आयुष्यमान योजनेचा पालकमंत्र्यांकडून आढावा
चंद्रपूर, दि.09 ऑक्टोंबर – 23 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या राष्ट्रव्यापी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील इ-कार्ड वाटप करतांना प्रत्येक नागरिकाला सुलभरित्या त्याचे वितरण होईल, अशी खात्रीशी यंत्रणा उभारण्याबाबतच्या सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी या योजनेचा आढावा घेतला. या आढावा बैठकीला आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार संजय धोटे, आमदार किर्तीकुमारभांगडिया, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.बी.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश साठे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत शंभर टक्के जनतेला आरोग्य विम्याचे कवच दिले जाणार आहे. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रित राबवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला ई-कार्डचे वितरण सुलभरित्या होणे आवश्यक आहे. यासाठी आजच्या आढावा बैठकीतूनच राष्ट्रीय आरोग्य समितीच्या मुख्य कार्यकारी अधिका -यांशी पालकमंत्र्यांनी संपर्क साधला. जिल्हयामध्ये 12 लाख लाभार्थी कुटुंबाना या कार्डचे वाटप करायचे असून ग्राम पंचायत पातळीवर सुविधा केंद्रामार्फत वितरण करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावर देखील आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साठे , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार यांनी यावेळी मॉडेल हेल्थ डिस्ट्रीक संदर्भातील सादरीकरण केले. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा इतर कोणत्याही जिल्हयापेक्षा अधिक सक्षम असावी, असे आवाहन यावेळी त्यांनी अधिका-यांना केले. यावेळी आयुष हॉस्पीटल, प्रस्ताविक वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, एमआर मशीनबाबत विषयांवरही चर्चा झाली.
000
No comments:
Post a Comment