आष्टा येथे शेतकरी मेळावा संपन्न
उमेदच्या माध्यमातुन मालवाहू गाडयांचे वितरण
चंद्रपूर दि. 20 ऑक्टोबर: - आष्टा या गावातील विविध विकासकामांसाठी 2515 या लेखाशिर्षाअंतर्गत 50 लक्ष रूपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच पंचायत समित्यांमध्ये पोंभुर्णा तालुका आणि पंचायत समिती विकासाग्रणी ठरावी यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा या गावात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, आष्टा चे सरपंच हरीश ढवस, पंचायत समिती सदस्या ज्योति बुरांडे, कृषी अधिकार उदय पाटील, संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आष्टा या गावाचा संकल्प करण्यासाठी श्री. हरीश ढवस यांच्यासह गावक-यांनी जे प्रयत्न सुरू केले आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. एक सुर एक विचार घेवून हे गांव विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत आहे याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे. या गावानजिक घाटकुळ येथे 50 कोटी रू. किंमतीचे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी पोंभुर्णा तालुक्यात कार्यरत झाली आहे. पोंभुर्णा येथे लवकरच मोठा दुग्ध व्यवसाय प्रकल्प साकारणार आहे. अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प आम्ही लवकरच याठिकाणी कार्यान्वीत करणार आहोत. पोंभुर्णा येथील एमआयडीसीला मान्यता मिळाली असून हा तालुका विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील 56 गावांमध्ये एलईडी लाईट लावण्याचा अभिनव उपक्रम आपण राबवित आहोत. या मतदार संघातील प्रत्येक गावात जलशुध्दीकरण संयंत्र, प्रत्येक गाव शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. सिंचनाच्या दृष्टीने चिचडोह प्रकल्पाचे काम आपण पूर्ण केले आहे. पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. चिचाळा व सहा गावांमध्ये नळपाईप जोडणीच्या माध्यमातुन सिंचन व्यवस्था आपण करीत आहोत. मामा तलावाचे खोलीकरण व नुतनीकरणाची कामे सुरू झाली आहे. टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या भागातील शेतक-यांचे उत्पन्न दिडपट वाढावे यासाठी सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतक-यांना विशेष बाब म्हणून सिंचन विहीरी आपण उपलब्ध केल्या आहेत. असे सांगत बल्लारपूर येथे 28 आणि 29 ऑक्टोबर ला होणा-या युथ एम्पॉवरमेंट समीट मध्ये या परिसरातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी शेतक-यांना बियाणे वाटप, स्वच्छतेच्या दृष्टीने डस्टबीन वितरण सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतक-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
उमेद च्या माध्यमातुन मालवाहू गाडयांचे वितरण
पोंभुर्णा पंचायत समितीमध्ये उमेद च्या माध्यमातुन मालवाहू गाडयांचे वितरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. आज उपलब्ध झालेली एक गाडी उद्या दहा गाडयांमध्ये रूपांतरीत व्हाव्या व लाभार्थ्यांच्या व्यवसायात वृध्दी व्हावी अशा शुभेच्छा यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
00000
No comments:
Post a Comment