त्रकारितेने सर्वसामान्य माणसाच्या सक्षमीकरणाचे काम केले
– ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे
चंद्रपूर, दि.07 ऑक्टोंबर- बदलत्या सामाजिक परिस्थीतीत अभ्यासू, निर्भीड पत्रकारितेची नितांत गरज आहे. पत्रकारिता ही सत्यावर आधारित असली पाहीजे. चंद्रपूर जिल्हा हा ऊर्जा देणारा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्हयातील पत्रकारांनी विचारांची ऊर्जा आपल्या लेखणीच्या माध्यमातुन निर्माण करण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ ही केवळ संघटना नसुन पत्रकारांची गुणवत्ता वाढविण्याचे ते एक व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
7 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळयात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, एखादा डॉक्टर चुकला तर काही काळ आरोग्याची समस्या निर्माण होईल, मात्र पत्रकार चुकला तर समाजस्वास्थ्य बिघडेल. त्यामुळे आपण जरी जग बदलवू शकत नसलो तरीही स्वतःमध्ये बदल घडवत आपल्यातील गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले. पत्रकारबांधवांच्या आरोग्य विषयक समस्या, पत्रकार कल्याण निधीसाठी 15 कोटी रू. निधीची तरतूद अशा विविध माध्यमातून शासनाने पत्रकारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर जिल्हा मिशन शौर्य व अन्य सेवा उपक्रमांच्या माध्यमातून देशाच्याच नव्हे तर जागतीक पातळीवर आपला झेंडा फडकवत आहे. त्यामुळे चंद्रपूरची पत्रकारिता ही राज्यासाठी आदर्शवत ठरावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी पत्रकारीतेतील आव्हाने, बदलती पत्रकारिता यावर भाष्य केले. जेथे उजेड आहे तेथील प्रश्न सोडविण्यापेक्षा आपल्या लेखणीच्या माध्यमातुन अंधारवाटा प्रकाशमान करा, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारितेला लोकशाहीचे मोठे अधिष्ठान लाभले असून सर्वसामान्य माणसाच्या सक्षमीकरणाचे काम पत्रकारितेने कायम केले आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाने पत्रकारांना प्रोत्साहीत करत त्यांना पुरस्कार देण्याचे जे कार्य केले आहे ते निश्चीतच अभिनंदनीय आहे कारण सत्कार ही सत्कार्याची संजीवनी असते, असेही श्री. संजय आवटे म्हणाले.
यावेळी बोलतांना त्यांनी आज लोकशाहीचे सर्व खांब खिळेखिळे होत असताना पत्रकारिता मात्र टिकून आहे. अंधार यात्रीमुळेच हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी कायम व्यवस्थेच्या विरुध्द उभे रहावे. व्यवस्थेच्या विरुध्द भूमिका मांडणारेच खरे पत्रकार असतात. लोकांचे सामर्थ्य अधोरेखीत करण्याची क्षमता आजही वर्तमानपत्रामध्ये आहे. त्यामुळेच प्रिंट माध्यम अजूनही लोकप्रिय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलिकडे माध्यम बदलत आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. सोशल मिडीयामुळे माध्यमांची कक्षा रुंदावली आहे. तरीही जबाबदारी आणि जाणीव ठेवणारे माध्यम म्हणून प्रिंट मिडीयांच्या पत्रकारांची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरूण दिवाण आणि विजय बनपूरकर यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार आदी स्पर्धांच्या माध्यमातून विजेते ठरलेल्या पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष संजय तुमराम यांनी केले. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्या इमारत बांधकामासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार त्यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले तर आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले. तत्पूर्वी ग्रामीणवार्ता पुरस्कारासाठी धनराज खारनोकर, राजकुमार चुनारकर, निलकंठ ठाकरे, आशिष देरकर, जितेंद्र सहारे यांना सन्मानीत करण्यात आले. मानवी स्वारस्य क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुरस्कार चुन्नीला कुठवे यांना देण्यात आला. इलेक्ट्रॉनिक्स मिडीया गटातील पुरस्कार दुस-या वर्षीही अनवर शेख यांना मिळाला. वृत्त छायाचित्र स्पर्धेत संदीप रायपूरे यांनी बाजी मारली. तर शुभवार्ता गटामध्ये हितेश गोहकार यांना पुरस्कृत करण्यात आले.
No comments:
Post a Comment