Search This Blog

Saturday 13 October 2018

सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर अशी बल्लारपूरची महाराष्ट्रात ओळख होईल: ना.मुनगंटीवार




किल्ल्याच्या स्वरूपातील अद्यावत पोलीस स्टेशन इमारतीचे थाटात लोकार्पण
बल्लारपूर मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पद निर्मितीचे संकेत

चंद्रपूर दि. 13 ऑक्‍टोबर : महाराष्ट्रातील सर्वाधिक  देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचा देखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले. बल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
             ब्रिटिश काळातील 1944 च्या इमारतीमध्ये बल्लारपूर येथील पोलीस ठाण्याचे काम सुरू होते. आता या ठिकाणी प्राचीन गोंड राज्याची राजधानी असलेल्या बल्लारपूर शहराच्या इतिहासाला साजेसे किल्ल्याच्या स्वरूपातील आधुनिक इमारतीचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यात लवकरच बल्लारपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दोन मजली या किल्ल्याच्या आकारातील इमारतीमध्ये पोलीस विभागासाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात आल्या असून काल इमारतीचा लोकार्पण सोहळा  संपन्न झाला. यामध्ये  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले. या इमारती सोबतच कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची भव्य इमारत उभारण्यात आली असून त्याचे देखील यावेळी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमातच बल्लारपूर नगरपालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग, बायोगॅस प्रकल्प, दिव्यांग निधी वाटप, नगर संरक्षण दल यासंदर्भात आयोजित अभिनव कार्यक्रमाचे सादरीकरण केले व बक्षीस वितरण देखील करण्यात आले. पोलीस विभागातर्फे नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये सतत चौथ्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. महिला व पुरुष खेळाडूंचा यावेळी दुचाकी देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्‍हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती .
यावेळी बोलताना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासाचा उल्लेख करताना गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह  यांची प्राचीन राजधानी ही बल्लारपूर होती. त्यानंतर ती चंद्रपूरला हलविण्यात आली. त्यामुळे या शहराच्या गतवैभवाला जोपासण्याचे दायित्व पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात बल्लारपूर शहराच्या विकासामध्ये तसेच लौकिकामध्ये  भर टाकणार्‍या अनेक मोठ्या वास्तू व संस्था उभ्या राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणावरून जनतेने सातत्याने आपल्याला विधानसभेत पाठवत मोठे केले आहे. त्यामुळे बल्लारपूर सर्वात सुंदर शहर होईल, असे आश्वासन आपण गांधी चौकातल्या सभेत जनतेला दिले होते. बल्लारपूरचे रेल्वे स्थानक भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात आहे. बल्लारपूर जवळ महाराष्ट्रातली दुसरी शासकीय सैनिकी शाळा पुढील वर्षापासून पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. बल्लारपूर मध्ये निर्माणाधीन असलेले क्रीडा संकुल ऑलिम्पिक पटू तयार करण्याच्या दर्जाचे व्हावे यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. बल्लारपूर व परिसरातील जनतेला आता मुंबईच्या नेहरू तारांगण मध्ये जावे लागणार नाही. बंगलोरच्या धर्तीवर तयार होणाऱ्या बॉटनिकल गार्डन मध्ये येथील जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी अटल प्लॅनेटोरियम उभारले जात आहे. केंद्रीय मंत्री ना.नितिन गडकरी यांच्या पुढाकाराने बल्लारपूर- गोंडपिंपरी- आष्टी हा राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. बल्लारपूर शहराच्या पाणीपुरवठ्याची कायम समस्या सोडवण्यासाठी वर्धा नदीवर तीनशे कोटीचे बॅरेज उभे राहणार आहे. तर शहरातील पाणीपुरवठा उत्तम व्हावा यासाठी 79 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. या शहरातील उद्योग व्यवसायाच्या वारस्याला जपत या ठिकाणी डायमंड कटिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या नकाशावर आता बल्लारपूर आले आहे. चंद्रपूर येथे निर्माण होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे एक उपकेंद्र बल्लारपूरला सुरू करण्यात येणार आहे. बल्लारपूर शहर व मतदार संघातील सर्व जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी हा परिसर आरो युक्त पाण्याच्या पुरवठ्याचा भाग करण्याचा आपला मानस आहे. याशिवाय शंभर टक्के गॅस वापरणारा तालुका म्हणूनही बल्लारपूरची ओळख निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बल्लारपूर येथील नगरपालिकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी नगराध्यक्ष हरिष शर्मा, मुख्याधिकारी बिपिन मुद्दा यांचे कौतुक केले. दिव्यांग निधी वाटप, बायोगॅस प्रकल्प,  रेन वॉटर हार्वेस्टिंग, नगर संरक्षण दल यासारख्या उपक्रमांना राबविणारी महाराष्ट्रातील उत्तम नगरपालिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी बल्लारपूर शहरातील आवास योजने संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना प्रतिपादन केले की, बल्लारपूर शहरातील नागरिकांना विविध आवास योजनेतून 3 हजार अत्याधुनिक घरे उपलब्ध केली जातील. राज्यातील ही सर्वोत्तम अशी निवास व्यवस्था असेल अशी  ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.
           केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी देखील यावेळी संबोधित केले. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार हे अतिशय कल्पकतेने आपला प्रत्येक प्रोजेक्ट साकार करीत असल्याचे त्यांनी या देखण्या उंच इमारतीच्या उदाहरणावरून दिले. बल्लारपूर येथे तयार झालेल्या नव्या इमारतीतून महाराष्ट्राच्या पोलिस व्यवस्थेतील दर्जेदार कार्याची अपेक्षा राहील, असे त्यांनी सांगितले. बल्लारपूर व परिसरासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनातून आवश्यकता असेल तिथे निधी उपलब्ध करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात सुरू झाला.  आता बारामती विकासाचे मॉडेल मागे पडले असून चंद्रपूर हे विकासाचे नवे मॉडेल म्हणून पुढे आले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी बोलताना स्पष्ट केले की, गेल्या सत्तर वर्षात मिळाला नसेल इतका निधी चंद्रपूर जिल्ह्याला ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मिळाला असून जनतेला त्याचे दृश्य परिणाम दिसत आहे. नगराध्यक्ष हरिष शर्मा यांनी यावेळी बल्लारपूर मतदारसंघात बल्लारपूर नगरपालिकेला गेल्या चार वर्षात मिळालेल्या कोट्यवधीच्या निधीसाठी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक मुंडे यांनी केले.
                                                                        0000

No comments:

Post a Comment