चंद्रपूर, दि.12 ऑक्टोंबर- नवरात्र हा आदिशक्ती, मातृशक्तीचा उत्सव आहे. मातृशक्ती सुदृढ व सशक्त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन प्रकल्प हा दुर्गम भागातील महिला सक्षमीकरणाचे प्रभावशाली उदाहरण आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हा प्रकल्प माझ्या मतदार संघातला त्यातही माझ्या भगिनींचा आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
12 ऑक्टोंबर रोजी पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्कुटपालन संस्थेच्या पहिल्या वार्षीक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, साधारणतः कंपनी असे म्हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
या मतदार संघात रोजगार व स्वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्प आपण राबवित आहोत. चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्या प्रसार माध्यमांनी घेतली आहे. मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. 15 नोव्हेंबर पर्यंत टुथपिक तयार करण्याचा प्रकल्प आपण कार्यान्वीत करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मुल आणि पोंभुर्णा तालुक्यात टाटा ट्रस्टच्या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्ज अशी ग्रामीण रूग्णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्प शेतक-यांच्या सेवेत रूजु होणार आहे. विशेष बाब म्हणून मुल व पोंभुर्णा तालुक्यातील शेतक-यांना विहीरी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगीतले.
पंतप्रधानांसमोर आपल्या प्रकल्पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणा-या श्रीमती कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मिशन शक्तीच्या माध्यमातुन जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एवरेस्टवर झेंडा फडकविला. 28 आणि 29 ऑक्टोंबरला बल्लारपूर येथे युथ एमपॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्या माध्यमातुन मिशन सेवा, मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारयुक्त व्हावा हेच आपले ध्येय असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, नगर पंचायत अध्यक्षा श्वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प. सदस्य राहूल संतोषवार, न.प. उपाध्यक्ष रजिया कुरैशी,जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, न.प. सदस्य अजित मंगळगिरीवार, ईश्वर नैताम, माजी सरपंच राजू मोरे, पोंभुर्णा महिला पोल्ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्या अध्यक्षा यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे,तहसिलदार श्रीमती टेमकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment