जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण बैठकीत अधिका-यांना निर्देश
चंद्रपूर, दि.12 ऑक्टोंबर – जिल्हा 100 टक्के कुपोषण मुक्त करणे व जलजन्य आजार मुक्त करण्याच्या ध्यास जिल्हयातील अधिका-यांनी घ्यावा, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्य आराखडा तयार करावा ,असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियत्रण समितीच्या बैठकीत केले.
चंद्रपूर जिल्हा कुपोषणाची स्थिती आटोक्यात असली तरी पुरेशी नाही. संपूर्ण जिल्हयाच 100 टक्के कुपोषण मुक्त कसा करता येईल याचे नियोजन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिका-यांना घेवून करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्हयात निधीची कमतरता नसून प्रधानमंत्री खनिज विकास, सीएसआर, डीपीसी मधून विकास कामाकरिता भरपूर निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा निधी वेळेत खर्च करणे हे खरे आवाहन असून सर्व ग्राम पंचायतींना आरओ वॉटर एटीएम मधून जनतेला शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्यात येवू शकते. त्यामुळे संपूर्ण जिल्हा जलजन्य आजाराने मुक्त होण्यास मदत होईल,अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना केल्या.
जिल्हयातील सर्व रुग्णालयात औषधीच्या पुरवठयासाठी निधीची कमतरता नसून यासाठी प्रधानमंत्री खनिज विकासाच्या माध्यमातून निधी देता येवू शकेल काय याची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिका-यांना केल्या.
या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार ॲड.संजय धोटे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, वित्त व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
तसेच बचत गट, शेतकरी मेळावा व आरोग्य मेळाव्याचे आयोजन येत्या डिसेंबरच्या आत घेण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. तसेच पाटण, जिवती, वनसडी, खातोडा, बाळापूर येथील बँका नागरिकांना सहकार्य करीत नसल्याचे समितीचे सदस्य खुशाल बोंडे व महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सविस्तर अहवाल तयार करुन संबंधित बॅकांच्या मुख्य कार्यालयास पाठविण्याच्या सूचना ना.अहीर यांनी दिले. त्याचप्रमाणे जिवती तालुक्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्याने कमतरता असल्याचे सभापती गोदावरी केंद्रे यांनी सांगितले. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल तयार करुन ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दयावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत प्रधान मंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती, एकात्मिक उर्ज विकास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कुपोषण, शालेय पोषण आहार, एनआरसीएम प्रोग्राम, कौशल्य विकास, प्रधानमंत्री पिक विमा योजना, सिंचन योजना, ग्रामीण सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना सिकलसेल आजार नियंत्रण योजना, राष्ट्रीय आरोग्य सेवा, आदी विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात येवून संबंधित अधिका-यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना ना.अहीर यांनी दिल्या.
या बैठकीला समितीचे सदस्य खुशाल बोंडे, तुळशिराम श्रीरामे, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment