Search This Blog

Monday, 29 October 2018

बल्लारपूरच्या रोजगार मेळाव्यातून दोन दिवसांमध्ये 5201 युवकांची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड




दुसऱ्या दिवशी 18 हजार विद्यार्थ्यांची हजेरी
मान्यवरांच्या मार्गदर्शनाने गाजला दुसरा दिवस

चंद्रपूर दि.29 ऑक्टोबर : उत्साह, उत्सुकता व जिज्ञासेत गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जवळपास 40 हजार युवकांच्या भरगच्च उपस्थितीतील युथ एम्पावरमेंट समिटचा आज शानदार समारोप झाला. 38 हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी 5201 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र दोन दिवसात देण्यात आले. केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे जिल्ह्यातील 5000युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरआमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 28 ऑक्टोबर पासून हा रोजगार मेळावा सुरू झाला होता.
आज दुसऱ्या दिवशी  18 हजार विद्यार्थ्यांपैकी 2423 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांनी आपल्या आस्थापनांसाठी निवड केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा 53 प्रतिष्ठित कंपन्यांना या ठिकाणी आयोजकांतर्फे पाचारण करण्यात आले होते. मुंबई, पुणे,औरंगाबाद या ठिकाणच्या कंपन्यांच्या आस्थापना बल्लारपूर येथे येऊन मुलांच्या मुलाखती घेत असल्याबद्दलचा आनंद यावेळी मुलांनी व्यक्त केला. अनेकांसाठी ही सुरुवात होती. तर अनेकांना यावेळी संधीची अपेक्षा होती. तथापि, 38हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना दोन दिवसात संधी भेटणे ही देखील मोठी उपलब्धी ठरली. माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या सहकाऱ्यांना या दोन दिवसाच्या मेळाव्यातून संधी मिळाल्याचा आनंद अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. आजच्या निवडीमध्ये देखील मुलींची संख्या प्रचंड होती. ग्रामीण भागातील गोंडपिंपरी, जिवती, कोरपना राजुरा, बल्लारपूर, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही अशा अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांनी या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मुद्रा बँक लोन वितरण संदर्भात अनेक बँकांनी या ठिकाणी आपले स्टॉल लावले होते. या स्टॉलवर देखील मोठ्या प्रमाणात युवकांनी नव्या व्यवसायाच्या संदर्भात चौकशी केली. जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात बामणी मैदानावरून 190 युवकांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिल्या गेले. या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेले दर्जेदार मार्गदर्शन हे देखील युवकांसाठी एक पर्वणी ठरले. या मेळाव्याचे दुसऱ्या दिवशी मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मुलाखतीपूर्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चाणक्य मंडळातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आज दिवसभरात विषयावर तज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
                                                            00000

No comments:

Post a Comment