट्युड ( Aptitude )परीक्षा द्यायची आहे, निकाल 7 दिवसांनी आपल्याला ईमेल किंवा एसएमएस (SMS ) मार्फत कळेल.  ऑफलाईन पद्धतीने कुणालाही प्रवेश मिळणार नाही. मुलाखतीची प्रक्रिया देखील सहज सुलभ आहे. प्रवेशद्वारावर आपले ऑनलाईन फॉर्मचे प्रिंट किंवा आलेला SMS आणि आधार कार्ड दाखवणे अनिवार्य आहे,आपल्या प्रिंटवर आणि SMS मधे आपल्याला कोणत्या विंग मधे जायचे आहे हे लिहिले आहे. आपण सरळ तिथे पोचावे. तिथे आपल्याला हेल्पडेस्क दिसेल.हेल्पडेस्कवर आपल्याला कुठे मुलाखत द्यायची आहे आणि कोणत्या मजल्यावर आणि रूममधे जायचे आहे हे सांगायला स्वयंसेवक उपस्थित असतील आणि आपल्याला मुलाखतीसाठी मदत करतील. जर आपण सिलेक्ट झाले असाल तर आपल्याला लगेच त्याची माहिती दिली जाईल आणि एका तासात आपल्याला स्टेजवर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऑफर लेटर दिले जाईल. सहा सूत्री कार्यक्रमाबदलही मार्गदर्शनसहासूत्री कार्यक्रम मुद्रा योजना, मिशन कौशल्य, मिशन फॉरेन सर्व्हिसेस, मिशन उन्नत शेती आणि मिशन सोशल वर्क अंतर्गत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. त्याचा लाभ घेऊ शकता.
प्रोजेक्ट रिपोर्टची उपलब्धता
बिल्डिंगच्या मागच्या भागात 100 प्रकारची लहान लहान उपकरणे त्याच्या प्रोजेक्ट रिपोर्ट सोबत ठेवण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जर त्यात रस असेल तर मुद्रा योजनेअंतर्गत आपल्याला ती मशीन कशी मिळेल याचे मार्गदर्शन आपल्याला स्टॉल्स करतील.
हे सर्व आयोजन सुशिक्षित बेरोजगारांसाठी असून  सर्व प्रक्रिया ही पारदर्शी असल्यामुळे  कुठल्याही  ऑफरला अथवा अफवेला बळी पडू नये . यांच्या गळ्यात बॅचेस आहेत अशाच स्वयंसेवकाची मदत घ्यावी . आपल्याच जिल्ह्यातील विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये  निवडले जाणार असल्यामुळे जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना  या प्रक्रियेतून  नोकरी, व्यवसाय, कर्ज , प्रशिक्षण,  याबाबतचा लाभ मिळणार आहे .त्यामुळे  पारदर्शी प्रक्रियेमुळे कोणावरही अन्याय होत नसल्यामुळे  दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे .SMS मधे आपल्याला जी वेळ दिली आहे त्याच वेळेत या म्हणजे कुणाचीही गैरसोय होणार नाही आणि आपल्याला वाट पहावी लागणार नाही. कसल्याही प्रकारचे गैरवर्तन, हुल्लडबाजी करणाऱ्यांना मुला देता येणार नाही.
                             0000000

Thursday 25 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार महामेळाव्याला युवकांचा उदंड प्रतिसाद ; 25 हजारावर नोंदणी


·        मुलाखत व भेटीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर
·        नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला एसएमएस जाणार
·        कधी यायचेकिती वाजता यायचेकुठे जायचे याची मिळेल सूचना
·        फक्त नोंदणीकृत विद्यार्थ्यांनाच महामेळाव्यात प्रवेश
चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर: ऑनलाइन नोंदणी,एसएमएसद्वारे युवकांना सूचनाप्रिंट आउटवरच कोणी,कुठे जायचे याची होणारी नोंद ,खानपानाची आतमध्ये केलेली व्यवस्था आणि उमेदवारांच्या मुलाखतीचे  वेळेनुसार केलेले काटेकोर नियोजनअसे 28व 29तारखेच्या बल्लारपूर येथील रोजगार महामेळाव्याचे हायटेक स्वरूप आहे.यासाठी वापरण्यात आलेले प प्रतिसादामुळे भारतात इव्हेंटसाठी वापरले जात असलेले दुसऱ्या क्रमांकाचे ॲप झाले आहे. चौथ्या दिवशी 25 हजार सुशिक्षित बेरोजगारांनी यावर आपली नोंदणी केली आहे. राज्याचे अर्थनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने होणारा हा मेळावा महाराष्ट्रातील एक हायटेक महा मेळावा म्हणूनही पुढे आला आहे. 21 ते 24 ऑक्टोबर या चार दिवसात 25 हजार युवकांनीwww.yeschandrapur.com/register.aspx या वेबसाईटवर जाऊन नोंदणी केली आहे.
 त्यामुळे आयोजनाच्या क्रमवारीत भारतातील सर्वाधिक व्हिजिटर्स असणारे हे क्रमांक दोनचे ॲप झाले आहे. विशेष म्हणजे 28 व 29 च्या या मेळाव्यामध्ये प्रत्येक नोंदणीकृत विद्यार्थ्याला त्याच्या मुलाखतीची वेळ,मुलाखतीचे स्थळदालन क्रमांकगेट क्रमांक याबाबतची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. बल्लारपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी येथे हा मेळावा होत आहे. या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊ नयेयासाठी ज्या मुलांनी नोंदणी केली आहे. त्या मुलांना येणाऱ्या एसएमएसकडे त्यांनी लक्ष ठेवावे,असे आयोजकांनी कळविले आहे.
                 बामणी परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या दालनांमध्ये विद्यार्थ्याच्या इंटरव्यू होणार आहेत. याशिवाय त्यांना प्रवेश देखील त्यांनी आणलेल्या प्रिंटआऊट वर किंवा त्यांच्याकडे स्मार्टफोनवर आलेल्या मेसेज वर देण्यात येणार आहे.या मुलांसोबत येणाऱ्या कोणत्याही पालकालाशिक्षकाला किंवा सहाय्यक मित्राला प्रवेश दिला जाणार नाही. येणाऱ्या सगळ्या युवकांसाठी खानपानाची व्यवस्था आत मध्ये करण्यात आली आहे. तथापि प्रत्येक विद्यार्थ्याने त्याने ज्या क्षेत्रात नोंद केली आहेत्यासाठी इंटरव्यू देण्यासाठी आपले मूळ दस्तावेज त्याच्या आवश्यक झेरॉक्स प्रती आणि आपल्या बायोडाटाच्या पाच प्रती सोबत आणणे गरजेचे आहे. स्वतःच्या झेरॉक्स प्रती विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन याव्यात अशी विनंती आयोजकांनी केली आहे. मोजक्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वांना संधी देण्यासाठी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळी पोहोचताना ही काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
                या ठिकाणचा प्रवेश हा ऑनलाइन असल्यामुळे येणाऱ्या तज्ञ मान्यवरांच्या भाषणासाठी देखील आत मध्ये प्रवेश घेतलेल्या युवकांनाच संधी मिळणार आहे.या ठिकाणी 50 विख्यात कंपनी येणार असून वेगवेगळ्या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सर्व सुचनांचे व्यवस्थित पालन करण्याबाबतचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
            या मेळाव्यामध्ये मिशन सेवामिशन स्वयंरोजगारमिशन कौशल्य विकासमिशन फोरेन सर्विसेसमिशन उन्नत शेतीमिशन सोशल वर्कआदी विषयांवर ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रशासनबल्लारपूर नगरपालिकाराज्य शासनाचे विविध विभागजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरआमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन संस्थाया योजनांमध्ये सक्रिय असून सर्व युवकांचे व्यवस्थित समुपदेशन होईल व बल्लारपूरच्या भूमीतून त्यांच्या करिअरला नवी सुरुवात होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
0000000

Wednesday 24 October 2018

28 व 29 ऑक्टोबरला बल्लारपुरात युथ एम्पॉवरमेंट समीट



चंद्रपूर जिल्हा रोजगार, स्वयंरोजगार युक्त बनविण्यासाठी, प्रधानमंत्री मुद्रायोजनेतून मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करण्यासाठी  व नवयुवकांना शासकीय सेवांमध्ये संधी देण्यासाठी, तसेच कृषी व विदेशातील संधी शोधण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शनासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात जिल्ह्यातील पहिल्या युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर येथे 28 व 29 ऑक्‍टोबरला होत आहे.
काय आहे युथ एम्पावरमेंट समीट
*           महाराष्ट्राच्या पूर्वेकडील अतिदुर्गम भागातील युवकांना मुंबई, पुण्यातील तरुणांप्रमाणे नोकरी-व्यवसाय-प्रशिक्षण व विदेशातील संधींचा जागेवरच फायदा मिळावा असा उदात्त हेतू.
*           महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील उपलब्ध असणा- योजना, प्रशिक्षण व सेवा संधींचा फायदा देण्यासाठीचे हे आयोजन.
*           एकाच छताखाली विविध विभागांमार्फत करण्यात येत आहे.
भारतामध्ये अशिक्षित व सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. मात्र केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या चार वर्षात उभारलेल्या रोजगार युक्त धोरणातून निर्माण झालेल्या नव्या योजना, विदर्भातील युवकांच्या विकासाच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजना याची माहिती देण्यासाठी  हा अभिनव प्रयोग आहे.  
  चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी, व्यवसाय प्रशिक्षण, उद्योग धंदा उभारणी, कृषी, विदेशी सेवा व सामाजिक क्षेत्रात भवीष्य घडविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, कर्जपुरवठा आणि उपलब्ध संधीची माहिती देण्यासाठी बल्लारपूर या मध्यवर्ती ठिकाणी या युथ एम्पॉवरमेंट समीट  अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन 28 व 29 ऑक्टोंबरला केले जात आहे.
एकाच छताखाली अनेक संधी
तुम्ही सुशिक्षित आहात, उच्चविद्याविभूषित आहात, अपंग आहात, मागासवर्गीय आहात, दिव्यांग आहात, अक्षर ओळख असणारे अर्धशिक्षीत आहात, कोणत्याही गटात, जातीत, धर्मात आहात. या मेळाव्यामध्ये या सर्व युवकांना संधी दिली जाणार आहे. तीही एकाच छताखाली. यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा कल ओळखणे, त्याला प्रशिक्षणांची माहिती देणे, त्यासाठी कर्ज पुरवठा करणे व जागेवरच मुलाखती घेवून काही आस्थापनात नोकरी उपलब्ध करुन देणे, असे या युवा सशक्तीकरण आयोजनाचे स्वरुप राहणार आहे.


संधी कोणाला मिळणार
तुम्ही दहावी पास असा की व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले  सुशिक्षित बेरोजगार असा, तुम्ही प्रशिक्षित असा किंवा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी वा अन्य कोणत्या क्षेत्रातील उच्चशिक्षित असा. सर्वांसाठी या ठिकाणी संधी असणार आहे, तुम्हाला नोकरी मिळवायची आहे. तुम्हाला समाजासाठी काही नवीन करायचे आहे, तुम्हाला अमुक एका क्षेत्रामध्ये प्रशिक्षण हवे आहे, तुम्हाला नवा उद्योग धंदा उभारायचा आहे किंवा विदेशात जाऊन वेगळे शिक्षण घ्यायचे आहे. अशा कोणत्याही मनातल्या इच्छेला भविष्याचे पंख लावून उडायला शिकवणारा हा महामेळावा असणार आहे. त्यामुळे दहावीपासून पुढे कितीही शिकलेले असाल किंवा अशिक्षित असाल तरीही या मेळाव्याचा लाभ घेणे महत्वाचे आहे. कारण या ठिकाणी आहे भरपूर संधी. जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुणाला, त्याच्या इच्छा-आकांक्षांना संधीचे बळ देण्याची उपाय योजना या महामेळाव्यात करण्यात आली आहे.
दोन दिवसाच्या आयोजनाचे स्वरूप
हजारो युवकांना दोन दिवस आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्याची उपाय योजना या ठिकाणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील संधीची चित्रप्रदर्शनी, उद्योगधंद्यात स्वकर्तुत्वाने यशस्वी झालेल्या मान्यवरांची भाषणे, मुलाखती, परिसंवाद, स्लाईडशो, विविध उद्योगांचे प्रशिक्षण, मशिनरीचे प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट रिपोर्ट, उद्यमशीलतेला पोषक ठरतील, असे मार्गदर्शन करणारे सरकारी योजनांचे व स्वयंसेवी संस्थांचे स्टॉल. आपल्या प्रयत्नातून मोठ्या झालेल्या उद्योगविश्वातीलसनदी सेवेतीलविदेशी शिक्षण घेतलेल्या यशवंत मान्यवरांना भेटण्याची संधी देखील या आयोजनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या दोन दिवसाच्या विचारमंथनातून येथे आलेल्या अनुभवातून सुशिक्षित बेरोजगारांना नवी दिशानवसंजीवनी या ठिकाणी निश्चित मिळणार आहे.
अनेक विभागांचा व आस्थापनांचा सहभाग
महाराष्ट्र शासन, केंद्र शासन,खाजगी आस्थापनाबहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आस्थापनाउद्योगविश्वातील दिग्गज कंपन्यांचा या दोन दिवसांच्या रोजगार महामेळाव्यात सहभाग राहणार आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार निर्मितीउद्योग, कृषी सहकारसमाज कल्याण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रमत्ससंवर्धन, दुग्धव्यवसाय,  वेगवेगळया प्रशिक्षण देणा-या संस्थाविविध महामंडळसर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारीसर्व बँकाचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या रोजगार निर्मितीशी संबंधीत असणा-या सर्व विभागांच्या प्रमुखांची याठिकाणी उपस्थिती राहणार आहे. मुंबईपुणे औरंगाबाद येथील नामवंत कंपन्यांच्या आस्थापनात्यांची निवड मंडळ या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
हजारोंना नोकरीरोजगाराची संधी
या रोजगार मेळाव्यामध्ये केवळ मार्गदर्शनच नव्हे तर मुंबई,पुणे व औरंगाबाद येथील अनेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही देखील होणार आहे. योग्य उमेदवारांना आपल्या कंपनीमध्ये सहभागी करण्यासाठी या कंपन्यांचे नियुक्ती व निवड मंडळ मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. युवकांच्या शैक्षणिक व कौशल्याची पारख करून त्यांना आपल्या कंपनीमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही देखील बल्लारपूर मध्ये होणार असून त्यासाठीच जिल्ह्याभरातील युवकांना आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे,आवाहन करण्यात येत आहे.
मेळाव्याला उपस्थित राहण्याचे फायदे
हा मेळावा युवकांना खालील बाबींमध्ये मार्गदर्शन करणार आहे...
१. उद्योग व्यवसायाची आवड असणाऱ्यांना व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा.
२. विविध प्रकारची मशिनरी व कच्चामाल कुठे मिळेल.
३. व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त मार्गदर्शन करणा-या संस्था कोणत्या आहेत.
४. मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येईल. कोणती बँक मदत करेल.
५. विदर्भात कोणत्या कृषी व्यवसायाला प्राधान्य द्यायला हवे.
६. बांबू पासून विविध वस्तू बनवणा-या व्यवसाय उभारताना कोणते प्रशिक्षण व कौशल्याची आवश्यकता आहे.
७. सेंद्रिय शेती वनशेती करताना कोणती काळजी घ्यावी व त्यातील भविष्य काय आहे.
८. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कोणकोणत्या संस्था कशाप्रकारे अर्थ साहाय्य करतात.
९. मागासवर्गीय तसेच अपंगासाठी व्यवसाय करण्यासाठी कोणत्या सरकारी सवलती आहेत.
१०. मागासवर्गात न बसणा-या उच्च जातीतील सुशिक्षित बेरोजगारांना राज्य शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत.
११. अल्पसंख्यांक समुदायासाठी व विविध घटकातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी कोणत्या योजना आहेत.
१२. महिलांना घरच्या घरी सहज व्यवसाय कोणता करता येईल. कुटीर उद्योगासाठी कोणत्या संधी आहेत.
१३. ग्रामीण भागात जोडधंदा करताना कुक्कुटपालनदुग्ध व दुग्धजन्य उत्पादनेगोट फार्मिंगमत्स्यव्यवसाय यासाठी काय उपाय योजना आहेत.
१४. गटशेतीचे फायदे कायकिती लोकांचा गट करता येईल,त्यासाठी शासकीय योजना कोणते आहेत. किती अनुदान दिले जाईल.
१५. यशस्वी व्यवसाय करण्यासाठी उद्योजकांनी व्यवस्थापन कसे करावे. कोणती शिस्त पाळावी.
१६. मार्केटिंग,मल्टिलेव्हल मार्केटिंगभावी उद्यमशीलतेला नवी दिशा कशी ठरू शकेल.
१७. आपले शहर सोडून भारतात कुठेही  जाण्याची तयारी असणाऱ्या युवकांना नोकरी कुठे उपलब्ध असू शकते.
१८. आपल्या शहरात,घराजवळ,उद्योग व्यवसाय उभारताना कोणत्या संधी उपलब्ध आहेत.
१९. यूपीएससीएमपीएससीस्टाफ सिलेक्शनरेल्वेबँक, पोलीस भरतीयामध्ये असणाऱ्या विविध संधी
२०. बचत गटातील महिलांना उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवावीकोणत्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी व्हावे याबाबतचे मार्गदर्शन.
अशा विविध संधीचा फायदा या ठिकाणी मिळणार आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या मनात येणा-या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या युथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन आले आहे.
रोजगारयुक्त जिल्हयासाठी सहा सूत्री कार्यक्रम.
चंद्रपूर जिल्हयाला रोजगार युक्त करण्यासाठी  सूत्रांमध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
1.मिशन सेवा- ही संपूर्णता नोकरीमध्ये उत्सुकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना असेल. यामध्ये गाव जिल्हाराज्य व देशपातळीवरील नोकरीच्या संधीचे मार्गदर्शन केले जाईल. यासाठी राज्य शासनाच्या विविध प्रशिक्षण व राहण्याच्या व अभ्यासाच्या सोयीसुविधांच्या उपाययोजना.
2.मिशन स्वयंरोजगार - मुद्रा व अन्य योजनेअंतर्गत कर्ज व त्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील उपाय योजना. याशिवाय राज्य शासनाच्या गेल्या चार वर्षात सुरू करण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना व त्यातून केल्या गेलेल्या कर्जपुरवठाच्या तरतुदी. मागासवर्गीयांसाठी सुरू असणा-या योजनांची माहिती व उपाययोजना.
3.मिशन कौशल्य – यामध्ये राज्य शासनाचे व अन्य खासगी संस्थांचे प्रशिक्षणव्यवसाय, अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची उपाय योजना. डायमंड प्रशिक्षण केंद्रापासून तर मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन व अन्य व्यावसायिक प्रशिक्षणाची तसेच सवलतीची माहिती दिली जाणार.
4.मिशन फॉरेन सर्व्हिसेस – यामध्ये विदेशातील शिक्षण व प्रशिक्षण घेणा-या उपाययोजना असतील. राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयामध्ये मागासवर्गीयांसह आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणार्‍या उन्नत गटांचाही सहभाग असणा-या उपाययोजना.
5.मिशन उन्नत शेती- कृषी व्यवसायात आवड असणा-यांना आधुनिक शेती व त्यावर आधारीत उद्योगाची माहिती उपलब्ध करणे. तसेच शेतीमध्ये प्रयोग करणाऱ्यांसाठी गट शेती व  राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या उपाययोजनांची माहिती व अंमलबजावणीचे तंत्राचा सहभाग.
6.मिशन सोशलवर्क- सार्वजनिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रमात झोकून देणा-या युवकांसाठी प्रशिक्षणाची उपाययोजना. समाजकार्यातून समाज सेवेसोबतच उपजीविकेचे व्यवस्थापन विकसित करण्याचे तंत्रशिक्षण.
इयत्‍ता 10 वी पासुन पदवी, पदव्‍युत्‍तर,  अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्‍हयातील तरूण-तरूणी या मेळाव्‍यात सहभागी होवू शकतील. यासाठी www.yeschandrapur.com/register.aspx या माध्‍यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्‍छूक तरूण, तरूणी करू शकतील. 25 ऑक्‍टोबरच्या  सायं.6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे. प्रत्येक युवकाने या संधीचा फायदा घेणे गरजेचे आहे चंद्रपूर जिल्हयातीलच युवकांना ही संधी असून त्यासाठी प्रत्येक घरातून चलो बल्लारपूरचा नारा बुलंद होने आवश्यक आहे.


     प्रवीण टाके
                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी
चंद्रपूर-970285877 0000