चंद्रपूर प्रेस क्लबचा ना.अहीर, ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ
चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : एखादा प्राध्यापक चुकला तर विद्यार्थी बिघडतात, डॉक्टर चुकला तर आरोग्य बिघडते, मात्र पत्रकार चुकल्यास मोठ्या समूहाचे, एकूण समाजाची हानी होते. त्यामुळे हा व्यवसाय आजही सतीचे वाण असून त्याची प्रतिष्ठा व त्याचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत राखला गेला पाहिजे. चंद्रपूरला व्यासंगी पत्रकारितेचा वारसा आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या पत्रकारितेचे चंद्रपूर अधिष्ठान व्हावे, अशी सदिच्छा राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका शानदार कार्यक्रमात उभय नेत्यांनी चंद्रपूर प्रेस क्लबच्या शाखेची सुरुवात झाल्याचे घोषित केले. चंद्रपूर येथील पत्रकार बांधवांनी नव्याने चंद्रपुर प्रेस क्लबची स्थापना केली आहे. या प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना चंद्रपूरच्या पत्रकारितेने महाराष्ट्रामध्ये आपले स्थान अग्रस्थानी निर्माण करावे, अशी अपेक्षा ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पत्रकारांना संबोधित करण्यासाठी तरुण भारतचे संपादक तसेच कथाकार, चित्रपट पटकथा लेखक श्याम पेठकर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये चंद्रपूर शहराचे आपल्या व्यंगचित्राने नावलौकिक वाढविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, लेखक, पत्रकार व ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांचा चंद्रपूर गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारिता हा व्यवसाय त्यागाचा असून समाजाला काही देणारा हा वर्ग असतो. त्यामुळेच या व्यवसायाची प्रतिष्ठा आजही कायम आहे. पत्रकारिता करताना अनेक चौकटी पाळाव्या लागतात. अनेक लक्ष्मण रेषा या व्यवसायात आखलेल्या असतात. मात्र समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ही एक धडपड असते. त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या तरुणांचे वाचन आणि माध्यमांच्या संदर्भातील त्यांचा अभ्यास दांडगा असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेस क्लबच्या नव्या इमारतीमध्ये एका चांगल्या वाचनालयाची सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी केली. पत्रकारिता ही समाजाचे भले करणाऱ्यांच्या हातात आलेली संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या संधीचा आपण कशा पद्धतीने वापर करतात यावर समाजाचे भले अवलंबून असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी माध्यमांनी समाजातली कुठली शक्ती मोठी करायची या बाबतचा सारासार विचार करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. अशीच जागरूक पत्रकारिता नजीकच्या काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले. समाजातील दुर्जन शक्तीला लेखणीच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत मोठे होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. समाजहित, देशहीत सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगून यासाठीच आपल्या लेखणीचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, पटकथाकार कथा लेखक, तथा तरुण भारतचे संपादक श्याम पेठकर यांनी देखील यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा पत्रकार असतो. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध प्रश्न करण्याची तयारी असली पाहिजे, असे का ? हे प्रश्न पत्रकारांना कायम पडले पाहिजे,असे का घडते याबाबतची जागरूकता कायम लेखणीमध्ये असली पाहिजे. सध्याच्या काळात माणसाचे व समाजाचे रोबोटिकरण होत आहे. कठपुथली सारखे कुणाच्या तरी सूचना, परंपरा कुठलाही प्रश्न न विचारता पाळण्याचे कार्य सुरू आहे. माध्यम समूह बाजाराला शरण गेली आहेत. अशावेळी खऱ्या पत्रकारांनी बिघडणाऱ्या समाज व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतून शोधपत्रकारिता गायब झाली आहे. आता शोध पत्रकारिता सामाजिक उत्थानासाठी न वापरता व्यक्तिगत मानहानीसाठी वापरली जाते. कुणीतरी आपल्या हाती काठी दिली आणि त्या काठीचा वापर करायला सांगितले. अशा दबावात पत्रकारिता राहू नये. या काठीचा वापर कशासाठी कोण व का ? करायला लावत आहेत याचा सारासार विचार पत्रकारांनी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर गौरव पुरस्कार प्राप्त करणारे मनोहर सप्रे यांनी देखील आपले मनोगत यावेळी मांडले. ते म्हणाले, या शहरावर आपले अतोनात प्रेम आहे. हेशहर आपले एक विस्तारित कुटुंब असल्यामुळे आयुष्याची सायंकाळ या गावातच काढण्याचे आपण ठरवले आहे. आपल्या भाषणात त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वनविभागातील कामाचा गौरव केला. वनावर मनापासुन प्रेम करणारा वनमंत्री भेटल्या असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संजय रामगिरवार यांनी केले. मनोहर सप्रे यांचा परिचय मंगेश खाटीक यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रमोद उंदीरवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment