Search This Blog

Saturday, 20 October 2018

चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी कटिबद्ध



चंद्रपूर दि.17 ऑक्टोबर : संपूर्ण देशातील विषमता नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषमता मुक्तीच्या संकल्पात सहभागी होण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया असे राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी  ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात नागपूर नंतर चंद्रपूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दरवर्षी 15 व 16 ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात येते. लाखोच्या संख्येने याठिकाणी बौद्ध धर्माचे अनुयायी व आंबेडकरी विचारांचे पाईक उपस्थित असतात. मोठ्या संख्येने जमलेल्या या अनुयायांना आवाहन करताना आज अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आजचा दिवस फक्त अनुप्रवर्तन दिन नाही तर ज्या जागेवर दीक्षा घेतली आहे त्याचे आचरण करण्याचा संकल्प करण्याचा दिन आहे. आपल्या हातून दुसर्‍यावर अन्याय होणार नाही याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
         चंद्रपूरची भूमि ही क्रांतीची भूमी आहे. चिमूर, आष्टीचा क्रांती लढा इथला प्रसिद्ध आहे. चीनच्या आक्रमणानंतर सर्वात जास्त सुवर्ण दान देण्याचा पराक्रमही चंद्रपूरचा आहे. भारतामध्ये नागपूर नंतर दुसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी देखील चंद्रपूर येथेच आहे. त्यामुळे या भूमीची महती कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची आपली जबाबदारी आहे. नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्याचे महत्त्व देशामध्ये वाढले पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी साठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिला व यानंतरही दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी विकासाच्या संदर्भात स्थानिक आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सर्व संबंधितांना घेऊन योग्य प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून अपेक्षित प्रस्ताव मान्य करून आणण्याची जबाबदारी आपली राहील, असेही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदाया पुढे स्पष्ट केले.
       यावेळी त्यांनी बल्लारपूर येथे होत असलेल्या युथ एम्पॉवरमेंट समीटचाही उल्लेख केला. राज्य शासन 72 हजार नोकर भरती करणार आहे. या नोकरभरतीमध्ये चंद्रपूरचा टक्का अधिक असावा यासाठी युवाशक्तीने  चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या मिशन सेवा, मिशन कौशल्य विकास, मिशन समाजकार्य, मिशन फॉरेन सर्विस, मिशन कृषी आदी घटकातील रोजगार महामेळाव्यात 28 व 29 ऑक्टोंबरला सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
          यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर आज जमलेला जनसमुदाय हा शिस्त आणि श्रद्धेचा समुदाय असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला. त्यांचा संघर्ष निशस्त्र होता. त्यामुळे हातामध्ये शस्त्र घेणारे बाबासाहेबांचे अनुयायी असू शकत नाही, असे स्पष्ट केले. दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. केद्र शासनाकडून दीक्षाभूमीच्या विकासाचे काही प्रस्ताव लवकरच पूर्ण होतील, असे त्यांनी सूतोवाच केले.
           आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी बाबासाहेबांच्या प्रचंड संघर्षानंतरही समाजामध्ये अद्यापही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असून आर्थिक विषमता दूर करण्याचा त्यांचा लढा पुढे करण्यासाठी अनुयायांनी पुढे यावे, असे आवाहन केले. बाबासाहेबांनी कोण्या एकाच समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केले नाही. तर त्यांना सामुदायिक उत्कर्षाची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी दिलेल्या बौद्ध धर्माची शिकवण अंमलात आणतांना कुणाच्या धर्मावर टीका करून धर्माचा विस्तार होणार नाही. तर त्यांच्या पूर्ण शिकवणीची अंमलबजावणी पुढच्या काळात करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे महापौर अंजलीताई घोटेकर यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,  महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभापती अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, मारोतराव खोबरागडे, याशिवाय दिल्लीवरून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले डॉक्टर रतनलाल,  प्राचार्य राजेश दहेगावकर, राहुल घोटेकर, कुणाल घोटेकर तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मनोज सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन सचिव वामन मोडक यांनी केले.
                                                                        0000

No comments:

Post a Comment