प्रत्येक गावातून समस्यांसाठी 155 398 या टोल फ्री क्रमांकाचा वापर झाला पाहिजे
चंद्रपूर, दि 2 ऑक्टोबर : ब्रम्हपुरी तालुक्यातील कोलारी या दूरच्या गावापासून जिवती तालुक्यातील बाबापूर या टोकाच्या गावापर्यंत, चंद्रपूर महानगरापासून चिचपल्ली ग्रामपंचायतपर्यंत, जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना कुठेही काही तक्रारी असेल, त्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा अर्थात 'हॅलो चांदा 'ची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र याचा वापर जोपर्यंत सामान्य नागरिक आपल्या मोबाईल मार्फत करणार नाही, तोपर्यंत ही योजना सक्षम होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस विभाग, वनविभाग, पंचायत समिती, नगरपंचायती, ग्रामपंचायत, यासह शेताच्या मोजणी पासून तर तहसील कार्यालयातील कोणत्याही कामापर्यंत सामान्य नागरिकांची अडवणूक होत असेल, तर त्यासाठी “हॅलो चांदा” ही नवी यंत्रणा संपूर्ण देशात पहिल्यांदा चंद्रपूरमध्ये सुरू झाली आहे. 155 398 हा साधा 6 अक्षरी क्रमांक डायल करून 10 ते 5 या कार्यालयीन वेळेत आपली तक्रार नोंदवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्याचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी सहा हजार लोकांनी या यंत्रणेचा व लाभ घेतला या माध्यमातून शाळा समिती पासून अंगणवाडी सेविका पर्यंत आणि भुमिअभिलेख कार्यालयापासून सातबारा मिळण्याच्या सेतू केंद्राच्या समस्यांपर्यंत अनेक समस्यांची सोडवणूक करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बिलापासून तर महानगरपालिकेच्या कर वसुली विभागापर्यंत अनेक तक्रारी सोडविण्यात आल्या. शाळेतील शिक्षकांच्या भरतीपासून तर शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांपर्यंत, चोरट्या दारू विक्रीपासून तर सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अतिक्रमण पर्यंत अनेक तक्रारी डॅश बोर्डवर जिल्हाधिकाऱ्यांकडे उमटत असतात. त्याची सोडवणूक संबंधित अधिकाऱ्याने मार्फत 30 दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे, त्यामुळे या यंत्रणेचा लाभ अनेक हुशार नागरिक घेताना दिसत आहेत. ही यंत्रणा सर्वांना उपयुक्त ठरावी यासाठी हॅलो चंदा हा नंबर फक्त सहा आकड्यांमध्ये करण्यात आलेला आहे त्याचा लाभ जनतेने घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना आपल्या प्रशासकीय समस्यांना तातडीने सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेली हॅलो चांदा ही पालक मंत्री तक्रार निवारण यंत्रणा 155 398 या नव्या नंबरसह जनतेच्या सेवेत आली आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि तहसील पासून उपनिबंधक कार्यालयापर्यंत, तलाठी, ग्रामसेवक, बँक, शाळा, संस्था कोणत्याही शासकीय कार्यालयाबाबत काहीही तक्रार असली तर मोबाईल वरून 155 398 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेमुळे सामान्य माणसाच्या समस्यांचा निपटारा करण्याचा चढता आलेख जिल्ह्यात आहे. गेल्या वर्षभरात 6 हजार नागरिकांच्या समस्या या यंत्रणेमार्फत सोडविण्यात आल्या आहेत. या यंत्रणेची दखल राज्य आणि देशपातळीवर घेण्यात आली आहे. गावातील सामान्य नागरिकाने आपली तक्रार केल्यानंतर त्यांनी केलेल्या तक्रारीची नोंद केली जाते. त्यानंतर ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. या यंत्रणेला या तक्रारीचा निपटारा एका महिन्यात करणे गरजेचे आहे. एक महीना ही डेडलाईन ठरली आहे. या काळामध्ये तक्रारीसंदर्भात संबंधित विभाग काय करतो. तक्रारीवर कार्यवाही सुरु आहे, अथवा नाही ? याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती अद्ययावत होत राहते. ही माहिती जिल्हाधिकारी यांच्या डॅशबोर्डवर कायम उमटत असते. आवश्यकतेनुसार पालक मंत्री सुद्धा कार्यवाहीचे निरीक्षण करू शकतात. त्यामुळे तक्रारकर्त्यापासून तर या तक्रारीवर कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे या संदर्भात नियंत्रण असते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दर महिन्याला तक्रारी किती झाल्यात आणि त्याची सोडवणूक कशी झाली याबाबतचा अहवाल घेतला जातो. संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये कोणत्या विभागाच्या किती तक्रारी प्रलंबित आहेत. त्यात किती तथ्य आहे, नेमकी समस्या शोधून जिल्हाधिकारी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना यासंदर्भातला तोडगा काढण्यासाठी निर्देश देतात. हॅलो चांदाची बैठक घेत असताना जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित असतात. या बैठकीमध्ये संबंधित विभागाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात येते. अनेक प्रकरणात जिल्हाधिकारी स्वतःच तक्रारकर्त्याशी संपर्क साधतात. त्यामुळे तक्रारकर्त्यापर्यंत प्रशासन पोहोचत असून जिल्हाधिकारी स्वतः संपर्क साधत असल्यामुळे या यंत्रणेवर विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी होत आहे.
गेल्या वर्षभरात जवळपास 6 हजार तक्रारी हॅलो चांदावर आल्यात. या तक्रारी सोडवण्यात आल्या असून हॅलो चांदा वापरणाऱ्या अनेक तरुणांनी या सोयीबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. घरबसल्या आपल्या तक्रारी सुटत असेल तर सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण हेलपाटे कमी होईल, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिशील व जबाबदार बनवण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. जुन्या लांबलचक क्रमांकाच्या तुलनेत केवळ 6 डिजीटचा हेल्पलाईन क्रमांक लोकप्रिय ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या यंत्रणेचे जिल्ह्यात स्वागत होत असून चंद्रपूरची ओळख बनलेल्या या योजनेला अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि यंत्रणेचा वापर करताना चुकीचे कॉल केल्यास जिल्हा प्रशासनाने त्याचीही नोंद वेगळी ठेवण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नेमक्या, उपयुक्त, आवश्यक व न्यायालयीन प्रक्रिया सुरू नसलेल्या तक्रारी कराव्यात, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment