चंद्रपूर दि 6 ऑक्टोंबर :शालेय विद्यार्थ्यांनी पथनाटयांच्या माध्यमातून पाणी वाचवा, वन्यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्वपूर्ण विषयांवर भाष्य करत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे. त्या माध्यमातून वनविभाग निश्चीतच योग्य उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दिनांक 6 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर तालुक्यातील मोहर्ली येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषीक वितरण समारंभात तसेच इलेक्ट्रीक बॅटरी वाहनाच्या लोकार्पण सोहळयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘देव बोलतो बालमुखातुन, देव बोलतो उंच पिकातुन’ अशी म्हण आपल्याकडे रूढ आहे. ही बालवाणी म्हणजे देववाणी आहे. यातुन पाण्याचे महत्व, वन्यजीवांचे महत्व शालेय विद्यार्थ्यांनी नेमक्या पध्दतीने विशद केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने वन्यजीव विशेष महत्वाचे आहे. वाघ पर्यटकांना आकर्षीत करतो तसेच शेकडो लोकांना रोजगारही देतो. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्व. उत्तमराव पाटील वनउद्यान, इको पार्क, ऑक्सीजन पार्क आपण तयार करतो आहोत. बांबु मिशनच्या माध्यमातुन बांबु धोरणाला आपण चालना दिली आहे. राष्ट्रपती भवनात सुध्दा बांबु लागवडीसाठी महाराष्ट्राच्या वनविभागाला आमंत्रीत करण्यात आले आहे. वनविभागाचे कार्य अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी परिश्रम घेणा-या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांचा सुध्दा सिंहाचा वाटा असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी वन्यजीव सप्ताहानिमीत्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना वनमंत्र्यांच्या हस्ते पारितोषीके वितरीत करण्यात आली. वनविभागातील तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना सत्कार देखील यावेळी करण्यात आला. यावेळी इलेक्ट्रीक बॅटरी वाहनाचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे श्री. ऋषीकेश रंजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री. एन. प्रवीण, उपवनसंरक्षक श्री. गजेंद्र नरवणे, मनपा सदस्य रामपाल सिंह,जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुटकर, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, विलास टेंभुर्णे, हनुमान काकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
000
No comments:
Post a Comment