Search This Blog

Tuesday, 18 August 2026

नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर

 

नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती युद्धपातळीवर

Ø 19 ऑगस्टला दुरुस्ती पूर्ण करून सिंचनासाठी पाणी पूर्ववत सोडण्याचे नियोजन

Ø कालवा फुटल्याचे निदर्शनास येताच तात्काळ पाणी बंद करून दुरुस्तीला सुरुवात

चंद्रपूर, दि. 18 : नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला अनपेक्षितपणे भगदाड पडल्याचे निदर्शनास येताच संबंधित विभागाने तातडीने कालव्यातील पाणी बंद करून अवघ्या काही तासांत दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवार, दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारपर्यंत काम पूर्ण करून सिंचनासाठी कालव्यातून पूर्ववत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. स. सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

खरीप सिंचन हंगाम 2026 करिता नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता पाणी सोडण्यात आले होते. दरम्यान, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कालव्याचा काही भाग फुटल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच विभागाने तत्काळ कालव्यातील पाणी बंद केले. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी 11 वाजतापासून आकस्मिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. कालवा फुटल्यामुळे लगतच्या काही शेतांमध्ये पाणी गेले होते.

112 वर्षे जुना कालवा: नलेश्वर मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम सन 1914 मध्ये पूर्ण झाले असून या प्रकल्पाला आता 112 वर्षे झाली आहेत. हा कालवा प्रामुख्याने जंगल भागातून जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची मुळे कालव्याच्या भरावामध्ये शिरल्याने कालव्याचा भराव कालांतराने कमकुवत होण्याची शक्यता असते.

प्राथमिक पाहणीत फुटलेल्या भागात घूस, घोरपड, उंदीर आदी वन्यजीवांमुळे भरावाच्या आतील भागात छिद्रे निर्माण झाल्याची शक्यता निदर्शनास आली आहे. अशी अंतर्गत छिद्रे बाहेरून सहजपणे दिसून येत नसल्याने पाण्याचा दाब वाढल्यानंतर संबंधित भाग कमकुवत होऊन कालवा फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

पाणी सोडण्यापूर्वी करण्यात आली होती पाहणी: खरीप सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी विभागामार्फत कालव्याची पाहणी करण्यात आली होती. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या छिद्रे व भेगांची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, सध्या कालवा फुटलेल्या ठिकाणी पाहणीच्या वेळी बाह्य स्वरूपात कोणतीही भेग अथवा छिद्र निदर्शनास आले नव्हते.

शेतकऱ्यांचे सिंचन सुरळीत ठेवण्यास प्राधान्य: कालवा फुटल्याचे लक्षात आल्यानंतर विभागाने कोणताही विलंब न करता पाणी बंद करून दुरुस्तीची यंत्रणा कार्यान्वित केली. दुरुस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असून दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत काम पूर्ण करून खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेत उपलब्ध व्हावे आणि सिंचन व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे, असे कार्यकारी अभियंता श्री सिंह यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment