ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते वेबसाईटचा शुभारंभ: जिल्ह्याभरात चित्ररथ फिरणार
चंद्रपूर दि. 20:ऑक्टोंबर – राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दिनांक 28 आणि 29 ऑक्टोबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्हयातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण्यात आले आहे. या संदर्भातील वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला असून उद्या सकाळी दहा वाजता पासून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी यावर आपली नोंदणी करावी,असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. यासोबतच जिल्हाभरात युवकांना आवाहन करणाऱ्या चित्ररथाची सुरुवात देखील आज करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री या संदर्भात आयोजित एका बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. ऑनलाइन निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन या माध्यमातून पारदर्शी निवड प्रक्रीयेचा आदर्श या मेळाव्यातून उभा राहिला पाहिजे,असे त्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूरच्या महारोजगार मेळावा हा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरावा अशा पद्धतीचे काटेकोर नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील मोठा उद्योग समूहानी रोजगाराच्या संधी या मेळाव्यामध्ये उपलब्ध कराव्यात. त्यांच्याकडे लागणाऱ्या कर्मचाऱ्या सोबतच त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा देखील जिल्ह्यातीलच वापरण्यात याव्यात यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील मोठे उद्योग, समूह महाऔष्णिक विद्युत केंद्र, कौशल्य विकास रोजगार निर्मिती विभाग, उद्योग विभाग, कृषी विभाग, वनविभाग, पर्यटन विभाग व अन्य सर्व विभागांनी आपापले स्टॉल या ठिकाणी लावावे यासाठीच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्यात.
या बैठकीला फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले,आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती पावडे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती .
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले की, महाराष्ट्रात मुद्रा बँकेच्या अंतर्गत अधिकतम कर्ज चंद्रपूर जिल्ह्यात वाटप करण्याबाबतचे बँकांनी उद्दिष्ट घेऊनच या मेळाव्यामध्ये आपली नोंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले. मार्गदर्शन, प्रशिक्षण, कार्यशाळा, मुद्रा कर्ज उपलब्धता, याशिवाय 50 प्रतिष्ठीत कंपन्याकडून शेकडो युवकांची निवड या ठिकाणी होणार आहे.या मेळाव्यात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे 21 पासून सुरू होणाऱ्या या नोंदणी प्रक्रीयेवर तरुणांना लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नागपूर येथील फॉर्च्यून फाऊडेशनचे अध्यक्ष आमदार अनील सोले यांनी ही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि प्रख्यात कंपन्यांना गुणवान मुलांची उपलब्धता करणे, त्यांना बल्लारपूरच्या आयोजन स्थळावर पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे . त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे. अतिशय पारदर्शी अशी निवड प्रक्रिया या ठिकाणी मुलांसमोरच केली जाणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री यांनी पुढाकार घेतल्यामुळे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रख्यात कंपन्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी येत आहेत.
सहा सूत्री संधीची उपलब्धता
चंद्रपूर जिल्हा रोजगारयुक्त बनविण्याच्या दृष्टीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क हा सहा सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. युथ एम्पॉवरमेंट समीट हा या सहा सुत्री कार्यक्रमाचा प्रमुख भाग आहे.इयत्ता 10 वी पासुन पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रीकी, आय.टी.आय. अशा सर्वच प्रकारचे शिक्षण घेतलेले चंद्रपूर जिल्हयातील तरूण-तरूणी या मेळाव्यात सहभागी होवू शकतील. यासाठी www. yeschandrapur.com /register. aspx या माध्यमातुन ऑनलाईन नोंदणी इच्छूक तरूण, तरूणी करू शकतील. दिनांक 21 च्या सकाळी 10 वाजतापासून ते 25 ऑक्टोबरच्या सायं.6 वाजेपर्यंत 5 दिवस ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे.
पालकमंत्र्यांचा संदेश घेऊन चित्ररथ जिल्हयात रवाना
या मेळाव्याची भूमिका व या मेळाव्याच्या माध्यमातून मिशन सेवा, विशाल स्वयम रोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन साव्हिसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क या सहा सूत्रांवर जिल्ह्यातील रोजगार निर्मितीचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधणारा एक व्हिडिओ या चित्ररथात सोबत देण्यात आला असून या माध्यमातून त्यांनी बल्लारपूरच्या या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे याशिवाय या चित्ररथात रजिस्टेशन करण्याबाबचे आवाहन करणारे साहित्यसुध्दा ग्रामीण भागातील युवकांना वितरित केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment