'भारत माता की जय ' सोबत 'भारतमातेची जय ' करण्यासाठी कामाला लागा !
चंद्रपूर दि 6 ऑक्टोबर : आपल्या जोशपूर्ण भाषणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील युवाशक्ती पुढे आज जिल्ह्याला भारतातील समृद्ध ,विकसित व सर्व दृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 'मिशन शक्ती', 'मिशन सेवा' ,या दोन उपक्रमातून भारतातील 712 जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात उजवा ठरावा,असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित एका भरगच्च कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रपूरच्या नावात अद्याक्षर 'च ' आहे. याचा अर्थ कोणत्याही उद्दिष्टापुढे करावेच लागेल असा आहे. त्यामुळे ध्येय निश्चित करा आणि ते करावच लागेल यासाठी 24तासांचे नियोजन करा. उद्योगपतीचा मुलगा असो वा बाबुपेठ मधला सामान्य विद्यार्थी असो मेहनत करण्यासाठी 24 तास प्रत्येकाला मिळतात. त्यामुळे या २४ तासाचा सदुपयोग करणारा यशाला गवसणी घालतो, हे सूत्र कायम लक्षात ठेवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी,गोविंद सारडा,रामू तिवारी, अजय मस्के ,मोहन कललीवार, आशिष देवतळे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील मिशन शौर्य या उपक्रमाचा संदर्भ दिला.ठासून गुणवत्ता असल्यामुळे संधी मिळाली तर ज्यांनी आयुष्यात विमान पाहिले नाही, असे चंद्रपूरच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थी विमाना एवढ्या उंचीवर असणाऱ्या एव्हरेस्टला गाठू शकले. त्यामुळे अशक्य काही नसते.माझी खात्री आहे की, चंद्रपूरच्या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात असे हिरे आहेत. या हिऱ्यांना फक्त पैलू पाडण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला आयुष्यामध्ये लक्षात ठेवण्याचे आवाहनन केले.
चंद्रपूरमधून ऑलिम्पिक पटू घडविणाऱ्या मिशन शक्ती आणि सनदी अधिकारी घडविणाऱ्या मिशन सेवा या दोन उपक्रमाची मांडणी त्यांनी विद्यार्थ्यांनी पुढे केली.ज्यांच्यामध्ये उपजत कलागुण व कौशल्य आहे त्यांना मिशन शक्तीच्या माध्यमातून ऑलिम्पिक साठी जिल्ह्यामध्ये सिद्ध केले जात आहे. मात्र कठोर परिश्रम आणि 24 तासाची योग्य आखणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिशन सेवा हा उपक्रम चंद्रपूरचे नाव अधिक उज्वल करण्यासाठी वाट पाहत आहे.भारतात कुठेही गेलो तरी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पदावरचा एक मराठी आवाज मला ऐकायला आला पाहिजे की , 'भाऊ मी चंद्रपूरचा आहे '. तो दिवस माझ्यासाठी गौरवाचा असेल. महाराष्ट्रामध्ये आगामी काळात बहात्तर हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळी प्रत्येकाने कामी लागा. या मेगा भरतीमध्ये चंद्रपूरचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी येत्या काही काळामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उल्लेख केला. 0 ते 18 वयोगटातील कोणताही विद्यार्थी औषधोपचाराअभावी मागे राहता कामा नये, असे ते म्हणाले. बल्लारपूर तालुक्यामध्ये लवकरच 'युथ एम्प्लॉमेंट समीट ' घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या युगामध्ये भौतिक सुखाच्या मागे लागून 'मै और मेरा परिवार बाकी दुनिया बेकार ' , या चौकटीतून बाहेर पडून जातीविरहित समाज निर्माण करणाऱ्या युवकांचा जिल्हा म्हणून पुढे येण्याचे त्यांनी आवाहन केले. भारत माता की जय म्हटल्यानंतर आपल्या रगामध्ये चैतन्य संचारते.मात्र केवळ भारत माता की जय म्हणून होणार नाही. 'भारत मातेची जय ' करण्यासाठी ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात अव्वल प्रदर्शन करण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादनही त्यांनी शेवटी केले. या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांपुढे बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अजय मस्के यांनी केले. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानंतर पालकमंत्री यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद साधला व छायाचित्रे देखील काढून घेतली.
000
No comments:
Post a Comment