Search This Blog

Saturday 13 October 2018

चंद्रपूरच्या नव्या ओळखीसाठी लोकप्रतिनिधींसोबत सामान्य नागरिकांनीही योगदान द्यावे :ना.सुधीर मुनगंटीवार





महानगरात एकाच दिवशी कोट्यावधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चंद्रपूर दि.13 ऑक्टोंबर-  कधीकाळी अविकसित, मागास आणि प्रदूषण असणारे शहर म्हणून चंद्रपूर शहराला संबोधले जायचे. हे ऐकताना वेदना होत होत्या. मात्र आता चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करूननवनव्या योजना आखून तसेच या शहराचा चेहरा मोहरा बदलणारे अभिनव प्रयोग करून चंद्रपूरचे नाव देशांमध्ये ओळखले जावे, हा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व अन्य यंत्रणा सोबतच सामान्य नागरिकांनीही विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 
         शनिवारी चंद्रपूर महानगरातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाच्या आयोजनाच्या व्यासपीठावर त्यांनी संबोधीत केले. ते म्हणालेसामान्य नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय विकास कामांना गती, दर्जा आणि लौकिक प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे विकासात लोकसहभाग आवश्यक ठरतो.
        शनिवारी सकाळी नऊ वाजता पासून आयोजित या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याला ना.सुधीर  मुनगंटीवार यांच्या सोबतच केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, आमदार नानाभाऊ शामकुळेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेचंद्रपूर महानगराच्या महापौर अंजलीताई घोटेकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.
        शहराच्या विविध भागात घेण्यात आलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये बोलतांना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शहरात होणाऱ्या विकास कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे अधिकार सामान्य नागरिकाला असले पाहिजेत यावर भर दिला. महानगरपालिकेने ठेकेदाराने हे काम करतानाच त्याच्या दुरुस्तीच्या कामाचीही जबाबदारी निश्चित केली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नागपूर रोड वरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करताना येथील ज्येष्ठ नागरिकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या बगीच्याची जबाबदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी असेच नागरीकांचे पुढे येणे अपेक्षीत आहे. सरकार करेल तर सरकार म्हणजे वेगळे काय असते आपल्यापैकीच कुणीतरी लोकप्रतिनिधी झालेला असतो. त्यामुळे शहरात तयार होणाऱ्या रस्त्यांपासून तर सौदर्यी करण्यापर्यंत नागरिकांच्या समित्या बनवून त्याची देखभाल दुरुस्ती तसेच त्याच्या दर्जाची काळजी घेण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवावी. याचा अर्थ महानगरपालिका किंवा संबंधित यंत्रणा लक्ष देणार नाही, असा होत नाही. तर सामान्य माणसाचा सहभाग असल्यानंतर कामांमध्ये गुणात्मक सुधारणा दिसून येतात. त्यासाठी हे शहर माझे आहे. या शहराची प्रतिमा मला बदलायची आहे. या शहराला भारतातले उत्तम शहर बनवायचे आहे. या भावनेने प्रेरित होऊन लोकप्रतिनिधीसार्वजनिक संस्था व सामान्य जनतेने काम केल्यास चंद्रपूरचा नावलौकीक वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            भारतामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे नाव टायगर कॅपिटल म्हणून ताडोबामुळे घेतल्या जाते. एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील मुलांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख होत आहे. या भागाचा कायापालट व्हावा यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांना मिशन मोडवर राबवले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर हे भारतातील विकसित जिल्हा म्हणून पुढे येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
          यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनीही संबोधित केले. नागपूरमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात विकासाचा धडाका सुरू आहे. तोच कित्ता आम्ही चंद्रपूरमध्ये गिरवत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी चंद्रपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. राज्याची तिजोरी ज्यांच्या हाती आहेत असे वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हेच या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे नगरसेवकांकडून आलेल्या कोणत्याही सकारात्मक व दर्जात्मक प्रस्तावाला निधी मिळू शकतो. त्यामुळे झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नगरसेवकांना केले.
            शहराचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कार्य सुरू असून नामदार मुनगंटीवार यांनी विकासात कोणत्याही भागाला दुजाभाव दिला नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूरातील दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी सुद्धा येणाऱ्या काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असून प्रशासनाच्या या कार्याला सामान्य नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. आयुक्त संजय काकडे यांचा या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध विकास कामांमध्ये सक्रियता दाखविल्याबद्दल सत्कार केला. तर शहराच्या सर्व भागामध्ये समतोल विकासाच्या योजना राबवावी अशी सूचनाही त्यांनी केली.
           या कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, सभापती जयश्री जुमडे, नगर सेवक वसंत देशमुख, सुभाष कासनगोटुवार, सखीना अंसारी, विना खनके, अनुराधा हजारे, सविता कांबळे आदी उपस्थित होते.
                                                                        0000

No comments:

Post a Comment