राज्यातील 50 कंपन्यांच्या आस्थापनाचा सहभाग
रोजगारयुक्त जिल्हा बनविण्यासाठी एकाच छताखाली सर्व योजना
चंद्रपूर दि.09- चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी, व्यवसाय, कृषी व सामाजिक क्षेत्रात करियर घडविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण,कर्जपुरवठा आणि उपलब्ध संधीची माहिती देण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे युथ एम्पॉवरमेंट समीट रोजगार महामेळावा 28 व 29 ऑक्टोंबरला घेतली जाणार आहे. एकाच छताखाली सुशिक्षित बेरोजगारांचा कल ओळखणे, त्याला प्रशिक्षणांची माहिती देणे, त्यासाठी कर्ज पुरवठा करणे व जागेवरच मुलाखती घेवून काही आस्थापनात नोकरी उपलब्ध करुन देणे, असे या युवा सशक्तीकरण आयोजनाचे स्वरुप राहणार आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी या अभिवन आयोजनाची आज घोषणा केली. याच संदर्भात राज्य शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार निर्मिती, उद्योग, कृषी, सहकार, समाज कल्याण,बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मत्ससंवर्धन, दुग्धव्यवसाय, वेगवेगळया प्रशिक्षण देणा-या संस्था, विविध महामंडळ, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी, सर्व बँकाचे पदाधिकारी व राज्य शासनाच्या रोजगार निर्मितीशी संबंधीत असणा-या सर्व विभागाच्या प्रमुख अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीला वेगवेगळया वाणिज्यिक, औद्योगिक आस्थापनाशी समन्वय ठेवणा -या यंत्रणा देखील उपस्थित होत्या.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या युथ एम्पॉवरमेंट समीट तयारी संदर्भातील बैठकीला आमदार अनिल सोले, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना आमदार अनिल सोले यांनी या मेळाव्यामध्ये एकाच छताखाली वेगवेगळी माहिती, मुलाखती व संधी उपलब्ध असावी, अशा पध्दतीचे नियोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी वस्त्रोद्योग, लॉजीस्टीक यंत्रणेतील चालक, सुरक्षा कर्मचारी अशा मोठया प्रमाणातील संधी उपलब्ध करण्याबाबत मागणी केली. पालकमंत्र्यांनी यावेळी 28 तारखेच्या या मेळाव्याच्या दृष्टीने सर्व विभागाने आपल्याकडे असणा-या कामाची पूर्तता करण्याची सूचना केली. तसेच जिल्हाधिका-यांनी वेगवेगळया समित्यांचे गठण करण्याबाबतही मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात 50 कंपन्यांच्या आस्थापनांचा सहभाग असणार आहे.
रोजगारयुक्त जिल्हयासाठी सहा सूत्रात करणार बांधणी
यावेळी बोलतांना पालकमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हयाला रोजगार युक्त करण्यासाठी 6 सूत्रांमध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. यामध्ये, पुढील सहा विषयाच्या संदर्भात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुढील काळामध्ये जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय यंत्रणेला निर्देश दिले.
1.मिशन सेवा- ही संपूर्णता नोकरीमध्ये उत्सुकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी उपाय योजना असेल.
2.मिशन स्वयंरोजगार - मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज व त्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील उपाय योजना.
3.मिशन कौशल्य – यामध्ये राज्य शासनाच्या व अन्य खासगी संस्थांचे प्रशिक्षण, व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची
उपाय योजना.
4.मिशन फॉरेन सर्व्हिसेस – यामध्ये विदेशातील शिक्षण व प्रशिक्षण घेणा-या उपाययोजना असतील.
5.मिशन उन्नत शेती- कृषी व्यवसायात आवड असणा-यांना आधुनिक शेती व त्यावर आधारीत उद्योगाची माहिती उपलब्ध
करणे.
6.मिशन सोशलवर्क- सार्वजनिक क्षेत्रात विविध लोकोपयोगी उपक्रमात झोकून देणा-या युवकांसाठी प्रशिक्षणाची उपाययोजना.
000
No comments:
Post a Comment